मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Thyroid ची समस्या असेल तरी कमी होईल वजन; फक्त खा हे 5 पदार्थ

Thyroid ची समस्या असेल तरी कमी होईल वजन; फक्त खा हे 5 पदार्थ

थायरॉईडच्या समस्येत उपयुक्त पदार्थ.

थायरॉईडच्या समस्येत उपयुक्त पदार्थ.

हायपोथायरॉइडिझमनं ग्रस्त असलेल्या रुग्णांना आहारात योग्य बदल करून वजन कमी करणं कठीण जातं; पण ही स्थिती तुम्ही बदलू शकता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी आहे, जी आपल्या गळ्याजवळ अ‍ॅडम्स अ‍ॅपलच्या (स्वरयंत्रात असलेली पोकळी) खाली असते. ही ग्रंथी असे हॉर्मोन्स तयार करते जे आपल्या चयापचय, वाढ आणि विकासात्मक क्रियांचें नियमन करण्यास मदत करतात. जेव्हा थायरॉइड हॉर्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं तेव्हा यामुळे चयापचय क्रियेत बदल, वजन वाढण्याची अतिसंवेदनशीलता, हाडं नाहीशी होणं, केस गळती होणं, हृदयरोग होण्याचा धोका, हॉर्मोन्सचं असंतुलन, सेलिअ‍ॅक डिसीज आणि डायबेटीस यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. सामान्यतः याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. या स्थितीमध्ये आपली थायरॉइड ग्रंथी पुरेशी हॉर्मोन्स तयार करत नाही. त्यामुळे अतिशय वेगानं वजन वाढतं.

    हायपोथायरॉइडिझमचा कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामध्ये नवजात बालकं आणि लहान मुलांचाही समावेश होतो. तुमच्या शरीरामध्ये थायरॉइडची कमतरता असेल तर खालील लक्षणं जाणवू शकतात -

    थकवा येणं

    थंडी जाणवणं

    बद्धकोष्ठता

    फुगलेला चेहरा आणि कोरडी त्वचा

    कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं

    सांध्यातला कडकपणा किंवा वेदना

    नैराश्य किंवा स्मरणशक्ती कमी होणं

    हे वाचा - पोटातील बॅक्टेरिया आणि नैराश्याचा काही संबंध आहे का? पाहा जिवाणूंचा शरीरावर कसा होतो परिणाम

    हायपोथायरॉइडिझमनं ग्रस्त असलेल्या रुग्णांना आहारात योग्य बदल करून वजन कमी करणं कठीण जातं; पण ही स्थिती तुम्ही बदलू शकता. वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करून त्याचं काटेकोरपणे पालन करावं लागेल.

    विविध खाद्यपदार्थांद्वारे मुख्य पोषक तत्त्वं संतुलित करून आणि प्रोटीनचं प्रमाण कमी करून काळजीपूर्वक खाण्यावर लक्ष केंद्रित करा. थायरॉइडच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वं नैसर्गिक स्रोतांद्वारे तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आयोडीन, सेलेनियम, जस्त, कॅल्शियम आणि प्रथिनं असलेले पदार्थ यांसारख्या घटकांचा समावेश असलेले सुरक्षित अन्नपदार्थ तुम्ही खाऊ शकता.

    तुमच्या शरीरातलं थायरॉइड सुरळीत कार्य करेल यासाठी आवश्यक असलेल्या पाच पदार्थांमधल्या मुख्य पोषक तत्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो :

    सीड्स आणि नट्स : ब्राझील नट्समध्ये मुबलक प्रमाणात सेलेनियम आणि झिंक आढळतं. या घटकामुळे थायरॉइड चांगल्याप्रकारे कार्य करू शकतं. याव्यतिरिक्त, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. या बिया स्नॅकिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. हायपोथायरॉइडिझमनं ग्रस्त असलेल्या व्यक्ती सीड्स आणि नट्सचा वापर करून जास्त खाण्यावर नियंत्रण मिळवू शकतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

    बीन्स आणि शेंगा : प्रथिनांचे समृद्ध स्रोत असलेली बीन्स आणि शेंगांमुळे चयापचय क्रिया सुधारू शकते. त्यांचं सेवन केल्यानं पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि वजनातली वाढ टाळता येते.

    अंडी : ज्या थायरॉइडच्या रुग्णांना वजन कमी करायचं आहे ते अंड्यातला पिवळा बलक आणि पांढरा भाग खाऊ शकतात. कारण, त्यामध्ये झिंक, सेलेनियम आणि प्रोटीन्स असतात. हे घटक वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. शिवाय अंड्यांमुळे हाडांना मजबुती मिळते.

    भाजीपाला : टोमॅटो आणि ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचं सेवन केल्याने थायरॉइडचा त्रास असलेल्या रुग्णांना वजन कमी करण्यास मदत होते. कारण, त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

    पाणी आणि नॉन-कॅफिनयुक्त पेयं : जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. शिवाय हॉर्मोन्स नियंत्रणात राहतात आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.

    खबरदारीचा सल्ला :

    हायपोथायरॉइडिझमपासून बरे होण्याचा मार्ग अतिशय सामान्य आहे. जोपर्यंत रुग्ण औषधोपचाराचं पालन करतो तोपर्यंत कोणतीही गुंतागुंत होत नाही; पण त्यावर उपचार न घेतल्यास तुमच्या शरीरावर तीव्र परिणाम होऊ शकतात. कोलेस्टेरॉल पातळी वाढणं, हृदयविकार, वंध्यत्व आणि ऑस्टिओपोरॉसिससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक रिसर्चमध्ये हेदेखील सिद्ध झालं आहे, की थायरॉइडमुळे मधुमेह, संधिवात आणि अ‍ॅनिमया यांसारख्या इतर ऑटोइम्युन रोगांची सुरुवात होऊ शकते. म्हणून, लवकर निदान आणि स्थितीचं योग्य व्यवस्थापन आपल्याला पुढची गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकतं.

    असा सल्ला दिला जातो, की निरोगी आहाराबरोबरच, रुग्णांनी योगासनांसारख्या शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. यामुळे त्यांच्या अंतःस्रावी प्रणालीला उत्तेजन आणि समर्थन मिळतं. शिवाय, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. असं झाल्यास थायरॉइडची समस्या असलेल्या व्यक्तीला खूप मदत होते. मद्यपान आणि धूम्रपान टाळल्यास रुग्णांच्या थायरॉइड कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते.

    हे वाचा - किचनमधील हे पदार्थ आहेत खूप फायद्याचे, वजन कमी करून वाढवतील चेहऱ्यावरचा ग्लो

    वर नमूद केलेल्या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपले आहारतज्ज्ञ आणि एंडोक्रायनॉलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे.

    थायरॉइड औषधं शरीरात शोषली जाण्यात व्यत्यय आणणाऱ्या पदार्थांची नोंद केली पाहिजे. असे पदार्थ सकाळी खाणं टाळले पाहिजेत. दिवसभरातदेखील कॉफी, सोया, पपई, द्राक्ष आणि फार फायबर व कॅल्शियम असलेल्या पदार्थांच्या सेवनात पुरेसं अंतर असलं पाहिजे. पॅक केलेले खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी फूड लेबल्स वाचली पाहिजेत. आहारात आयोडीनयुक्त मीठ आणि अंकुरलेल्या मिलेट्सचा समावेश केला पाहिजे. थायरॉइड व्यवस्थित राहावं यासाठी नॉन-आयोडीनयुक्त गुलाबी मिठाचा वापर टाळला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे क्रोमियम पिकोलिनेट असलेले सप्लिमेंट्स थायरॉइड औषधाची परिणामकारकता कमी करतात. त्यांचा वापर टाळला पाहिजे. गॉइट्रोजेनचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थाचं (कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, केयाल(कोबीची जात), बाजरी, साबुकंद, शेंगदाणा तेल इ.) मर्यादित सेवन केलं पाहिजे. हे पदार्थ आहारातून पूर्णपणे काढून वर्ज्य करू नयेत. कारण त्यांमध्ये इतर अँटिऑक्सिडंट आणि कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत.

    लेखक - एडविना राज, प्रमुख - क्लिनिकल न्यूट्रिशन डायटेटिक्स, अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरू

    First published:

    Tags: Food, Health, Lifestyle