मराठी बातम्या /बातम्या /explainer /

गव्हाचा मोठा उत्पादक असूनही पाकिस्तानात पिठासाठी चेंगराचेंगरी; 'हे' आहे मोठं कारण

गव्हाचा मोठा उत्पादक असूनही पाकिस्तानात पिठासाठी चेंगराचेंगरी; 'हे' आहे मोठं कारण

पाकिस्तानात पिठासाठी चेंगराचेंगरी

पाकिस्तानात पिठासाठी चेंगराचेंगरी

भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही गव्हाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. असं असताना तिथे सध्या गव्हाची टंचाई का जाणवत आहे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

कराची, 21 जानेवारी : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी नागरिक गव्हाचं पीठ मिळवण्यासाठी एका सरकारी मालवाहू ट्रकचा मोटारसायकलींवरून पाठलाग करत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडिओ अजिबात बनावट नाही. सध्या पाकिस्तानमध्ये गव्हाची आणि पिठाची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. रोटी आणि नान हे देशातील प्रमुख खाद्यपदार्थ आहेत. पिठाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत. सरकारी अनुदानित म्हणजेच स्वत धान्य दुकानातील पीठ मिळवण्यासाठी लांबलचक रांगा दिसत आहेत. सिंधमधील मीरपूर येथे, 7 जानेवारी रोजी अशाच एका वितरण ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये वाढलेल्या किमतींच्या विरोधात निदर्शनं झाली. भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही गव्हाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. असं असताना तिथे सध्या गव्हाची टंचाई का जाणवत आहे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

पीठ टंचाई का निर्माण झाली?

पाकिस्तानमधील केंद्र आणि प्रांतीय सरकारं या संकटासाठी एकमेकांना दोष देत आहेत. तज्ज्ञ म्हणतात की, रशिया-युक्रेन युद्ध, 2022 मधील विनाशकारी पूर आणि अफगाणिस्तानात गव्हाची तस्करी यामुळे पाकिस्तानमध्ये गव्हाची टंचाई उद्भवली आहे. पाकिस्तान आपल्या गरजा भागवण्यासाठी काही प्रमाणात गहू आयात करतो. त्यापैकी बराचसा गहू रशिया आणि युक्रेनमधून येतो. उदाहरणार्थ, 2020 मध्ये, पाकिस्तानने 1.01 अब्ज डॉलर्स किमतीचा गहू आयात केला होता. ऑब्झर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीच्या (ओईसी) डेटानुसार त्यापैकी सर्वाधिक गहू युक्रेनमधून (496 मिलियन डॉलर्स), त्यानंतर रशियामधून (394 मिलियन डॉलर्स) आला होता. या वर्षी, युद्धामुळे हा पुरवठा विस्कळीत झाला, शिवाय गेल्या वर्षीच्या पुरामुळे देशांतर्गत उत्पन्नही कमी झालं.

फायनॅन्शिअल इन्क्लुजनला प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट असलेल्या कारंदाज पाकिस्तान या कंपनीशी संबंधित असलेले अर्थतज्ज्ञ अममर खान यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, "सिंध आणि बलुचिस्तानमध्ये गव्हाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या प्रदेशांतील साठ्याला पुराचा फटका बसलेला आहे. या शिवाय, पाकिस्तानातून अफगाणिस्तानात होणारी गव्हाची तस्करी हादेखील एक घटक जबाबदार आहे. ज्यामुळे स्थानिक पातळीवर तुटवडा निर्माण होतो आणि किमती वाढतात. मात्र, सरकारी गोदामांमध्ये गव्हाचा पुरेसा साठा आहे. वितरणातील विलंबामुळे टंचाई आणि दरवाढ वाढ झाली आहे. त्याची आत्ताशी दखल घेतली जात आहे."

वाचा - 60वर्षात पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येत घट;भारत सर्वाधिक लोकसंख्येच्या मार्गावर

दरवाढीच्या संकटाची तीव्रता किती आहे?

पंजाब आणि सिंध या दोन गहू उत्पादक राज्यांमध्ये पीठाची किंमत प्रतिकिलो 145 ते 160 पाकिस्तानी रुपये आहे. तर, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये किमती जास्त आहेत. गल्फ न्यूजमधील एका लेखानुसार, पाकिस्तानमध्ये पाच किलो आणि 10 किलो पिठाच्या पिशव्यांच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. याच लेखात म्हटलं आहे की, इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये एक नान 30 पाकिस्तानी रुपयांना मिळत आहे तर एक रोटी 25 पाकिस्तानी रुपयांना विकली जात आहे. पाकिस्तानमधील 1 रुपयाचं मूल्य भारतातील 35 पैशांच्या बरोबरीत आहे. यावरून या दरवाढीच्या तीव्रतेच्या अंदाज लावता येऊ शकतो. असं म्हटलं जात आहे की, पाकिस्तानमधील पीठ टंचाईच्या समस्येला अपुऱ्या साठ्यापेक्षा वितरणातील गोंधळ जास्त जबाबदार आहे.

वितरण व्यवस्थेतील समस्या काय आहेत?

पाकिस्तानमध्ये, प्रांतीय सरकारं (भारतातील राज्य सरकारांप्रमाणे) गिरण्यांना गहू पुरवतात. या गिरण्या नंतर किरकोळ बाजारात पीठ पुरवतात. ज्या प्रांतांना गव्हाचा तुटवडा जाणवेल ते सेंट्रल पाकिस्तान अॅग्रिकल्चरल स्टोरेज अँड सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या (पास्को) गोदामांकडे गव्हाची मागणी करू शकतात. ग्रामीण भागातील लहान चक्कीमालक (पीठ ग्राइंडर) थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करतात.

पंजाब आणि सिंध ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख गहू उत्पादक राज्यं आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागातील नोंदींनुसार, पाकिस्तानमधील एकूण गहू उत्पादनात पंजाबचा वाटा 77 टक्के, सिंध 15 टक्के, खैबर पख्तुनख्वा 5 टक्के आणि बलुचिस्तान 3.5 टक्के इतका आहे. खैबर पख्तुनख्वाची अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा सर्वांत जास्त गळतीसाठी कारणीभूत आहे. शेजारच्या देशात किफायतशीर किमती मिळवण्यासाठी या ठिकाणाहून गव्हाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. सिंध प्रांताला पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेथील खरीप पिकावर परिणाम झाला आहे. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'नं पाकिस्तानच्या नियोजन आयोगाचा हवाला देत म्हटलं आहे की, पाकिस्तानमध्ये पुरामुळे शेती आणि शेतीच्या उपक्षेत्रांचं 800 अब्ज रुपये किंवा 3.725 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. यापैकी 72 टक्के नुकसान एकट्या सिंध प्रांतात झालं आहे.

पंजाब आणि सिंध राज्यांनी गिरण्यांना वेळेवर गहू न दिल्यानं पिठाचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा केंद्र सरकारसह इतरांनी केला आहे. तर, काहींचं म्हणणं आहे की, गिरणी मालकांनी साठा करून ठेवल्यामुळे किमती वाढल्या आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारण, अनेक प्रभावशाली राजकारणी ग्रामीण-कृषी पार्श्वभूमीतून आलेले आहेत. स्थानिकांचा असाही दावा आहे की, गिरणी मालक पैसे देण्यास इच्छुक असलेल्यांना चढ्या भावानं पीठ विकत आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानं आणि अनुदानित विक्री केंद्रांसाठी पुरेसं पीठ उपलब्ध होत नाही.

वाचा - पाकिस्तानमधील अन्नधान्य संकटाची तीव्रता वाढली? भयानक परिस्थिती दाखवणारा VIDEO

लाहोरमधील व्यापारी रब्बी बशीर म्हणाले, "पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) हा केंद्रात सत्तेत असलेला पक्ष आहे. तर, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा या दोन्ही ठिकाणी खान साहेबांचं (माजी पंतप्रधान इम्रान खान) सरकार आहे. गिरण्यांना गहू देणं ही प्रांतीय सरकारची जबाबदारी आहे. टंचाईचे अनेक दावे केंद्र सरकारला संकटात आणण्यासाठी केलेला प्रचार वाटत आहे. पाकिस्तानकडे गव्हाचा पुरेसा साठा आहे. पण, त्याची खरेदी, गिरण्यांचे वितरण आणि साठेबाजी रोखण्याकडं पुरेसे लक्ष दिलं गेलेलं नाही.”

दीर्घकालीन समस्या

या वर्षी, पाकिस्तान सरकारने 2.6 दशलक्ष मेट्रिक टन गहू आयात करण्याची घोषणा केली आहे. यातील पहिली 1.3 दशलक्ष मेट्रिक टन आवक झाली असून त्यामुळे किमती कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. तथापि, हे आयात बिल कमी परकीय गंगाजळीकडे गंभीरपणे टक लावून पाहणाऱ्या देशासाठी मोठा खड्डा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रॉयटर्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेतील परकीय चलन पाच अब्ज डॉलरच्या खाली गेलं आहे. ही रक्कम तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेशी नाही.

"भारतात पंजाब आणि हरियाणा हे ब्रेड बास्केट मानले जातात. पाकिस्तानमध्ये हा दर्जा सिंध आणि पंजाबला आहे. या हिशोबानं बघितलं तर आम्हाला अजिबात गहू आयात करण्याची गरज नाही. पण, पाकिस्तानमध्ये गव्हाचं प्रति एकर उत्पादन फारसं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये कोणतीही तांत्रिक प्रगती झालेली नाही. उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित झाल्या नाहीत. जमीन सुधारणाही नाही. कालवे कोरडे पडत आहेत. पाण्याची पातळी खालावली आहे. डिझेल खूप महाग आहे. वीज बिल जास्त आहे आणि पुरवठाही विस्कळीत आहे. शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळत नाही. खतं महाग झाली आहेत, असं पंजाबच्या झांग जिल्ह्यातील शेतकरी कल्ब-ए-अब्बास यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

पाकिस्तानशी संबंधित शेतीवरील 2022 च्या जागतिक बँकेच्या अहवालात असं म्हटलं आहे की, "डेव्हलपमेंट पार्टनर्सकडून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च होत असूनही, 1970-2000 दरम्यान पाकिस्तानमधील कृषी विकास सरासरी चार टक्क्यांपेक्षा कमी होऊन तीन टक्क्यापर्यंत खाली आली आहे."

इतर खाद्यपदार्थांची स्थिती

तांदूळ हे पाकिस्तानमधून निर्यात होणारं महत्त्वाचं पीक आहे. यंदा गव्हाच्या पिठाचा तुटवडा असल्यानं तांदळाची देशांतर्गत मागणी वाढली आहे. लाहोरमधील सिद्दीकी राईस मिल्सचे संचालक आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यात संघटनेचे सदस्य मुहम्मद जुबेर लतिफ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पाकिस्तानी तांदूळ जगभरात निर्यात केला जातो. पण, या वर्षी पुरामुळे तांदळाच्या एकूण उत्पादनावर, विशेषतः दक्षिण पंजाब आणि पश्चिम बलुचिस्तानमध्ये परिणाम झाला आहे. त्यातच गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे 'तुकडा बासमती' तांदळाची मागणी आणि दर अनेक पटींनी वाढले आहेत."

डॉनमधील एका वृत्तात म्हटलं आहे की, डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखानुसार, "1 जानेवारी 2023 रोजी हरभरा डाळीची किंमत प्रतिकिलो 180 पाकिस्तानी रुपयांवरून 205 पाकिस्तानी रुपये झाली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी हीच किंमत 170 होती. तर, डिसेंबर महिन्यामध्ये एक किलो मसूराची किंमत 200 पाकिस्तानी रुपयांवरून 225 वर गेली आहे. बँकांनी संबंधित कागदपत्रांच्या मंजुरीला विलंब केल्यामुळे बंदरावर आयात केलेल्या मालाला वितरणाची मंजुरी न मिळाल्यामुळे असं घडत आहे."

दरम्यान, रशियाकडून गव्हाची एक खेप आता पाकिस्तानात पोहोचली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. एकूणच पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती यातील बदल हे जगासाठी धडा घेण्यासारखे आहेत. देशात राजकीय सत्ता आहे पण सामान्य नागरिकांना पीठ मिळेना अशी परिस्थिती आहे. आर्थिक आघाडीवर सपशेल नापास झालेल्या पाकिस्तानची ही स्थिती सुधारण्याची शुद्ध कुणालाच नाही.

First published:

Tags: Economic crisis, Pakistan