नवी दिल्ली, 13 जुलै: स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि स्वातंत्र्यानंतरही 60 वर्षांहून अधिक काळ देशाची सत्ता हाती असलेल्या काँग्रेस पक्षाची (Congress) 2014पासून वाताहत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या त्या वेळी आलेल्या लाटेत काँग्रेस पक्ष जणू वाहूनच गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली. त्याची पुनरावृत्ती 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाली. त्यामुळे काँग्रेसची अवस्था दयनीय झाली. त्यातही नेहरू-गांधी घराण्याचं वर्चस्व असलेल्या या पक्षाचे पुढचे वारसदार म्हणून राहुल गांधी यांना पक्षाची पसंती असली, तरी ते स्वतः मात्र त्यासाठी राजी नाहीत. अखेर आधीपासून राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वद्रा (Priyanka Gandhi-Vadra) याही पक्षकार्यात सहभागी झाल्या असून, गांधी घराण्यातल्या नेत्यांकडे जे मूलभूत वलय असतं ते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा करिष्माही दिसू लागला. अलीकडे मात्र राहुल (Rahul Gandhi) आणि प्रियांका या काँग्रेसच्या पुढच्या पिढीतल्या भावंडांमध्ये पक्षाचं नियंत्रण आपल्या हाती मिळवण्यावरून वाद होत असल्याच्या बातम्या काँग्रेसच्या सूत्रांच्या (Congress Sources) हवाल्याने अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार रशीद किडवई यांनी मात्र अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं सांगून या दोन्ही भावंडांमधलं बाँडिंग (Bonding) घट्ट असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
'व्हाइब्ज ऑफ इंडिया' नावाच्या पोर्टलवर रशीद किडवईंनी याबद्दलचा लेख लिहिला आहे. आगामी निवडणुका, पक्षसदस्यांना सांभाळणं अशा प्रत्येक बाबतीत प्रियांका आणि राहुल यांची धोरणं वेगवेगळी असतात, असंही सांगितलं जातं. त्या दोघांमध्ये वाद आहेत किंवा वाद होण्याची शक्यता आहे, या भाकिताला दुजोरा देण्यासाठी वरची उदाहरणं दिली जातात.
शरद पवारांनंतर आता प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला
प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वाद नाही आणि होण्याची फारशी शक्यता नाही हे काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेघेइतकं स्पष्ट आणि उघड सत्य आहे, असं किडवई म्हणतात. पंजाब, राजस्थानमधल्या काँग्रेसपुढच्या समस्या आणि पक्षापुढचे अन्य प्रश्न सोडवण्यात प्रियांका गांधी यांनी घेतलेली सक्रिय भूमिका ही केवळ राहुल गांधींना भक्कम पाठिंबा देण्यासाठीच आहे, असं किडवई आपल्या लेखात लिहितात. कारण प्रियांका यांचा राजकारणातला प्रवेशच मुळी राहुल यांना साह्य करण्यासाठी झाला आहे. त्यांच्या दोघांमधलं भावा-बहिणीचं नातं इतकं घट्ट आहे, की त्यात मार्गदर्शनासाठी आई सोनिया गांधी वगळता अन्य तिसऱ्या कोणाही व्यक्तीला प्रवेश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
महाविकास आघाडीतला वाद निवळला? शरद पवार यांच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी!
आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी गांधी घराण्याशी (Gandhi Family) जवळीक असावी असं ज्यांना वाटतं, अशा काही व्यक्तींमुळे राहुल-प्रियांकामधल्या मतभेदांच्या बातम्यांना खतपाणी घातलं जात आहे. तसंच, पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात असल्याचा दावा करणारे, मात्र प्रियांका-राहुल यांच्यापैकी कोणालाही थेट भेटता येऊ न शकणारेही काही नेते आहेत. अशा व्यक्तीही या चर्चांना हवा देतात.
सोनिया, राहुल आणि प्रियांका या तिन्ही नेत्यांची माध्यमांशी जवळीक नाही. त्यांचे स्वतःचे माध्यम सल्लागारही नाहीत. दिल्लीतल्या काही स्वयंघोषित एन्फ्लुएन्सर्सनी किंवा तज्ज्ञांनी तसं बनण्याचा प्रयत्नही केला होता; मात्र या तिन्ही नेत्यांपुढे कुणाचीच डाळ शिजली नाही, असंही किडवईंनी आपल्या लेखात लिहिलं आहे.
स्वतंत्र भारताच्या 74 वर्षांच्या इतिहासात गांधी घराण्यातल्या सदस्यांनी 59 वर्षं पक्षाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे गांधी घराण्याशी पक्षसदस्य एकनिष्ठ आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनात कोणतेही प्रश्न नाहीत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी अशा सगळ्यांनी ती परंपरा कायम राखली आहे. राहुल आणि आता प्रियांका यांनीही पक्षातल्या नेत्यांचे हे समज योग्य असल्याचं सिद्ध करण्याची गरज आहे. नेहरू-गांधी घराण्यातल्या व्यक्तींनी जोडीने काम करण्याचा इतिहासही काँग्रेस पक्षाला आहे.
1959 साली इंदिरा गांधी पक्षाच्या प्रमुख बनल्या. प्रमुखपदाच्या काळात त्यांनी देशातले पहिले कम्युनिस्ट मुख्यमंत्री ईएमएस नंबुद्रीपाद यांचं सरकार पाडण्यापासून महाराष्ट्र, गुजरात राज्यांच्या निर्मितीच्या शिफारशीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले; पण मुदत संपल्यावर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती होऊनही त्यांनी ते स्वीकारलं नाही. इंदिरा यांचे पुत्र संजय यांना संघटनात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांच्या बाबतीत इंदिरांच्या बरोबरीने मानलं जात असे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधी (Rajeev Gandhi) काँग्रेसचे प्रमुख होते. इंदिरा यांच्या मंत्रिमंडळातले बरेच मंत्री त्यांच्या कार्यालयाबाहेर दिसत. त्यांच्या शब्दाला मान होता.
सोनिया आणि राहुल यांच्यात 2006 ते 2017 या कालावधीत असलेल्या प्रोफेशनल नात्यात स्पष्ट विभक्तपणा दिसत होता, असं किडवई म्हणतात. 2014 ते 2020 या कालावधीत या दोघांच्या जोडीने अनेक पराभव पचवले. त्यांच्या मदतीला म्हणून प्रियांका होत्या.
राहुल गांधी जेव्हा पूर्ण वेळ काँग्रेस अध्यक्ष होतील, तेव्हा प्रियांका गांधींची भूमिका अधिक व्यापक व्हावी, अशी पक्षनेत्यांची इच्छा आहे. राहुल यांच्या निर्णयांवर प्रियांका यांचा प्रभाव असतो. तसंच, देशभरातल्या पक्षनेत्यांशी त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे राहुल आणि प्रियांका यांच्यात वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता फार कमी आहे, असं किडवई सांगतात.
प्रियांका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली गेल्यास राहुल यांना बळकटी मिळेल आणि ज्योतिरादित्य शिंदेंसारख्या बंडखोरांच्या वाटेत अडचणी निर्माण होतील, असं किडवई यांना वाटतं.
'मुलाची शपथ घेऊन सांग भाजपलाच मतदान केलं, तरच वीज जोडणार'; आमदाराचा VIDEO VIRAL
सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष असल्याने त्यांचे हात बांधलेले असतील. राहुल यांचा डोळा अध्यक्षपदावर असला, तरीही ते विजयाची आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत असं दिसत नाही. तसंच, पक्षनेत्यांना सामावून घेण्यात, त्यांच्याशी संवादात राहुल फारसे सक्रिय नाहीत. या आधी गांधी घराण्यातल्या ज्या व्यक्तींनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आणि त्या व्यतिरिक्त माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, सीताराम केसरी त्यांच्यासारख्यांनीही हे पद भूषवलं पण ते नेत्यांच्या संपर्कात रहायचे त्यांच्याशी संवाद साधायचे. त्याबाबतीत राहुल यांच्या सवयी विसंगत आहेत. सद्यस्थितीत अनेक पक्षांचं सरकार आणायचं म्हटलं तर या सवयी खूप फायद्याच्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असं वाटत असल्याचं रशीद किडवई यांनी त्या लेखात लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Priyaka gandhi, Rahul gandhi