नवी दिल्ली, 24 जून : आपल्या शरीरात एखाद्या विषाणूविरुद्ध (Virus) लढण्यासाठी तयार होणाऱ्या अँटिबॉडिजवरून (Antibodies) रोगप्रतिकारक शक्तीचा (Immunity) अंदाज घेतला जातो. या अँटिबॉडिजना शास्त्रीय भाषेत Microscopic Protein Components असंही म्हटलं जातं. एखादा विषाणू जेव्हा शरीरात शिरकाव करतो, तेव्हा तो वेगवेगळ्या भागात इन्फेक्शन (Infection) करायला सुरुवात करतो. शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडिज या इन्फेक्शनविरुद्ध आणि ते पसरवणाऱ्या विषाणूविरुद्धही लढा देतात आणि शरीराची हानी होण्यापासून वाचवतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोरोनावरील सर्व लसी (Anti Corona Vaccines) याच सूत्रावर आधारित आहेत.
अँटिबॉडिज टेस्टमधून काय समजते?
आपल्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशा अँटिबॉडिज आहेत की नाही, हे तपासण्यासाठी अँटिबॉडिज टेस्ट केली जाते. स्क्रीनिंग प्रक्रियेचा वापर करून रक्तातील अँटिबॉडिजची संख्या तपासली जाते. त्या व्यक्तीला यापूर्वी कोरोना होऊन गेलाय का, याची माहितीदेखील टेस्टमधून मिळते.
कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिजचा वेगळेपणा
एखाद्या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी शरीरात ज्या अँटिबॉडिज तयार होतात, त्या वर्षानुवर्षं शरीरात टिकून राहतात. पुन्हा त्याच विषाणूचा शरीरात शिरकाव झाला, तर पुन्हा या अँटिबॉडिजची संख्या वाढवण्याचं काम टी-सेल्सकडून केलं जातं. कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिजबाबत मात्र काहीसं वेगळं चित्र असल्याचं निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ज्या अँटिबॉडिज शरीरात तयार होतात, त्या काही दिवसांनी कमी होतात. मग कमी संख्येनिशी त्यांचं अस्तित्व शरीरात आणखी काही काळ राहतं. मात्र त्यानंतर त्या कायमस्वरुपी शरीरात टिकतात की पूर्णतः नष्ट होतात, याबाबत अजूनही शास्त्रज्ञ ठोस निष्कर्षावर येऊ शकलेले नाहीत. शिवाय, एकदा तयार झालेल्या अँटिबॉडिज नेमका किती काळ शरीरात टिकून राहतात, याबाबतही पुरेसं संशोधन झालेलं नाही.
हे वाचा - Explainer : कोरोना लढ्यात Mix and Match Corona vaccine गेमचेंजर ठरू शकते?
अँटिबॉडिज टेस्टचा शास्त्रज्ञांना होतोय उपयोग
कोरोनाच्या बदलत राहणाऱ्या स्वरुपाचा अभ्यास करण्यासाठी सध्या अँटिबॉडिज टेस्टचा उपयोग शास्त्रज्ञांना होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडीज असतानादेखील त्याला कोरोनाच्या विषाणूचा त्रास होत असल्याच्या काही केसेस नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे पूर्वीच्या विषाणूविरुद्धच्या अँटिबॉडिज नव्या स्ट्रेनसाठी कितपत उपयोगी पडतात, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. त्याचप्रमाणं कोरोनाच्या विषाणूचं जसजसं म्युटेशन होतं, तसतसं अँटिबॉडिजचही स्वरूप बदलत जातंय का, यावरही सध्या संशोधन सुरू आहे.
गाफील राहू नका
कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर किंवा लस घेतल्यानंतर साहजिकच प्रत्येकाच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज असतात. अनेकजण अँटिबॉडिज टेस्ट करून याची खातरजमाही करून घेतात. मात्र टेस्टमध्ये अँटिबॉडिज पुरेशा प्रमाणात असल्याचं आढळून आलं, तरी कोरोनापासून गाफिल न राहण्याचं आवाहन डॉक्टर करत आहेत. रुप बदललेल्या विषाणूवर जुन्या अँटिबॉडिज परिणामकारक ठरतीलच, याची शाश्वती देणारा कुठलाही निष्कर्ष अद्याप वैज्ञानिकांनी काढला नसल्यामुळे लसीकऱणानंतरही तितकीच सावधानता बाळगण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Test, Virus