Home /News /explainer /

Explainer: दोन लशींचं कॉकटेल खरंच सुरक्षित आहे का? ICMR चा अभ्यास काय सांगतो?

Explainer: दोन लशींचं कॉकटेल खरंच सुरक्षित आहे का? ICMR चा अभ्यास काय सांगतो?

एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेणं सुरक्षित (Safe corona vaccine) आहे, असं म्हणतात. पण खरंच अशा दोन लशींचा किती (Immnunity) फायदा होतो?

    नवी दिल्ली, 9 ऑगस्ट: कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सुरू आहे. त्यात लशींवरच्या संशोधनाचाही समावेश आहे. कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात तयार होण्यासाठी दोन वेगवेगळ्या लशींचे डोस दिल्यास (Mixing Vaccines) किती उपयोग होईल, याचाही गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास केला जात आहे. कोविशिल्डचा एक आणि कोव्हॅक्सिनचा एक असे दोन्ही प्रकारच्या लशींचे डोस घेऊन लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे, की एकाच व्यक्तीने दोन्ही लशींचे डोस घेणं सुरक्षित (Safe) आहे, तसंच शरीरात चांगली प्रतिकारशक्ती (Immnunity) तयार करण्यासाठीही उपयुक्त आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने (ICMR) संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे. - मिश्र लसीकरणाचा अभ्यास कसा सुरू झाला? यासाठी एक चूक कारणीभूत ठरली. उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातल्या 20 व्यक्तींनी या वर्षी मे महिन्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या गेल्याचं स्पष्ट झालं. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या व्यक्तींच्या गटाला कोविशिल्ड या लशीचा डोस देण्यात आला. तसंच, 14 मे रोजी त्यांना कोव्हॅक्सिन लशीची मात्रा देण्यात आली. ही गोष्ट उघड झाली, तेव्हा ते चुकून झाल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. कारण तोपर्यंत मिश्र लसीकरण करण्याच्या कोणत्याही सूचना सरकारकडून प्राप्त झालेल्या नव्हत्या; त्यामुळे कदाचित शिक्षाही होऊ शकली असती; मात्र मिश्र लसीकरण केल्या गेलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आलं आणि त्या लसीकरणाचा कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. जळगावमध्ये डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले, 7 वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश ही बाब लक्षात घेऊन आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी मिश्र लसीकरणाच्या प्रयोगांना आणि अभ्यासाला सुरुवात केली. कारण त्यातला पहिला प्रयोग चुकून का होईना पण सुरू झालेलाच होता. आयसीएमआरच्या या संशोधनाचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचं दिसून आलं. - अभ्यासातून काय दिसून आलं? या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी तीन गटांतल्या व्यक्तींची तुलना केली. एका गटात 18 अशा व्यक्तींचा समावेश होता, की त्यांना मिश्र लसीकरण (एक डोस कोविशिल्डचा, एक डोस कोव्हॅक्सिनचा) करण्यात आलं होतं. दुसरा आणि तिसरा गट प्रत्येकी 40 व्यक्तींचा होता. त्यातल्या एका गटातल्या व्यक्तींना दोन्ही डोस कोविशिल्डचे, तर दुसऱ्या गटातल्या व्यक्तींना दोन्ही डोस कोव्हॅक्सिनचे देण्यात आले होते. मिश्र लसीकरणाचे कोणतेही वेगळे परिणाम आढळले नसल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं. तिन्ही गटांतल्या व्यक्तींना लसीकरणानंतर कमी प्रमाणात आणि एकसारखेच साइड-इफेक्ट्स आढळले. त्यामुळे मिश्र लसीकरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला. नवं संशोधन : Flu ची लस करते कोरोनाचा धोका कमी मिश्र लसीकरण केल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हॅरिएंटविरोधात उत्तम प्रतिकारशक्ती तयार झाल्याचंही या अभ्यासात आढळलं. अन्य दोन गटांपेक्षा मिश्र लसीकरण केलेल्या गटातल्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडी तयार होण्याचं आणि त्यांच्या कार्यक्षम प्रतिसादाचं प्रमाणही जास्त होतं, असंही त्यातून स्पष्ट झालं. त्यामुळे अॅडेनोव्हायरस व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर विकसित केलेली कोविशिल्ड लस (Covishield) आणि त्यानंतर इनॅक्टिव्हेटेड व्होल व्हायरसपासून विकसित केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) लस यांचे डोस देणं सुरक्षित आहेच, शिवाय चांगल्या प्रकारची प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठीही ते उपयुक्त आहे. - कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोणत्या प्रकारच्या लशी आहेत? - कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक (Bharat Biotech), आयसीएमआर (ICMR) आणि एनआयव्ही (NIV) या संस्थांनी पूर्णतः भारतातच तयार केलेली लस आहे. कोव्हॅक्सिन ही लस पारंपरिक इनअॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर (Inactivated Platform) तयार करण्यात आली आहे. म्हणजेच यातून मृत व्हायरस शरीरात सोडला जातो. त्यातून अँटीबॉडी प्रतिसादाला चालना मिळते. विषाणू ओळखून त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका (Astrazeneca) यांनी विकसित केलेली लस पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) या कंपनीत उत्पादित केली जात आहे. कोविशिल्ड हे व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन (Viral Vector Vaccine) आहे. चिम्पांझीमध्ये आढळणाऱ्या ChAD0x1 या अॅडेनोव्हायरसचा वापर करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूप्रमाणे दिसणारं स्पाइक प्रोटीन तयार होतं. त्यामुळे ते शरीरात गेल्यावर संरक्षणक्षमता जागृत होते. भारतात वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या रशियाच्या स्पुटनिक व्ही आणि अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन या लशीही व्हायरल व्हेक्टर प्रकारच्याच आहेत. लशी कोणत्याही प्रकारच्या असल्या, तरी कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनलाच (Spike Protein) लक्ष्य करतात. त्यामुळेच कदाचित मिश्र लसीकरणाचा काही विपरीत परिणाम होणार नाही, असं शास्त्रज्ञांना वाटतं. - अन्य कोणत्या लशींच्या मिश्र लसीकरणाचे प्रयोग झाले आहेत? - युरोपात मिश्र लसीकरणाचे अनेक प्रयोग झाले आहेत. त्यात ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली लस आणि अमेरिकेतल्या फायझार-बायोएनटेकने mRNA वर आधारित विकसित केलेली लस यांच्या मिश्र लसीकरणाचा प्रयोग करण्यात आला. या दोन्ही लशींच्या प्रत्येकी दोन डोसेसपेक्षा दोन्ही लशींचे प्रत्येकी एक डोस दिल्यास परिणाम अधिक चांगला दिसून येतो, असं आढळलं आहे. 'या प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना अन्य लशींचं कॉम्बिनेशन करून पाहण्याचा आत्मविश्वासही मिळू शकेल,' असं नेचर मॅगझिनने म्हटलं आहे. - कोणते देश मिश्र लसीकरण करत आहेत? - कॅनडा, बहारीन, भूतान, थायलंड, इटली, दक्षिण कोरिया इत्यादी अगदी थोडेच देश सध्या मिश्र लसीकरण करत आहेत. कोरोनाचे नवनवे व्हॅरिएंट्स समोर येत असल्याने त्यावर उत्तर म्हणून मिश्र लसीकरण करण्याचं धोरण आखलं जात आहे; प्रत्यक्षात मात्र वैद्यकीय गरज म्हणून मिश्र लसीकरणाचा अवलंब केला जात आहे. उदाहरणार्थ, इटलीसह अन्य काही युरोपीय देशांमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या (Blood Clots) होण्याची समस्या दिसू लागली. जोखीम असलेल्या गटांना दुसरा डोस त्याच लशीचा देण्याची रिस्क घेण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेने दुसरा डोस वेगळ्या लशीचा देण्याचं ठरवलं. गेल्या महिन्यात आलेल्या वृत्तानुसार, जर्मनीने डेल्टा व्हॅरिएंटला प्रतिबंध करण्यासाठी मिश्र लसीकरणाचं धोरण स्वीकारणाचा निर्णय घेतला. जर्मनीच्या 66 वर्षं वय असलेल्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांनी पहिला डोस ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा, तर दुसरा डोस मॉडर्नाच्या mRNA प्रकारच्या लशीचा घेतला. लोकांनी मिश्र लसीकरणाला घाबरू नये, हा संदेश देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. मोठी बातमी! आता घ्यावा लागणार एकच डोस,Johnson & Johnson च्या Corona लशीला मंजुरी मिश्र लसीकरणामागचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे लशींचा साठा पुरवणं. कोविड-19च्या सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश लशींचे दोन डोस घेतल्याशिवाय लसीकरण पूर्ण होत नाही; मात्र जागतिक मागणीएवढा लशींचा पुरवठा नाही. त्यामुळे मिश्र लसीकरण केलं, तर अनेक देशांना त्यांच्या लसीकरण मोहिमा पूर्ण करता येऊ शकतील. - काही आरोग्य संस्था मिश्र लसीकरणाबाबत फारशा सकारात्मक का नाहीत? - मिश्र लसीकरणाबद्दल अद्याप व्यापक पातळीवरच्या आणि योग्य चाचण्या आणि पुरेशा प्रमाणात अभ्यास झालेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मिश्र लसीकरणाबद्दल इशारा दिला आहे. मिश्र लसीकरण करायचं झालं, तर त्या दोन्ही डोसमध्ये किती दिवसांचं अंतर असायला हे अद्याप ठरवण्यात आलेलं नाही. तसंच, याबद्दलचे काही अभ्यास छोट्या गटांवर झाले आहेत. काही साइड इफेक्ट्स लाखात एखाद्या व्यक्तीलाही दिसू शकतात. त्यामुळे मिश्र लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे, असं म्हणता येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. आयसीएमआरच्या (ICMR) शास्त्रज्ञांनीही हा मुद्दा नोंदवला आहे. त्यांचा अभ्यास केवळ 18 जणांवर आधारलेला आहे. तसंच, त्यांच्या दोन्ही डोसमधलं अंतर केवळ 60-70 दिवसांचं आहे. तसंच, त्या व्यक्तींचा सेरॉलॉजिकल आणि इम्युनॉलॉजिकल डेटा (Serological & Immunological Data) उपलब्ध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चाचण्या अनेक केंद्रांवर व्हायला हव्यात. तरच आताचे निष्कर्ष ठोसपणे सिद्ध होतील, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या