नवी दिल्ली, 24 एप्रिल : पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगला पकडले तेव्हा त्याने भगव्या रंगाची पगडी घातली होती. सहसा तो त्याच रंगाचा पगडी घालतो. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान बहुतांशी पिवळ्या पगडीमध्ये दिसतात. जर तुम्ही निहंगांना पाहिले असेल तर ते रॉयल ब्लू रंगाच्या पगड्या घालतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आकाशी निळ्या रंगाची पगडी घालतात. शिखांमध्ये पगडीच्या वेगवेगळ्या रंगांचे अर्थ काय? त्यांच्या पगड्यांच्या रंगांचा राजकारणाशी काही संबंध आहे का? या रंगांमधून नक्की काय अर्थ प्रतित होतो? वेगवेगळ्या रंगांच्या पगड्या घालून कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात? याबद्दल या एक्सप्लेनरमधून समजून घेऊयात. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती म्हणजेच SGPC जी शीख धर्मातील सर्वोच्च संस्था मानली जाते, तिचे सदस्य, ग्रंथी, गुरबानी गायक आणि प्रचारक यांना फक्त चार रंगांच्या पगड्या घालण्याची परवानगी देते. पांढरा, निळा, भगवा आणि काळा असे हे रंग आहेत. या चार रंगांचा शीख धर्मातील अध्यात्माशी जवळचा संबंध आहे. काळी पगडी अकालींची अकाली दलाची स्थापना 14 डिसेंबर 1920 रोजी झाली, ती एसजीपीसीची टास्क फोर्स म्हणून बनवण्यात आली होती. सरदार सरमुखसिंग चुब्बल हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. पण या पक्षाची लोकप्रियता बाबा खरकसिंग आणि ग्यानी गोपालसिंग यांच्या काळात वाढली. देशाची फाळणी झाली तेव्हा अकाली दलाचे अध्यक्ष मास्टर तारासिंग होते. ब्रिटिश राजवटीत ऐतिहासिक गुरुद्वारांवर कब्जा केल्याच्या निषेधार्थ अकाली दलाचे सदस्य काळ्या पगड्या बांधायचे. 70 च्या दशकात शिरोमणी अकाली दलाने काळ्या पगडीचा रंग सोडला व निळी पगडी घालण्यास सुरुवात केली. आता हीच त्यांच्या पक्षाची आणि पक्षातील शीखांची ओळख होती. एसजीपीसीचे अध्यक्ष गुरचरणसिंग तोहरा, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, सुखबीर बादल आणि मनजीतसिंग जीके नेहमी या रंगाच्या पगड्या घालायचे. पांढरी पगडी काँग्रेसमधील शीख घालायचे स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित शीख पांढऱ्या पगड्या घालायचे. मात्र, स्वातंत्र्यानंतर शिखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली तेव्हा अकाली दलाचे तत्कालीन अध्यक्ष मास्टर तारासिंग यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्या पगडीच्या पांढर्या रंगावरून ते काँग्रेसमध्ये असल्याचे दिसून यायचे. वाचा - पवारांच्या वक्तव्याने ‘महाविकासआघाडी’चं कनफ्यूजन, शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय काँग्रेसच्या राजवटीत शिखांना मंत्री करण्यात आले. ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती आणि मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. पंजाबमध्ये काँग्रेसमधील शिखांनी अनेकवेळा सरकार स्थापन केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आकाशी निळ्या रंगाची पगडी घालत असले तरी काँग्रेसचे दिग्गज नेते बलवंतसिंग, स्वर्णसिंग, प्रतापसिंग कैरॉन आणि ग्यानी झैलसिंग नेहमी पांढरी पगडी घालायचे. पिवळा रंग म्हणजे क्रांती ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे एक क्रांतिगीत नेहमीच सरदार भगतसिंग यांच्याशी जोडलं जातं. या गाण्यातील बसंती म्हणजेच पिवळा रंग होय. भारतात ब्रिटिश राजवट असताना भगतसिंग आणि त्यांचे क्रांतिकारक साथीदार नेहमी पिवळ्या रंगाची पगडी किंवा पटका परिधान करत असत. आम आदमी पक्षानेही आपल्या पक्षातील शिखांच्या पगडीचा रंग पिवळा ठरवला आहे. या पक्षाशी संबंधित शीख त्यांचे क्रांतिकारी विचार व्यक्त करताना पिवळा पगडी घालतात. लाल रंग कम्युनिस्ट शिखांचा शीख लोक भारतीय कम्युनिस्ट पक्षातही आहेत. कॉम्रेड बनलेल्या शिखांनी लाल रंगाच्या पगड्या घातल्या. लाल रंग सोशलिझम व कम्युनिझमचं प्रतीक आहे. जे कम्युनिस्टांनी 18 व्या शतकातील फ्रेंच राज्यक्रांती आणि 1848 मधील रशियन क्रांतीतून घेतले. आताही रशिया आणि चीनच्या ध्वजांचे रंग लाल आहेत. भगवा रंग बंडाचा वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख झाल्यापासून अमृतपालसिंग नेहमीच भगव्या रंगाचा फेटा किंवा पगडी परिधान करत आहे. हा रंगदेखील धार्मिक प्रतीक आहे. या आधी त्याने निळ्या आणि काळ्या पगड्या घातल्या आहेत. भगवा रंग हा शिखांसह राजपूत सैनिकांचाही पारंपरिक रंग आहे. या रंगाची पगडी घातली म्हणजे मुलगा लढण्यास तयार आहे, असा अर्थ होतो. कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी त्याने मानसिक तयारी केली आहे, असंही समजलं जातं. 1980 च्या दशकात शीख हक्क चळवळीदरम्यान, भगवा रंग हे शिखांच्या बंडाचं, भारत सरकारविरुद्धच्या उद्रेकाचं प्रतीक बनले. ऑल इंडिया शीख स्टुडंट्स फेडरेशनने महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधील सदस्यांसाठी हा रंग निवडला. त्यानंतर पंजाब आणि दिल्लीत शिखांनी या रंगाच्या पगड्या घालण्यास सुरुवात केली. या रंगाच्या माध्यमातून ते मानवाधिकारांचे उल्लंघन आणि शिखांच्या दडपशाहीला विरोध करत असत. हिरवा रंग म्हणजे शीख शेतकऱ्यांची पगडी दीड वर्षांपूर्वी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा पंजाबमधून मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले. हे शेतकरी पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून आले होते. त्यात जे शेतकरी शीख होते त्यांनी तेव्हा हिरवी पगडी घातली होती. हा रंग भारतीय किसान युनियन आणि हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदलाचाही रंग आहे. वाचा - Riteish Deshmukh : MIDC भूखंड प्रकरणात रितेश-जिनिलियाला क्लीन चीट; काय होतं प्रकरण? लग्नासाठी गुलाबी पगडी जेव्हा शीख लोक लग्न समारंभात जातात, तेव्हा ते गुलाबी रंगाची पगडी घालतात. तसेच आनंदाप्रसंगी ते लाल, मरून किंवा भगव्या रंगाच्या पगड्या घालतात. पंजाब पोलिसांतील शीख लाल आणि निळ्या पगड्या घालतात पंजाब पोलिसांतील शीख लाल आणि निळ्या रंगाच्या पगड्या घालतात, हे रंग ब्रिटिश राजवटीपासून आहेत. ‘द सरकारदो’ या वेबसाइटनुसार शीख समुदायासाठी पगडी हा त्यांच्या धर्माशी संबंधित मुद्दा आहे. या समाजातही अनेक गट आहेत. खालसा गट हा त्यापैकीच एक. खालसा शीख सहसा केशरी आणि निळ्या रंगाच्या पगड्या घालतात. निळा रंग हा योद्धा असण्याचं प्रतीक आहे. खालसा गट स्वत:ला लढाऊ म्हणजे योद्धा समजतो. ते स्वतःला त्यांच्या धर्माचे रक्षक समजतात. हा रंग त्यांच्या मागच्या पिढ्यांच्या शौर्याचाही द्योतक आहे. शीख समुदायाने लढलेल्या युद्धांचेही ते प्रतीक आहे. धैर्य आणि ज्ञानाचे प्रतीक केशरी रंग हा बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. शिखांचे पहिले गुरूनानकदेवजी भगव्या रंगाची पगडी परिधान करत. हा रंग धैर्य आणि ज्ञनाचे प्रतीक असून ते शीख समुदायासाठी खूप महत्त्वाचे आहे. केशरी रंग त्याग आणि शक्तीचं प्रतीक आहे म्हणूनच हा रंग नेहमी निळ्या रंगाशी जोडला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.