नवी दिल्ली, 23 जून : जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेल मेर्केल यांनी कोविड-19 प्रतिबंधक लशीचा पहिला डोस अॅस्ट्राझेनेका (Astrazeneca) कंपनीचा घेतला, तर दुसरा डोस मॉडर्ना (Moderna) कंपनीच्या लशीचा घेतला. त्यामुळे मिक्स अँड मॅच लसीकरणाचा (Mix and Match Corona vaccination) मुद्दा जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिक्स अँड मॅच लसीकरणाबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. ते कितपत प्रभावी ठरेल याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश लशींचे दोन डोस घ्यावे लागतात. हे दोन डोस वेगवेगळ्या लशींचे घेतले, तर त्याला मिक्स अँड मॅच लसीकरण म्हटलं जातं. वेगवेगळ्या लशींचे दोन डोस घेतले, तर शरीराच्या प्रतिकारशक्तीला वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन मिळू शकतं, असा अंदाज आहे. यातून तयार झालेली प्रतिकारशक्ती दोन्ही डोस एकाच लशीचे घेतल्यामुळे तयार होणाऱ्या प्रतिकारशक्तीपेक्षा जास्त काळ टिकणारी असू शकते, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे. त्यामुळे नवनव्या व्हॅरिएंट्सपासून लोकांना अधिक चांगंल संरक्षण मिळू शकेल, असा अंदाज आहे. शिवाय, लशींची उपलब्धता हा पैलूही या लसीकरणाला आहे. पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध नसल्याने लोकांना दुसऱ्या डोससाठी थांबावं लागत आहे. कोणत्याही लशीचा दुसरा डोस घेण्याची परवानगी मिळाली, तर लसीकरण अधिक वेगाने पूर्ण होऊ शकेल. - जैविक परिणाम (Biological Effects) काय? - शास्त्रज्ञांना असं वाटतं, की शरीराची प्रतिकारशक्ती कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनविरोधात काम करते. स्पाइक प्रोटीनच्या वेगवेगळ्या भागांचं एक्स्पोजर झाल्यानंतर शरीर तशा प्रकारे अँटीबॉडीज तयार करील. वेगवेगळ्या अँटीबॉडीजमुळे वेगवेगळ्या व्हॅरिएंट्सच्या स्पाइक प्रोटीनविरोधात प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकेल. वेगवेगळ्या लशींमुळे वेगवेगळ्या प्रकारे अँटीबॉडीज शरीरात विकसित होऊ शकतील. फायझर कंपनीच्या लशीनंतर अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीचा डोस घेतल्यास सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचं आतापर्यंतच्या मर्यादित माहितीवरून स्पष्ट झालं आहे. तसंच, या कॉम्बिनेशनमुळे दुखी आणि अन्य तात्पुरते साइड इफेक्ट्स थोड्या जास्त प्रमाणात दिसत असल्याचंही आढळलं आहे. - काळजीचे विषय कोणते? - मिक्स अँड मॅच सुरक्षित आहे का आणि त्यातून अधिक चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती (Immunity) खरंच विकसित होईल का, या प्रश्नांची उत्तरं अद्याप पूर्णतः मिळालेली नाहीत. मिक्स अँड मॅच प्रकारात कोणती लस आधी आणि कोणती नंतर या क्रमाबद्दलही बारकाईने अभ्यास होण्याची गरज आहे. या लशींच्या साठवणक्षमतेत फरक असल्यामुळे त्यांची साठवणीची सोय, साठवणीची व्यवस्था यांमध्ये फरक असू शकतो. काही लशींचा वापर काही विकार असलेल्या व्यक्तींमध्ये करता येणार नाही. तसंच, काही कॉम्बिनेशनमध्ये साइड इफेक्ट्स वाढत असल्याचंही दिसून आलं आहे. - शास्त्रज्ञ काय म्हणतात? - मिक्स अँड मॅच लसीकरणाचा अनेक देशांना मोठा फायदा होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांनी म्हटलं आहे. ‘ज्या देशांनी एका लशीचे डोस देऊन लसीकरण केलं आहे आणि दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असूनही तुटवड्यामुळे ती लस उपलब्ध नाही, अशा देशांना दुसऱ्या प्रकारची लस वापरणं शक्य होऊ शकेल,’ असं सौम्या स्वामिनाथन यांनी अलीकडे एका झूम इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. हे वाचा - जगात अशी कोरोना लस नाही; भारतात लहान मुलांना दिली जाणार खास Zycov-D vaccine या लसीकरणाचा मुख्य उद्देश हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूपासून सुरक्षितता हा आहे. वेगवेगळ्या लशींमुळे प्रतिकारशक्ती जास्त काळ टिकण्याची शक्यता आहे, असं फिलाडेल्फियातले लसतज्ज्ञ पॉल ऑफिट यांनी सांगितलं. - जागतिक स्थिती काय आहे? चीन - चिनी शास्त्रज्ञ एप्रिल महिन्यात कॅनसिनो बायोलॉजिक्स आणि चाँगक्विंग झिफी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स यांनी केलेल्या लशींच्या मिक्स अँड मॅचच्या चाचण्या घेत होते. सीबीसी न्यूजने एक जून रोजी दिलेल्या वृत्तानुसार कॅनडाने पहिला डोस अॅस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझर किंवा मॉडर्ना कंपनीचा, अशा लसीकरणाला परवानगी दिली आहे. मॉडर्ना किंवा फायझरचा पहिला डोस घेतलेल्यांना त्यापैकी कोणत्याही लशीचा दुसरा डोस घेता येईल, असंही कॅनडाच्या लसीकरण सल्लागार समितीने स्पष्ट केलं आहे. फ्रान्स - फ्रान्सच्या सर्वोच्च आरोग्य सल्लागार समितीने एप्रिल महिन्यात शिफारस केली, की 55 वर्षांखालच्या ज्या व्यक्तींनी अॅस्ट्राझेनेकाची पहिली लस घेतली आहे, त्यांनी m-RNA तंत्रज्ञानावरच्या लशीचाच दुसरा डोस घ्यावा. डोस मिक्सिंगच्या मूल्यमापनाच्या ट्रायल्स अद्याप तिथे झालेल्या नाहीत. रशिया - रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या एथिकल कमिटीने मिक्सिंगबद्दल अधिक माहिती मागवल्यानंतर अॅस्ट्राझेनेका आणि स्पुटनिक या लशींच्या मिक्सिंगला मान्यता देण्याचं रशियाने पुढे ढकललं आहे. 20 मे रोजी रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं होतं. अॅस्ट्राझेनेका आणि फायझर किंवा अन्य कंपन्यांच्या लशींच्या मिक्सिंगच्या चाचण्या घेतल्या जातील, असं दक्षिण कोरियाने 20 मे रोजी जाहीर केलं होतं. यूएई - संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन यांनी सायनोफार्मच्या पहिल्या लशीनंतर फायझर किंवा अन्य कोणत्याही लशीचा डोस देण्याची व्यवस्था केली आहे. ब्रिटन - ब्रिटनने जानेवारीत स्पष्ट केलं, की पहिली लस ज्या प्रकारची घेतली आहे, त्या प्रकारची लस आउट ऑफ स्टॉक असेल, तरच दुसरा डोस वेगळ्या लशीचा दिला जाऊ शकेल. अॅस्ट्राझेनेकानंतर फायझरच्या लशीचा दुसरा डोस घेतलेल्यांना (किंवा उलट क्रम) लसीकरणानंतरची लक्षणं सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची असल्याचं 12 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. हे वाचा - मृत्यूपासून वाचवण्यासाठी लसीचे दोन डोस किती टक्के प्रभावी, वाचा सविस्तर सीएनबीसीने जानेवारीत दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटलं आहे, की फायझर आणि मॉडर्नाच्या लशींमध्ये 28 दिवसांचं अंतर आवश्यक असून, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच मिक्सिंग केलं जावं. - लशींचं मिक्सिंग पूर्वी कधी झालं होतं का? - एबोलासारख्या विषाणूच्या बाबतीत लशींचं मिक्स अँड मॅच अनेक वर्षांपासून केलं जात आहे. तरीही बहुतांश कॉम्बिनेशन्स सारख्याच तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या लशींची होती. भारतात रोटाव्हायरस व्हॅक्सिन्सच्या कॉम्बिनेशनच्या चाचण्या आणि वापर झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.