Explainer : आधी वगळलं आणि आता प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी सरकारने का सुरू केली धडपड?

Explainer : आधी वगळलं आणि आता प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी सरकारने का सुरू केली धडपड?

आतापर्यंत प्रेग्नंट महिलांना कोरोना लस (Pregnant Women Corona Vaccination) दिली जात नव्हती पण आता त्यांच्याही लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : आतापर्यंत गर्भवती महिलांना (Pregnant Women Corona Vaccination) भारतात कोविड-19 प्रतिबंधक लस (Covid Vaccination) दिली जात नव्हती; मात्र गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने याबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला. त्यामुळे आता देशात गर्भवती महिलांचंही लसीकरण केलं जाणार आहे.

गर्भवती महिलांवर लशीचा कसा परिणाम होतो, याबद्दल पुरेसा डेटा नसल्याने आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत त्यांना लसीकरण करण्याची शिफारस केली नव्हती. मात्र कोविडमुळे गंभीर लक्षणं विकसित होणाऱ्या गटातच गर्भवती महिलांचा समावेश होत असल्याने आता त्यांनाही लसीकरण करण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातल्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ या.

- गर्भवती महिलांना कोविड-19 (Covid19) होण्याचा जास्त धोका आहे का?

- नाही. 'गर्भवती असलेल्या महिलांना त्या गर्भवती असल्यामुळे कोविड-19चा संसर्ग होण्याची शक्यता वाढते असं काही नाही. कोरोनाचा संसर्ग झाल्यास बहुतांश गर्भवती महिलांना कोणतीही लक्षणं नसतील किंवा सौम्य लक्षणं दिसतील. कोरोना संसर्ग झालेल्या 90 टक्क्यांहून अधिक गर्भवती महिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं न लागताच बऱ्या होतील,' असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

तरीही, काही मोजक्या प्रमाणातल्या कोरोनाबाधित गर्भवतींची प्रकृती अचानक ढासळून गंभीर रूप धारण करू शकते. लक्षणं दिसत असलेल्या गर्भवती महिलांना गंभीर आजार होण्याचा आणि प्रसंगी मृत्यूही होण्याचा धोका जास्त आहे. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा लठ्ठ असलेल्या, डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या किंवा हाता-पायात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं लक्षणं असलेल्या महिलांना कोविड-19मुळे गंभीर आजारपण येण्याची शक्यता जास्त आहे.

- गर्भवती महिला, नवजात बालकांना (New Borns) लसीकरणामुळे कसा फायदा होईल?

- कोविड-19 टाळण्यासाठी बाकीच्या सर्वांना ज्या पद्धतीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याच पद्धतीने गर्भवती महिलांनीही काळजी घ्यावी आणि लसीकरणही करून घ्यावं, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गर्भवतींनी लसीकरण करून घेणं हे त्यांच्या गर्भातल्या बाळांच्या आरोग्यासाठीही हितकारक आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19बाधित गर्भवतींना झालेल्या बाळांपैकी 95 टक्के बाळांचं आरोग्य जन्मतः चांगलं होतं; मात्र काही कोरोनोबाधित गर्भवतींच्या बाबतीत वेळेआधी बाळांचा जन्म होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे बाळाचं वजन 2.5 किलोपेक्षा कमी असू शकतं आणि काही दुर्मीळ केसेसमध्ये बाळाचा जन्माआधीच मृत्यू होऊ शकतो.

हे वाचा - Explainer : Delta Plus Variant चा महाराष्ट्राला सर्वाधिक धोका का?

तज्ज्ञांनी आता कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर, गर्भवती महिलांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची शिफारस महत्त्वाची आहे. कोरोना संसर्ग झालेल्या गर्भवती आणि नुकतंच बाळंतपण झालेल्या महिलांमध्ये लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांचं प्रमाण पहिल्या लाटेत 14.2 टक्के होतं. दुसऱ्या लाटेत ते 28.7 टक्के होते. पहिल्या लाटेत या महिलांचा मृत्युदर 0.7 टक्के होता, तर दुसऱ्या लाटेत तो 5.7 टक्के होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या संशोधनात या बाबी दिसून आल्या आहेत.

कोरोनाच्या भविष्यातल्या संभाव्य लाटांविरुद्ध लस हे उत्तम आणि दीर्घकालीन उत्तर आहे, असं 'फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया' (FOGSI) या संस्थेने म्हटलं आहे. 'गर्भवती आणि नुकतंच बाळंतपण झालेल्या महिलांचं लसीकरण करण्यात असलेले फायदे हे त्यात थेरॉटिकली असलेल्या धोक्यांपेक्षा (Concerns) किती तरी जास्त आहेत,' असं त्या संस्थेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हीच भूमिका घेतली आहे. WHOच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. सौम्या स्वामिनाथन (Dr Saumya Swaminathan) म्हणतात, 'देशात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग असेल आणि महिला त्या संसर्गाच्या कक्षेत येत असतील, त्या हेल्थवर्कर किंवा फ्रंटलाइन वर्कर असल्यामुळे संसर्गाच्या कक्षेत येत असतील, तर लसीकरण करून घेण्याचे फायदे त्यामुळे असलेल्या संभाव्य धोक्यांपेक्षा किती तरी जास्त आहेत.'

- आतापर्यंत गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी परवानगी का दिली नव्हती?

- अनेक लशींच्या चाचण्यांमध्ये गर्भवती महिला, स्तनदा मातांचा (Lactating Women) समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळेच लशींचा त्यांच्या शरीरावर कसा परिणाम होतो, याबद्दलचा फारसा डेटा उपलब्ध नव्हता. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनेही असंच लिहून ठेवलं आहे.

FOGSIने अमेरिकेतल्या एका अभ्यासाचा संदर्भ घेऊन गर्भवती महिलांच्या लसीकरणाची भूमिका घेतली आहे. त्या अभ्यासानुसार, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमध्ये लसीकरणाने मिळत असलेला प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद हा अन्य सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच असतो. लसीकरणामुळे संरक्षक अँटीबॉडीज नाळेत आणि आईच्या दुधातही तयार होत असल्यामुळे बाळाचंही संरक्षण होतं. 131 गर्भवती महिलांच्या अभ्यासावरून अमेरिकेत ही लक्षणं नोंदवण्यात आली होती. तिथे mRNA प्रकारच्या लशी या प्रयोगादरम्यान गर्भवतींना देण्यात आल्या होत्या.

- साइड इफेक्ट्सबद्दलचा (Side Effects) सल्ला काय आहे?

- अन्य व्यक्तींप्रमाणेच गर्भवती महिलांनाही लसीकरणानंतर काही साइड इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यात सौम्य ताप, इंजेक्शनच्या जागी वेदना किंवा एक ते तीन दिवस अस्वस्थता आदी लक्षणांचा समावेश आहे. दीर्घकालीन साइड इफेक्ट्स आणि बाळासाठी लशीची सुरक्षितता यांबद्दल अद्याप अभ्यास झालेला नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

काही दुर्मीळ केसेसमध्ये, डोस घेतल्यानंतरच्या 20 दिवसांत गर्भवती महिलांना श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं वगैरे त्रास होतात. एक ते पाच लाख व्यक्तींपैकी एका व्यक्तीला असा त्रास होऊ शकतो. त्या केसमध्ये तातडीने उपचारांची गरज असते.

- गर्भवती महिलांसाठी काही विशिष्ट लशी आहेत का?

- FOGSIने अमेरिकेतल्या ज्या अभ्यासाचा संदर्भ घेतला आहे, त्यात वापरण्यात आलेली कोणतीच लस भारतात सध्या उपलब्ध नाही; मात्र सध्या उपलब्ध असलेल्या सर्वच लशींची गर्भवतींसाठी शिफारस करता येऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लाइव्ह अटेन्युएटेड प्रकारच्या लशी गर्भवतींना वापरून उपयोगी नाही, असं तज्ज्ञ म्हणतात; मात्र सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोविड प्रतिबंधक लशींपैकी कोणतीच लस या प्रकारची नाही.

हे वाचा - मोदी सरकारनेही दिला ग्रीन सिग्नल; प्रेग्नन्सीत कोरोना लस घेणं का आहे महत्त्वाचं?

गर्भवती स्त्रियांमध्ये अॅस्ट्राझेनेका लशीमुळे काही त्रास झाल्याची नोंद नाही, असं ब्रिटनमधल्या 'रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स'ने म्हटलं आहे. भारतात अॅस्ट्राझेनेका कंपनीची कोविशिल्ड ही लस वापरात आहे.

- गर्भवती महिलांचं लसीकरण किती देशांत सुरू आहे?

- भारत वगळता सध्या 17 देशांमध्ये अशी शिफारस करण्यात आली आहे, की काही किंवा सर्व गर्भवतींनी लस घ्यावी. त्या व्यतिरिक्त 57 देशांनी एक तर गर्भवतींच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे किंवा हेल्थ-वर्कर किंवा को-मॉर्बिडिटीज असलेल्या गर्भवतींचं लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यापैकी भारत वगळता 34 देशांमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका (Oxford-Astrazeneca) कंपनीची लस वापरात आहे.

First published: June 29, 2021, 10:21 PM IST

ताज्या बातम्या