पणजी, 14 फेब्रुवारी : काल (14 फेब्रुवारी) सर्वत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात आला. यासाठी अनेक जोडप्यांनी आपापल्या सोयीनुसार प्लॅन तयार केले होते. आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम मिळावा यासाठी काहीजण बाहेर फिरण्यासाठीही गेले होते. असाच काहीसा प्लॅन करणाऱ्या एका जोडप्यासाठी कालचा दिवस मात्र, आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला आहे. आपल्या कुटुंबाला न सांगता गोव्याला गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोव्यातील पाओलिम बीच परिसरामध्ये ही घटना घडली. 'इंडिया टुडे'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रिया दुबे (वय 26) आणि विभू शर्मा (वय 27), अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी जीवरक्षकांच्या मदतीनं सुप्रिया आणि विभू यांना किनाऱ्यावर आणलं. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी कोकण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखलं केलं. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
हे ही वाचा : 'व्हॅलनटाईन डे'लाच आणखी एका 'श्रद्धा'च्या हत्येनं खळबळ, ढाब्याच्या फ्रीजमध्ये आढळला मृतदेह
सुप्रिया आणि विभू हे एकमेकांचे नातेवाईक असून, ते गोव्यात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघे गेल्या काही दिवसांपासून गोव्यात होते. एकत्र सुट्टी घालवण्यासाठी ते गोव्यात आले होते. स्थानिकांनी सोमवारी रात्री दोघांना पाओलिम बीचजवळ फिरताना पाहिलं होतं.
कोकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया आणि विभू हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. सुप्रिया कामानिमित्त बेंगळुरूमध्ये राहत होती तर विभू दिल्लीमध्ये राहत होता. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी ते गोव्याला आले होते, असा अंदाज आहे. दोघांचा मृत्यू नेमक्या कशा परिस्थितीमध्ये झाला, हे अद्याप उघड झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : पुण्यात मुळशी नाही मावळ पॅटर्न, किरकोळ कारणावरून गावगुंडांनी केली अमानुष मारहाण
सुट्ट्यांसाठी बीच, हिल स्टेशन यांसारख्या प्रेक्षणीय स्थळी गेलेल्या नागरिकांचा अपघाती मृत्यू होण्याच्या घटना सातत्यानं घडत असतात. फिरण्यासाठी गेलेल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांचं प्रमाण तर सर्वांत जास्त आहे. बहुतेक वेळा नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा अतिउत्साहीपणामुळे हे मृत्यू होतात. त्यामुळे फिरण्यासाठी गेल्यानंतर प्रत्येकानं आपली आणि आपल्या सोबत असलेल्यांची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर सुप्रिया आणि विभूसारखा दुर्देवी शेवट वाट्याला येण्याची शक्यता टाळता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Goa, South Goa