Explainer: लहान मुलांसाठी Covaxin ची शिफारस; लस किती सुरक्षित? बालकांना द्यावी का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Explainer: लहान मुलांसाठी Covaxin ची शिफारस; लस किती सुरक्षित? बालकांना द्यावी का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

बंगळुरूमधल्या अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधल्या पेडिअॅट्रिक्स अँड इंटरव्हेंशनल पल्मोनॉलॉजी या विषयातले कन्सल्टंट डॉ. श्रीकांत जे. टी. यांनी याबाबतच्या काही शंकांचं निरसन केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : कोरोना प्रतिबंधक लस (Anti Covid Vaccine) विकसित होणार होणार म्हणताना जानेवारी महिन्यात देशात लसीकरण (Vaccination Drive) सुरू झालं आणि आता लवकरच 100 कोटी जणांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे. अर्थात हे लसीकरण 18 वर्षांच्या वरच्या व्यक्तींचं आहे. त्याखालच्या वयोगटातल्या आणि विशेषतः लहान मुलांच्या लसीकरणाबद्दलची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याबद्दलचं संशोधन आणि चाचण्याही सुरू होत्या. भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीची 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांकरिता आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी तज्ज्ञ समितीने (Expert Panel) शिफारस केली आहे. कोरोना संसर्गाच्या अपेक्षित असलेल्या तिसऱ्या लाटेपासून मुलांचा बचाव करण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.

अद्याप भारतीय औषध नियंत्रकांनी अर्थात DGCI ने या लशीच्या लहान मुलांवरच्या वापराला मंजुरी दिलेली नाही; मात्र या लशीने नागरिकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीच्या झायकॉव्ह डी या जगातल्या पहिल्या डीएनए लशीच्या 12 वर्षांवरच्या मुलांवरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांच्या मनात या लशींबद्दल अनेक शंका आहेत. बंगळुरूमधल्या अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधल्या पेडिअॅट्रिक्स अँड इंटरव्हेंशनल पल्मोनॉलॉजी या विषयातले कन्सल्टंट डॉ. श्रीकांत जे. टी. यांनी याबाबतच्या काही शंकांचं निरसन केलं आहे.

- मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination of Kids) ही योग्य वेळ आहे का? की यासाठी अजून थोडं थांबावं?

कोव्हॅक्सिन लस म्हणजे इनअॅक्टिव्हेटेड व्हायरल कम्पोनंट आहे. अद्याप या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचण्यांची माहिती पूर्णतः प्रकाशित झाली नसली किंवा पीअर रिव्ह्यूही झाला नसला, तरी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश लशींच्या निर्मितीसाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं, तेच तंत्रज्ञान कोव्हॅक्सिन लसनिर्मितीतही वापरलेलं आहे. त्यामुळे ती लस आत्ता तरी सुरक्षित वाटत आहे. तरीही या लशीसंदर्भातली पुरेशी अधिकृत माहिती प्रसिद्ध होईपर्यंत पालकांनी थांबणं श्रेयस्कर.

वाचा: पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी, कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

- लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लशीच्या डोसची (Dose) मात्रा किती असणार?

प्रौढांना म्हणजे 18 वर्षांवरच्या सर्वांना एक मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाते. लहानांना त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजेच 0.5 मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाईल. अन्य लशींप्रमाणेच ती इन्ट्रामस्क्युलर (Intramuscular) अर्थात स्नायूत दिली जाईल. दोन डोसेसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल.

- लहान मुलांचं लसीकरण पूर्ण होणं म्हणजे आपण कोरोनाच्या जागतिक साथीवर (Pandemic) विजय मिळवल्यासारखं आहे का?

प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी आहे. तरीही लहान मुलं जोखमीच्या गटात येतात आणि त्यांना संसर्ग झाला तर ती सुपरस्प्रेडर ठरू शकतात. म्हणजेच त्यांच्यापासून संसर्ग वेगाने अनेकांना होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरतो, तेव्हा विषाणूमध्ये अनेक म्युटेशन्स तयार होण्याचाही धोका मोठा असतो. त्यामुळे संसर्गाच्या पुढच्या संभाव्य लाटा टाळण्यासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेवर आणि प्रभावी मार्ग दिसतो आहे.

भारताच्या 1.40 अब्ज लोकसंख्येपैकी किमान 25 ते 30 टक्के लोकसंख्या 18 वर्षांखालची आहे. एकट्या कर्नाटकातच 1.7 कोटी नागरिक 18 वर्षांखालचे आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तिसरी लाट येण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच, लसीकरण झालेलं असलं आणि तरीही संसर्ग झाला, तर होणाऱ्या गुंतागुंतीचं प्रमाण खूप कमी असेल.

वाचा: Covid लस न देताच CoWin App वर नोंदणी, मालेगावातील 10 शिक्षक निलंबित

- लहान मुलांना लसीकरणानंतर काही त्रास होतील का? असल्यास ते काय स्वरूपाचे असतील?

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश लशींनंतर ज्याप्रमाणे ताप, अंगदुखी आणि इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणं आदी त्रास जाणवतात, तसेच त्रास या लशीनंतरही होणं शक्य आहे. यापेक्षा गंभीर काही होऊ नये. लशीचा परिणाम चांगला होणार असेल, तर एवढे किरकोळ साइड इफेक्ट्स (Minor Side Effects) स्वीकारण्यासारखे आहेत.

- कोव्हॅक्सिन लशीला अनेक देशांमध्ये अद्याप मान्यता नाही. अशा स्थितीत मुलांसाठी अन्य कोणते पर्याय असू शकतात?

कोव्हॅक्सिन लशीच्या निर्मितीसाठी वापरलेलं तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचं आतापर्यंत सिद्ध झालं आहे. त्यामुळे ही लसही सुरक्षित आहे; मात्र अद्याप त्याबद्दलची सर्व माहिती सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आत्ताच त्याबद्दल काही सांगणं कठीण आहे; पण सध्याच्या परिस्थितीत तरी ही लस सर्वांत सुरक्षित आहे. अन्य पर्यायांचा विचार करायचा झाला, तर कोविशिल्डच्या (Covishield) मुलांवरच्या चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. फायझरच्या (Pfizer) लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मायोकार्डायटिस (Myocarditis) होत असल्याच्या अनेक शंका आहेत. तरीही ती लस सुरक्षित असल्याचं सिद्ध करणारी विपुल माहिती उपलब्ध आहे. अर्थात फायझरच्या लशीला भारतात लहान मुलांकरिता अद्याप परवानगीच मिळालेली नाही. झायकॉव्ह डी (Zycov D) ही लसदेखील एक पर्याय ठरू शकते; मात्र ती अद्याप नवी असल्याने त्या लशीबद्दल काही निष्कर्ष काढण्याआधी त्याबद्दलची माहिती उपलब्ध होण्याकरिता थांबणं आवश्यक आहे.

First published: October 13, 2021, 5:51 PM IST

ताज्या बातम्या