Explainer : कोविड रुग्णांना होणारा Mucormycosis आजार नेमका आहे तरी काय?

Explainer : कोविड रुग्णांना होणारा Mucormycosis आजार नेमका आहे तरी काय?

म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) हा दुर्मिळ आणि गंभीर असा आजार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे कहर केलेला असताना म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने (Fungal Infection) भीती पसरवली आहे. कोविड-19 मधून (Covid 19) बऱ्या होत असलेल्या काही रुग्णांना काळ्या बुरशीमुळे (Black Fungus) होत असलेल्या म्युकॉर्मायकॉसिसच्या घटना महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आदी अनेक राज्यांत आढळू लागल्या आहेत. या रोगामुळे त्वचा, फुप्फुसं आणि मेंदूमध्ये संसर्ग होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कोविड-19 नॅशनल टास्क फोर्सने या रोगासंदर्भातल्या काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

हा संसर्ग दुर्मिळ असला, तरी अत्यंत घातक आहे. म्युकॉरमायसीट्स (Mucormycetes) नावाच्या वातावरणातच उपस्थित असलेल्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ज्या व्यक्तींची नैसर्गिक सूक्ष्मजीवांशी (Natural Pathogens) लढण्याची प्रतिकारशक्ती (Immune System) त्यांच्या अन्य आरोग्य समस्यांमुळे कमकुवत होते, अशा व्यक्तींना हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. या बुरशीचं वातावरणात अस्तित्व असतं. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, अशा व्यक्तींच्या श्वासोच्छ्वासाद्वारे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर त्यांचे सायनसेस किंवा फुप्फुसांमध्ये संसर्ग होऊ शकतो. प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग होण्याचा धोका फारसा नाही, असंही डॉक्टर्सनी स्पष्ट केलं आहे.

म्युकॉर्मायकॉसिसची लक्षणं

डोळे दुखणं, डोळ्यांभोवती किंवा नाकाभोवती लालसरपणा, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास लागणं, रक्ताच्या उलट्या, मानसिक अस्वस्थता ही म्युकॉर्मायकॉसिसची प्राथमिक लक्षणं असू शकतात.  टास्क फोर्सने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खालील लक्षणं दिसली तर म्युकॉर्मायकॉसिसची शंका घ्यायला वाव आहे.

हे वाचा - कोरोना काळात धोकादायक ठरू शकतात असे Fungus diseases

सायनुसायटिस : नाक चोंदणं,नाकातून काळसर,रक्ताळलेला स्राव बाहेर पडणं

गालाच्या हाडांना दुखी, चेहरा एका बाजूने दुखणं, सूज येणं

दोन नाकपुड्यांच्या मधल्या भागात काळसर रंग किंवा रंगहीनता दिसणं

दात, जबड्याचं कार्य शिथिल झाल्यासारखं वाटणं

अंधूक दिसणं किंवा प्रत्येक गोष्टी दोन दिसणं आणि डोळे दुखणं

त्वचेवर चट्टे, डाग

छातीत दुखणं

श्वसनयंत्रणेतली लक्षणं तीव्र होणं

नाक चोंदण्याच्या सगळ्याच केसेसमध्ये सायनुसायटिस असल्याची शंका घेऊ नये. मात्र तो बुरशीजन्य संसर्ग आहे का, हे तपासण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

निदान

शरीरात कोणत्या ठिकाणी संसर्ग झाला आहे, यावर निदान पद्धती अवलंबून आहे. श्वसन यंत्रणेतल्या स्रावाचा नमुना प्रयोगशाळेत तपासून घेता येऊ शकतो. तसंच फुप्फुसं, सायनसेसचा सीटी स्कॅन किंवा टिश्यू बायोप्सी आदी पद्धतींद्वारे या आजाराचं निदान होऊ शकतं.

म्युकॉर्मायकॉसिस उपचार

हा बुरशीजन्य संसर्ग असल्यामुळे अँटीफंगल औषधं वापरली जातात. मात्र यासंसर्गावर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

डायबेटीस नियंत्रणात ठेवणं, स्टेरॉइड्सचा वापर कमी करणं आणि इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रग्ज थांबवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर्स म्हणतात.

चार ते सहा आठवडे amphotericin B आणि अँटीफंगल थेरपी (Antifungal Therapy) देण्याआधी नॉर्मल सलाइन दिल्यास शरीरातलं पाण्याचं प्रमाण राखलं जातं.

हायपरग्लायसेमिया अर्थात रक्तातली साखरेची पातळी (Hyperglycemia) जास्त असणारा विकार नियंत्रणात ठेवला पाहिजे. तसंच कोविड-19 उपचारांनंतर आणि डायबेटीस असलेल्यांनीही रक्तातली साखरेची (Blood Glucose Level) पातळी सतत तपासत राहिलं पाहिजे, यावर टास्क फोर्समधल्या शास्त्रज्ञांनी भर दिला आहे.

स्टेरॉइड्सचा (Steroids) वापर करायचा झाल्यास योग्य वेळी योग्य डोस आणि योग्य कालावधीनंतर दिला पाहिजे, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

म्युकॉर्मायकॉसिस असलेल्या कोविड रुग्णांना बरं करण्यासाठी मायक्रोबायोलॉजिस्ट्स, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट्स, इन्टेसिव्हिस्ट न्यूरॉलॉजिस्ट, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ आणि जबड्याचे सर्जन्स/प्लास्टिक सर्जरीकरणारे सर्जन्स अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमची आवश्यकता असते.

म्युकॉर्मायकॉसिसचा तीव्र संसर्ग झाला तर काही रुग्णांचे डोळे, तर काही रुग्णांचा वरचा जबडा काढावा लागू शकतो. त्यामुळे चावायला, गिळायला अडचणी निर्माण होऊ शकतात. चेहऱ्याचं रूप बदलू शकतं आणि त्यामुळे न्यूनगंड तयार होऊ शकतो.

हे वाचा - साधं कृमीनाशक औषध Ivermectin संपवू शकतं कोरोनाची महासाथ; शास्त्रज्ञांचा दावा

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जबड्याच्या शस्त्रक्रियेतले तज्ज्ञ असलेले डॉ. बी. श्रीनिवासन म्हणतात, की शस्त्रक्रियेनंतर रुग्ण या संसर्गातून पूर्ण बरा झाला, की त्याच्या काढलेल्या डोळ्याच्या किंवाजबड्याच्या जागी कृत्रिम अवयव बसवता येतात. त्यामुळे रुग्णाला भीती न घालता या उपायांची माहिती देऊन आश्वस्त केलं पाहिजे. याला Prosthetic reconstruction असं म्हणतात.

प्रतिबंध कसा करावा?

प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की हा एक दुर्मिळ आजार आहे. अनियंत्रित डायबेटीस, स्टेरॉइड औषधांचा वापर, अतिदक्षता विभागात बराच काळ असलेले रुग्ण किंवा अन्य सहव्याधी असलेले रुग्ण अशा व्यक्तींना हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

धूळ उडत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी किंवा तशाच अन्य ठिकाणी काम करणाऱ्यांनी मास्क वापरला पाहिजे.

तसंच बूट, लांब पँट, लांब बाह्यांचे शर्टस्, मातीत - बागेत काम करताना ग्लोव्ह्ज घालणं आवश्यक आहे.

वैयक्तिक स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

First published: May 11, 2021, 6:21 PM IST

ताज्या बातम्या