मुंबई, 09 जुलै: कोरोनाव्हायरसमधून (Coronavirus) बऱ्या झालेल्या रुग्णांना इतर बऱ्याच समस्यांना (Post covid complication) सामोरं जावं लागतं आहे. गंभीर समस्येत फंगल इन्फेक्शननंतर आता बोन डेथचाही (Bone death) समावेश झाला आहे. कोरोनामुक्त रुग्ण हाडांच्या समस्या घेऊन येत आहेत. त्यापैकी अनेकांना अगदी चालणं-फिरणंही शक्य होत नाही आहे.
बोन डेथ ज्याला वैद्यकीय भाषेत एव्हास्क्युलर नेक्रोसिस (Avascular Necrosis) म्हटलं जातं. जसं ब्लड क्लॉट किंवा रक्ताच्या गुठळ्या झाल्याने शरीराच्या इतर भागाचा रक्तपुरवठा होतो आणि ते अवयव निकामी होतात, अगदी तसंच हाडांसोबत होतं. एव्हीएन (AVN) या आजारात हाडांपर्यंत रक्त पोहोचणं बंद होतं आणि त्याठिकाणच्या पेशी मृत होतात.
बोन डेथची कारणं
ज्या रुग्णांना कोरोनाचं गंभीर संक्रमण झालं होतं आणि ज्यांना सर्वात जास्त स्टेरॉईड घ्यावं लागलं, अशा रुग्णांनाच ही समस्या बळावत आहे. अशा लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. इतर अवयवांप्रमाणे त्यांचा हाडांनाही धोका असतो.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीधर आर्चिक यांनी सांगितलं, "बोन डेथ हा आजार आम्हा हाडांच्या डॉक्टरांसाठी नवीन नाही. अति मद्यपान किवा स्टेरोइड्सचा अति वापर ही त्याची दोन मुख्य कारणं आहेत. जवळ जवळ 50 % लोकांमध्ये मात्र काहीच कारणं सापडत नाही. कोविडची साथ सुरू झाली आणि स्टेरॉइड्सचा वाढता वापर बघता आम्हाला या आजाराचे बरेच नवीन रुग्ण सापडणार असं दिसून आलं"
बोन डेथची लक्षणं
बोन डेथचं निदान लगेच होत नाही. सुरुवातीला सांध्यांमध्ये वेदना होतात. विशेषतः हिपच्या सांध्यांमध्ये अधिक वेदना होतात. रुग्णाला चालायलाही त्रास होतो. 50-60 प्रकरणात हा आजार हिपच्या जॉईंटवरच परिणाम करतो.
हे वाचा - कोरोनानंतर आता आणखी एक व्हायरस; Cytomegalovirus चे 6 रुग्ण सापडल्याने खळबळ
हाडांना रक्तप्रवाह कमी होत आहे, याचं निदान एमआरआयमध्ये होतं. साध्या एक्स-रेमधून याचं निदान होत नाही. त्यामुळे जर तुम्ही कोरोना संक्रमणता स्टेरॉईड घेतलं असेल आणि याआधी तुम्हाला आर्थरायटिसची समस्या नसेल तर हिप किंवा इतर सांध्यांमध्ये वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
बोन डेथवर उपचार
सुरुवातीलाच या आजाराचं निदान झाल्यास औषधाने बरा होतो. तीन ते सहा आठवड्यातच औषधांचा परिणाम दिसतो. पण जर आजार वाढला तर सर्जरी करण्याची वेळ ओढावते.
हे वाचा - एका कोरोनाव्हायरसची कितीतरी रूपं; नेमकं समजतं तरी कसं हा नवा Corona variant?
"अगदी प्राथमिक अवस्थेत आम्ही या आजारावर स्टेम सेल्सचा वापर करतो. हा आजार जास्त पुढे गेला तर पूर्ण सांधा निकामी होतो आणि मग तो बदलून कृत्रिम सांधेरोपण हा एकच पर्याय उपलब्ध राहतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर जर कोणला जांघेमध्ये दुखू लागलं, मांडी घालताना त्रास होऊ लागला किंवा जिने चढताना वेदना होऊ लागल्या तर तज्ज्ञाला जरूर भेटा. हा आजार जितक्या लवकर कळतो तेवढी तितके त्यावर उपचार करणं सोपं होतं", असं डॉ. श्रीधर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Covid-19, Health