Explainer : संप्रदाय तसंच पंथानुसार भारत आणि अफगाणिस्तानातल्या मुस्लिमांमध्ये काय आहे फरक?

Explainer : संप्रदाय तसंच पंथानुसार भारत आणि अफगाणिस्तानातल्या मुस्लिमांमध्ये काय आहे फरक?

भारताप्रमाणेच अफगाणिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिमांचे बाहुल्य आहे. सुमारे 90 टक्के लोकसंख्या सुन्नी आहे. या सुन्नी मुस्लिमांमध्ये हनफी मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 ऑगस्ट : जगभरात दहशतवाद पसरलेला आहे आणि काही देश त्याचा सामना करत आहेत तर काही देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. ही परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून आहे. भारताने आता कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका जागतिक पटलावर मांडली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्यायलाही आता भारत मागे-पुढे पाहत नाही. सध्या अफगाणिस्तानात अराजक माजलं आहे. अमेरिकेनं (USA) आपलं सैन्य काढून घेतल्यानं 20 वर्षांनंतर तालिबानने (Taliban) पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला आहे आणि आता काही दिवसांत त्यांचं सरकार तिथं स्थापन होईल. याचा परिणाम जागतिक राजकारणावर होणार असल्यानं सर्वत्र अफगाणिस्तानातील परिस्थितीची चर्चा रंगू लागली आहे.

आपल्या देशातही याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे संप्रदाय, पंथानुसार भारत आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांमध्ये (Muslim) काय फरक आहे? एबीपी लाईव्ह डॉट कॉमनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

आपल्याला हे माहीत आहे की मुस्लिम धर्मात शिया आणि सुन्नी हे दोन प्रमुख पंथ आहेत; मात्र मुसलमान या दोन मोठ्या गटांशिवाय अन्य काही पंथ, उपपंथ आणि संप्रदायात विभागले गेले आहेत. शिया आणि सुन्नींमध्येही अनेक उपपंथ आहेत. असं असलं तरी जगातील सर्व मुसलमानांची तीन बाबीवर गाढ श्रद्धा आहे. एक म्हणजे अल्लाह (म्हणजे सर्वांचा स्वामी एकच आहे, एकच देव आहे. दुसरा कोणी नाही), दुसरी बाब म्हणजे एक कुराण (अल्लाहचा उपदेश असलेला ग्रंथ) आणि तिसरी बाब म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर (अल्लाहचा शेवटचा दूत, त्याच्यानंतर कोणताही दूत आला नाही आणि कधीही येणार नाही अशी मुस्लिमांची धारणा असते). मात्र या बाबी वगळता अन्य मुद्द्यांवर मतभेद असल्यानं त्यांच्यात अनेक पंथ, उपपंथ निर्माण झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला...

इस्लामी कायद्यानुसार (Islamic Act) सुन्नींमध्ये चार उपपंथ आहेत. हनफी, मलिकी, शफाई आणि हंबली. याशिवाय सलफी किंवा अहल-ए-हदीस किंवा वहाबी पंथही आहेत. त्याशिवाय आणखी काही लहान पंथ आहेत. हनफीमध्ये देवबंदी आणि बरेलवी पंथदेखील आहेत. शिया मुस्लिमांमध्येही इसना अशरी, झैदिया आणि इस्माइली शिया या मुख्य पंथासह हजारा, खोजा आणि नुसेरी असेही उपपंथ आहेत.

भारतात शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथाचे मुस्लिम असून, 80 ते 90 टक्के मुस्लिम सुन्नी आहेत. त्यात हनफी आणि सलाफी किंवा वहाबी असे पंथ आहेत. मात्र भारतात वहाबी इस्लामच्या अनुयायांची संख्या फार कमी आहे. हनफी मुस्लिमांमध्ये देवबंदी आणि बरेलवी असे दोन प्रकार आहेत. हनफी मुसलमानांमधील सूफी पंथाचे मुस्लिमदेखील भारतात आहेत. सूफी पंथाचे काद्रिया, चिश्तिया, सोहरवर्दी आणि नक्षबंदी असे चार प्रमुख उपपंथ आहेत. तर इस्ना आशारी मुस्लिमांमध्ये शियांची संख्या मोठी आहे. याशिवाय इस्माइली, बोहरा आणि झैदिया पंथाचे लोकदेखील आहेत.

भारताप्रमाणेच अफगाणिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिमांचे बाहुल्य आहे. सुमारे 90 टक्के लोकसंख्या सुन्नी आहे. या सुन्नी मुस्लिमांमध्ये हनफी मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. तालिबान (Taliban) ही अफगाणिस्तानातील कट्टर हनफी मुस्लिमांचीच संघटना आहे. भारतात आणि अफगाणिस्तानात सूफी इस्लामचा प्रभाव वाढत आहे. हजरा शिया मुस्लिमांची लोकसंख्या तिथंही खूप कमी आहे.

तालिबानकडे इतका पैसा येतो तरी कसा; अफाट पैसा आणि शस्त्रास्त्रे कशी येतात?

यावरून हे लक्षात येतं की भारत आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांमध्ये कोणताही मोठा फरक नाही. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुस्लिम पंथातील मतभेदांवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. या समानतेचा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध चांगले करण्यास मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही.

कोणत्याही देशाचा आत्मा असतो तिथली जनता. जनता सुखात असेल तर देश सुरळीतपणे चालतो. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता तिथला राज्य कारभार कसा चालेल हे आताच सांगता येणं कठीण आहे पण भारतीय परराष्ट्र धोरण मात्र सावधगिरीचं आहे. त्यामुळेही दोन्ही देशांचे संबंध चांगले राहतील असं म्हणता येईल.

First published: August 17, 2021, 3:00 PM IST

ताज्या बातम्या