मुंबई 14 फेब्रुवारी : गाडी चालवताना बऱ्याचदा अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. आपल्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याने त्या गाडीचे नुकसान होऊ शकते किंवा त्यात एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशावेळी समोरचा गाडी चालक पैशांची मागणी करतो. नुकसान भरपाईच्या नावाखाली जास्त पैसे मागतो. तुमच्याबाबतीत असं घडलं तर समोरच्या गाडी चालकाला पैसे देण्याची गरज नाही.
अशा परिस्थितीत घाबरुन जाऊ नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर घटनास्थळावर तडजोड करु नका. अशावेळी काही निश्चित कार्यपद्धती पाळल्या पाहिजे किंवा दुसऱ्या पार्टीला पोलिसांकडे (Police) जाण्यास सांगितले पाहिजे. जर आपल्या गाडीचा विमा असेल तर नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनीची असते. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर नेमकं काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत...
घटनास्थळावर करार करु नका -
तुमच्या गाडीमुळे अपघात झाल्यास घटनास्थळी कोणत्याही प्रकारच्या करारावर सही करु नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर त्याची सर्व जबाबदारी विमा कंपनीची आहे. तसंच समोरच्या गाडीचं नुकसान झालं असेल तर त्या गाडीचा मालक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करु शकतो. बऱ्याचदा असं होतं, की नुकसान झालेल्या गाडीचा मालक तुमच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करतो आणि परत आपल्या विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करतो. अशापद्धतीने तो दोन्हीकडून फायदा घेतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांकडे जाणे आणि आपल्या विमा कंपनीला माहिती देणे योग्य असते.
पोलिसांना माहिती का द्यावी? -
तुमच्या गाडीनं अपघात झाला असेल तर सर्वात आधी पोलिसांना कळवा आणि आपल्या गाडीच्या कागदपत्रांची फोटो कॉपी त्यांना द्या. अशा परिस्थितीत तुम्ही पोलीस किंवा कोणत्याही एजन्सीला सहकार्य केलं पाहिजे.
विमा कंपनी घेईल सर्व जबाबदारी -
अपघाताबद्दल विमा कंपनीला सर्व माहिती द्या. त्यासोबत पॉलिसी नंबरची सर्व माहिती द्या. अपघातात जर कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर यासाठी तुमची कोणतीही जबाबदारी असणार नाही. सर्व जबाबदारी विमा कंपनीची असेल आणि ते आपला खटला कोर्टात लढवतील.
विम्याच्या माध्यमातून किती नुकसान भरपाई मिळते -
कलम 2-1(आय) अधिनियमात असे म्हटले आहे की, जर आपल्या गाडीच्या धडकेत कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर जास्तीत जास्त रक्कम दिली जाते. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 2-1 नुसार नुकसानीसाठी थर्ड पार्टीला 7.5 लाख रुपयांपर्यंत कव्हर करावे लागते.
कोर्टात योग्य माहिती द्या -
जर तुम्हाला कोर्टाकडून समन्स मिळालं असेल तर तुम्ही कोर्टात हजर राहा आणि अपघाताबाबत योग्य माहिती द्या. अपघात कसा झाला याचा नकाशा तयार करुन तुम्ही कोर्टाला देऊ शकता. तुम्ही अचूक माहिती दिली तर खटल्याचा निकाल लवकर लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं आवश्यक -
जर तुमच्या गाडीने अपघात झाला असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी विमा कंपनी घेईल. त्यासाठी गाडी चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. जर असं नसेल तर विमा कंपनी दावा स्वीकारणार नाही आणि सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल.
मद्यपान केले असेल तर अवघड होईल-
मद्यपान केल्यानंतर जर तुमच्या गाडीचा अपघात झाला आणि अपघातात कोणी जखमी किंवा त्याचा मृत्यू झाला तर तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकता. अशा परिस्थितीत विमा कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदारी तुम्हाला उचलावी लागेल आणि तुम्हालाच कोर्टात खटला लढवावा लागेल.
निष्काळजीपणा पडेल महागात -
गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका. जर पोलीस तपासात तुम्ही निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचं कळालं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. नवीन मोटर कायद्यात तीन वर्षांपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा नमूद करण्यात आली आहे. तसंच, मोटारवाहन कायद्याच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन केल्यास तुमच्या अडचणी वाढतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Road accident