डॉ. चंद्रकांत लहरिया/मुंबई, 03 जून: ब्लॅक फंगसला (Black Fungus) सध्या अशा एका रोगासाठी कारणीभूत ठरवलं गेलं, जो वास्तविक त्यामुळे झालाच नव्हता. कोविड-19 च्या (Covid-19) दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) कहर सुरू असतानाच काही वेगळ्या लक्षणांची लाट आली. ताप, डोकेदुखी, कफ, डोळे-नाकात वेदना आणि लाली, श्वास लागणं, नाकावर काळा रंग दिसणं, मानसिक विभ्रम, रक्ताची उलटी अशा लक्षणांचा त्यात समावेश होता. अनेक कोविड रुग्ण यामुळे ग्रस्त झाले.
नाकावर दिसणाऱ्या काळ्या रंगासाठी किंवा अन्य लक्षणांसाठी ब्लॅक फंगसच कारणीभूत आहे, हे ठामपणे सांगता येणं कठीण आहे. तो बुरशीजन्य रोग आहे, हे खरं; पण तो ब्लॅक फंगसमुळे झालेला नाही. भारतात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान आढळलेला रोग हा म्युकरमायकॉसिस (Mucormycosis) किंवा झायकोमायकॉसिस आहे. तो म्युकरमायसीट्स नावाच्या बुरशीच्या गटामुळे झालेला आहे.
- बुरशी (Fungi) म्हणजे काय?
- बुरशी म्हणजे असे जीव की ज्यात यीस्ट्स, मोल्ड्स आणि मशरूमचा समावेश असतो. जैविक वर्गीकरणानुसार त्यांचा गट वनस्पती, प्राणी आणि प्रोटोझोआ यांच्यापेक्षा वेगळा असतो. बहुतांश प्रकारची बुरशी निरुपद्रवी असते. त्यातल्या अनेक प्रकारच्या बुरशी आपल्या आजूबाजूला आढळतात. ओल्या भिंती, काही वनस्पती, माती, झाडांची गळलेली पानं आदींवर बुरशी आढळतात. हेल्दी माणसाची रोगप्रतिकारक यंत्रणा अशा बुरशीशी लढण्याच्या दृष्टीने तयार असते.
- ब्लॅक फंगस आणि म्युकरमायसीट्समध्ये काय फरक आहे?
- ब्लॅक फंगसला ब्लॅक यीस्ट म्हणूनही ओळखलं जातं. ती हळू वाढणारी आणि पिग्मेंट तयारी करणारी बुरशी आहे. त्वचेच्या विकारामुळे किंवा सिस्टिक फायब्रॉसिस असल्यास किंवा श्वासातून शरीरात गेल्यास काही वेळा या बुरशीमुळे आजार होऊ शकतो. म्युकरमायसीट्समध्ये (Mucormycetes) नाक आणि चेहऱ्यातल्या सायनसेसना, आतड्यांना आणि मेंदूला संसर्ग करण्याची क्षमता असते.
- म्युकरमायकॉसिसची समस्या किती मोठी आहे?
- कोविड-19च्या संसर्गापूर्वीही म्युकरमायकॉसिसच्या केसेस दर वर्षी एक लाखांमागे 14 जणांमध्ये आढळत होत्याच. जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या अभ्यासानुसार भारतातल्या म्युकरमायकॉसिसच्या केसेसमध्ये किंचित वाढ झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली. संपूर्ण भारतात सुमारे 11 हजार केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे म्युकरमायकॉसिसला एपिडेमिक डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
- कोविड-19च्या प्रत्येक रुग्णाला म्युकरमायकॉसिसचा धोका आहे का?
- एक एप्रिल ते 31 मे या कालावधीत भारतात 1.6 कोटी कोविड-19 रुग्ण आढळले. या कालावधीत भारतात म्युकरमायकॉसिसचे 11 हजार रुग्ण सापडले. त्यामुळे म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांची संख्या कोविड रुग्णांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे; मात्र जेव्हा कोविड रुग्णांमध्ये आढळतो, तेव्हा त्याचं रूप अधिक गंभीर होतं. त्यात मृत्युदर 50 टक्के आहे. त्यामुळे त्या रोगाला एपिडेमिक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
हे वाचा - कोरोनाव्हायरसमुळे Diabetes चा धोका आहे का? संशोधनात समोर आली महत्त्वाची माहिती
म्युकरमायकॉसिसला चुकीने ब्लॅक फंगस म्हणून समजलं गेल्यामुळे काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली. तरीही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की कोविड-19 होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्युकरमायकॉसिस होण्याची भीती नाही.
- म्युकरमायकॉसिसचा धोका कोणाला?
- ज्यांचा डायबेटीस (Diabetes) अनियंत्रित आहे, ज्यांना एचआयव्ही किंवा कॅन्सरवरचे उपचार सुरू आहेत, स्टेरॉइड थेरपी (Steroid Therapy) सुरू आहे, ज्या व्यक्ती बराच काळ आयसीयूमध्ये आहेत आणि एकंदरीतच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना म्युकरमायकॉसिस होण्याची शक्यता आहे.
- म्युकरमायकॉसिस आहे, असं केव्हा मानावं?
- मध्यम ते गंभीर स्वरूपाचा कोविड-19 असेल तर म्युकरमायकॉसिसचा धोका असू शकतो. हेल्दी व्यक्तीने किंवा सौम्य कोरोना असलेल्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही.
- डोळे आणि/किंवा नाक यांमध्ये वेदना किंवा लालसर होणं, ताप
- नाक चोंदणं, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त स्राव बाहेर येणं, गालाच्या हाडांवर वेदना
- एका बाजूने चेहऱ्याला वेदना, सूज, बधीर होणं
- दातदुखी, दात सैल होणं
- वेदना आणि धूस दिसणं, त्वचेवर चट्टे
- छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं
- मानसिक त्रास, विसरायला होणं
अशी किंवा यांपैकी कोणतंही लक्षणं दिसत असल्यास दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांशी चर्चा करावी.
- म्युकरमायकॉसिसवर उपचार
- खासकरून अँफोटेरिसिन बी (Amphoterecin B) यासारख्या अँटीफंगल औषधाचा उपयोग केला जातो. गंभीर रुग्णांमध्ये सर्जरी करावी लागू शकते. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच स्टेरॉइड्सचा वापर कमी करणं गरजेचं आहे. पेशंटवर घरी उपचार करणं टाळायला हवं.
- म्युकरमायकॉसिसला प्रतिबंध कसा करावा?
- बाहेर जाताना मास्क अत्यावश्यक. बूट घालणं, मातीकाम करताना किंवा धुळीच्या संपर्कात येताना फुलपँट घालणं, फुलशर्ट घालणं आवश्यक. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं गरजेचं. प्रत्यक्ष लक्षणं दिसल्याशिवाय अँटीफंगल औषधं घेऊ नयेत. जास्त धोका असलेल्यांनी कोणतीही लक्षणं दिसली, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- बुरशीचा रंग
- बुरशी अनेक रंगांची असते. तिच्या रंगावर रोगाची तीव्रता अवलंबून नसते. त्यामुळे बुरशीजन्य रोगांना बुरशीच्या रंगावरून ओळखणं योग्य नाही.
- पुढे काय?
- सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांच्या वाढीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कोविड-19ची लाट ओसरत असल्यामुळे म्युकरमायकॉसिसही आटोक्यात येईल, अशी शक्यता आहे; मात्र त्यासाठी तयारीत राहणं गरजेचं आहे. म्युकरमायकॉसिस हेल्दी माणसाला होण्याची शक्यता अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. त्यावर उपचार करणं शक्य आहे.
हे वाचा - अरे बापरे! फंगसनंतर आता गँगरीनचा धोका; कोरोना रुग्णांवर नवं संकट
(लेखक सार्वजनिक धोरणं आणि आरोग्य यंत्रणा या विषयातले तज्ज्ञ आहेत. 'टिल वुई विन : इंडियाज फाइट अगेन्स्ट द कोविड-19' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Health, Serious diseases