नवी दिल्ली, 1 डिसेंबर : राज्यसभेच्या (Rajya Sabha) हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सोमवारी 12 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, तृणमूलसह शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत पहिल्यांदाच इतक्या खासदारांवर एवढी कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष संतापले आहेत, पण राज्यसभेचे काही नियम आहेत, जे सदस्यांनी पाळले पाहिजेत. अशा काही गोष्टी ज्या राज्यसभेत कधीही करू नयेत.
काय करू नये याबाबत राज्यसभेत नियम आहे. हे नियम प्रत्येक खासदाराला राज्यसभेवर निवडून आल्यावर पाळावे लागतात. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हाणामारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी नियम 256 अंतर्गत या 12 खासदारांना निलंबित केलं आहे.
राज्यसभेच्या नियमांनुसार, अशा कोणत्या 9 गोष्टी आहेत, ज्या राज्यसभेचे सदस्य वरच्या सभागृहात करू शकत नाहीत. जर त्यांनी या नियमांचे उंल्लघन केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. या सदस्यांच्या काही जबाबदाऱ्याही आहेत.
त्या 9 गोष्टी काय आहेत?
या गोष्टी राज्यसभेच्या नियमावलीमध्ये नियम 235 अंतर्गत नोंदवल्या जातात, ज्याचे पालन प्रत्येक राज्यसभा सदस्याने अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान करणे अपेक्षित आहे.
जेव्हा राज्यसभेची बैठक सुरू असते :-
1. राज्यसभेच्या कामकाजाशी संबंधित नसलेले कोणतेही पुस्तक, वर्तमानपत्र किंवा पेपर वाचू नये.
2. सभागृहात कोणताही सदस्य भाषण देत असेल तर गोंधळ घालणे किंवा इतर कोणतंही कृत्य करुन अडथळा आणू नये.
3. राज्यसभेत प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना आणि त्यांच्या आसनावर बसताना किंवा तेथून उठताना खुर्चीला नमन करावे.
4. जेव्हा अध्यक्ष किंवा सदस्य भाषण देत असतील तेव्हा त्यांच्यामधून जाऊ नये.
5. अध्यक्ष राज्यसभेला संबोधित करत असताना सभागृह सोडू नये.
6. नेहमी अध्यक्षांना संबोधित करावे.
7. राज्यसभेला संबोधित करताना सदस्यांनी त्यांचं स्थान सोडू नये.
8. इतर बोलताना राज्यसभेत शांत बसावे
9. कार्यवाहीत अडथळा आणणार नाही, गडबड करणार नाही, राज्यसभेत भाषणे होत असताना ती शांतपणे ऐकून घ्यावी.
सहसा हे नियम मोडत राहतात
हे नियम निश्चितच बनवले जात असले तरी राज्यसभेतील कामकाजादरम्यान हे सर्व नियम मोडणे नित्याचे झाले आहे. शिस्तीच्या दृष्टिकोनातून सदस्यांनी या नियमांचे थोडेफार उंल्लधन केलं तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु, अधिक गोंधळ किंवा तोडफोड करण्यासाठी कारवाई केली जाते.
नियम 256 काय आहे?
1. सभापीठाच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास किंवा वारंवार आणि जाणूनबुजून राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणला जात असेल तर सभापती अशा सदस्याचे निलंबन करू शकतात.
2. सभापती एखाद्या सदस्याला अधिवेशन संपेपर्यंत किंवा ठराविक कालावधीपर्यंत राज्यसभेच्या सेवेतून निलंबित करू शकतात.
राज्यसभा नियम 255 नुसार निलंबन कसे होते?
जर एखाद्या सदस्याचे वर्तन अत्यंत अव्यवहार्य असल्याचे अध्यक्षांना वाटत असेल तर ते त्याला राज्यसभा सोडण्याचे निर्देश देऊ शकतात. या नियमांतर्गत निलंबन फक्त त्या दिवसासाठी लागू असेल. त्यात त्या सदस्याला सभागृहाबाहेर राहावे लागेल.
हे निलंबन पूर्ववत करता येईल का?
हो, परंतु, हे राज्यसभेच्या अध्यक्षांच्या इच्छेनुसार होईल. निलंबित सदस्यांनी माफी मागितल्यानंतरही ती मागे घेतली जाऊ शकते. तसे, निलंबनाविरोधातही सभागृहात प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तो पास झाल्यास, निलंबन आपोआप उठवले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parliament session, Winter session, राज्यसभा