Explainer - 86.64% नागरिकांमध्ये Corona Antibodies; मुंबईला Herd immunity मिळाली का?

Explainer - 86.64% नागरिकांमध्ये Corona Antibodies; मुंबईला Herd immunity मिळाली का?

बीएमसीने (BMC) मुंबईचा पाचवा सीरो सर्व्हे रिपोर्ट (Bmc fifth sero surrvey) जारी केला आहे. ज्यामध्ये मुंबईने हर्ड इम्युनिटीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणाचा टप्पा गाठला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : कोरोना महासाथ कधी संपेल माहिती नाही. पण कोणत्याही महासाथीला रोखण्यात हर्ड इम्युनिटीची (Herd immunity) भूमिका खूप महत्त्वाची असते. हर्ड इम्युनिटी (Corona herd immunity) म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये संबंधित व्हायरसविरोधात अँटिबॉडीज (Mumbai corona antibodies) तयार होणं. आजारानुसार हर्ड इम्युनिटीचं प्रमाण वेगवेगळं असतं. कोरोनाव्हायरससाठी हे प्रमाण 70 ते 80 टक्के असल्याचं सांगितलं जातं आहे. म्हणजे 70 ते 80 टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडल्या (Mumbai sero survey report) तर तिथं हर्ड इम्युनिटी मिळाली असं म्हणू शकतो. मुंबईने हर्ड इम्युनिटीसाठी (Mumbai herd immunity) आवश्यक असलेला हा आकडा गाठला आहे. त्यामुळे मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली का असा प्रश्न उपस्थित होतो (Bmc fifth sero surrvey).

मुंबई महापालिकेने पाचवा सीरो सर्व्हे रिपोर्ट जारी केला आहेत. 24 वॉर्डमधील 8,600 रक्ताचे नमुने घेण्यात आले.  ज्यामध्ये  86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे सापडली आहेत. कोरोना लशीचे दोन्ही किंवा एक डोस घेतलेल्या 90.26% नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आहेत. लसीकरण न झालेल्या नागरिकांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्येसुद्धा प्रतिपिंडे आढळलेली आहेत.

सीरो सर्व्हे म्हणजे नेमकं काय?

कोरोना विषाणूविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies Survey) किती जणांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा माग या सर्व्हेतून घेतला जातो. रोगाचा प्रसार नेमका किती झाला आहे, याचं मोजमाप करण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे.

किती टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला आहे, याचं प्रमाण कळण्यासाठी सेरो सर्व्हेज घेतले जातात, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांचाही त्यात समावेश असतो. अर्थात केवळ एवढाच त्याचा उद्देश नाही. जास्त जोखीम असलेल्या गटातल्या लोकसंख्येला संसर्ग होण्याचा किती धोका अन्य लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे, याचा अंदाज यावरून बांधता येतो. उदा. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, इत्यादी. त्यामुळे त्या संबंधित गटानुसार योग्य ती कार्यवाही करणं आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकतं.

''भारतीयांनो, तीन महिने महत्त्वाचे...सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका''

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन (Dr Saumya Swaminathan) यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला कोविड-19 होऊन गेल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती किती काळ टिकते, याचा माग काढण्याची संधीही सेरो सर्व्हेतून मिळते. एकाच गटाचे सेरो सर्व्हे ठरावीक कालावधीच्या अंतराने घेतले, तर त्या विषाणूविरोधात किती प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित झाली आहे, हे समजून घेता येऊ शकतं.

महत्त्वाचं म्हणजे, अजूनपर्यंत कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही, याची माहिती सेरो सर्व्हेतून कळते. त्यामुळे कोणत्या लोकसंख्येच्या गटाला अद्याप संसर्गाचा धोका आहे आणि त्या गटाला हर्ड इम्युनिटी प्राप्त करेपर्यंत किती उद्दिष्ट साध्य करायचं आहे, याचा अंदाज त्यावरून बांधता येतो.

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

जर एखादा रोग मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचला असेल तर मनुष्याची रोगप्रतिकारकशक्ती रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते. जे लोक या रोगाची झुंज देतात आणि पूर्णपणे बरे होतात ते त्या रोगापासून इम्युन होतात. म्हणजेच त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होतो आणि त्यांच्यातील अँटीबॉडीज व्हायरससोबत सामना करण्यास तयार होतात. यालाच हर्ड इम्युनिटी म्हणजे संसर्ग रोखण्याची शक्ती म्हणतात.

जेव्हा अधिकाधिक लोक इम्युन होतात. तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. हर्ड इम्युनिटीही रोगाविरुद्ध लढण्यासाठी मदत करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एडुआर्डो सांचेझ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये देखील याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

कोरोना लढ्यात भारताची कमाल! 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं

डॉ. सांचेझ यांनी लिहिलं आहे की, जर एखाद्या भागातील अधिकाधिक लोक व्हायरसशी लढून जिवंत राहण्याची क्षमता निर्माण करत असतील तर मग हा व्हायरस त्या भागातील इतर ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागतो.

कोरोनासाठी हर्ड इम्युनिटीचं प्रमाण काय?

हर्ड इम्युनिटीचं प्रमाण रोगानुसार वेगवेगळं असतं. गोवरसारख्या (Measles) प्रचंड संसर्गजन्य असलेल्या रोगाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 94 टक्के व्हावं लागतं. म्हणजेच 10पैकी 9 व्यक्ती एक तर रोगातून बऱ्या झालेल्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचं लसीकरण तरी झालेलं असलं पाहिजे; पण गोवरसारख्या अन्य रोगांचं लसीकरण ही खूप सर्वसामान्य गोष्ट असल्याने अशा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचं आपल्याला दिसत नाही. तुरळक केसेसच पाहायला मिळतात.

कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असणं अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा, की दर पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या शरीरात त्याविरोधातल्या अँटीबॉडीज असल्या पाहिजेत.

मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली?

मुंबईतील  86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे सापडली आहेत. कोरोनासाठी आवश्यक असलेल्या हर्ड इम्युनिटीचं प्रमाण मुंबईने गाठलं आहे. त्यामुळे मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली का असा प्रश्न उपस्थित होतो.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाविरोधातील इम्युनिटी दोन मार्गांनी मिळते, एक म्हणजे आधी कोरोना संसर्ग झाला असेल तर आणि दुसरं म्हणजे कोरोना लसीकरण. पण ही इम्युनिटी साधारणपणे सहा महिन्यांपर्यंत टिकू शकत नाही. त्यामुळे मुंबईत 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज सापडल्या असल्या तरी ती काही कालावधीत कमी होऊ शकते आणि इम्युनिटी कमी झालेल्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो.

देशात कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

दुसरं म्हणजे हा जो आकडा आहे, तो कोरोनाच्या जुन्या विषाणूबाबत आहे. कोणत्याच रोगप्रतिकारक दाद न देणारा विषाणू आला तर या इम्युनिटीला काहीच अर्थ नाही. त्यामुळे लसीकरण आणि बुस्टर डोस किंवा तिसरा डोस हाच आपल्याकडे उपाय ठरू शकतो, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: September 17, 2021, 7:10 PM IST

ताज्या बातम्या