मुंबई, 24 एप्रिल : महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांना लातूर भूखंड प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. सहकार विभागाचा अहवाल समोर आला आहे. लातूरमधील रितेश आणि जिनिलिया यांच्या मालकीच्या भूखंडाची चौकशी सुरू होती. लातूर MIDCमध्ये त्यांनी देश अँग्रो. प्रा. लि. कंपनी सुरू केली होती. या कंपनीसाठी 120 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. या कंपनीच्या जागेवरून आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जावरून हा वाद निर्माण झाला होता. मात्र आता यात सहकार विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 116 कोटींचं कर्ज दिलं होतं. त्यांना एवढी तत्परता कशी दाखवली, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसंच लातूर MIDCमधील ती जागा रितेश आणि जिनिलिया यांना सहज मिळाली असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या जागेसाठी 2 वर्षांपासून 16 लोक वेटिंगवर होते. परंतु केवळ प्राधान्यच्या नावाखाली आणि मंत्र्यांचे भाऊ असल्याने 10 दिवसात रितेश आणि जिनिलिया यांच्या कंपनीला ही जागा देण्यात आली, असा देखील आरोप करण्यात आला होता. आता याच प्रकरणात त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा ‘तुझे मेरी कसम’? 20 वर्षांनी कारण आलं समोर त्याचप्रमाणे आणखी एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीनं 4 ऑक्टोबर 2021ला पंढरपूर अर्बन को.ऑ. बँकेत 4 कोटींचं कर्ज आणि 5 ऑक्टोबर 2021मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 61 कोटींच्या कर्जासाठी अर्ज केला आणि हे अर्ज 25 दिवसात दोन्ही बँकांनी मंजूर केलं. 25 जुलैनं 2022मध्ये लातूर जिल्हा बँकेनं आणखी 55कोटींचं कर्ज कंपनीला दिलं. याच कर्जावर भाजपनं प्रश्न उपस्थित केले होते. ज्या कंपनीचं संपूर्ण भांडवल 7.50 कोटी आहे त्या कंपनीला 120 कोटींचं कर्ज दिलं जातं असा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना अद्याप क्लीन चीट मिळालेली नाही. रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अँग्रा कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की, ही कंपनी लातूर परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तयार करण्यात आली. कृषी आधारित उद्योगांची वाढ व्हावी या उद्धेशानं याची स्थापन करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सोयाीन प्रक्रिया आणि त्यावर आधारित काही विशेष उत्पादन कंपनीत घेण्यात येणार आहेत.