न्यूयॉर्क, 9 ऑगस्ट : कोरोना झालेल्या रुग्णांना (Covid Patients) जर फ्लूची (Flu vaccine) लस दिलेली असेल, तर त्यांना कोरोनाच्या जीवघेण्या परिणामांना (Major impact) सामोरं जावं लागत नसल्याची बाब एका नव्या संशोधनातून (New research) समोर आली आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मिलर स्कूल ऑफ मेडिसीनच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. काय आहे संशोधन? सामान्यतः फ्लूसाठी म्हणजे इन्फुएंजासाठी घेतली जाणारी लस ही कोरोनावरही परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची तीव्रता या लसीमुळे कमी होते. शिवाय कोरोनाच्या विषाणूमुळे रक्तात गाठी होणे, स्ट्रोक येणे यासारखे इतर प्रकार उद्भवण्याचं प्रमाण या लसीमुळे कमी होत असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे. अनेक देशांत संशोधन जगातील अनेक देशांमधील रुग्णांचं सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रयोगासाठी अमेरिका, युके, जर्मनी, इटली, इस्त्रायल आणि सिंगापूर या देशांतील 7 कोटींपैकी 37,377 रुग्णांची दोन गटात विभागणी केली. पहिल्या गटातील रुग्णांना कोरोनाची लागण होण्यापूर्वीच फ्लूची लस देण्यात आली होती. तर दुसऱ्या गटात असे नागरिक होते ज्यांनी फ्लूची लस घेतली नव्हती. त्यानंतर पहिल्या गटातील नागरिकांच्या तुलनेत दुसऱ्या गटातील नागरिकांना ICU मध्ये दाखल करावं लागण्याचं प्रमाण हे तब्बल 20 टक्के अधिक असल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणं पहिल्या गटाच्या तुलनेत दुसऱ्या गटातील नागरिकांना आयसीयुत दाखल व्हावं लागण्याचं प्रमाण 58 टक्के, तर स्ट्रोक येण्याचं प्रमाण 58 टक्के असल्याचं दिसून आलं. फ्लू आणि कोरोनाचा संबंध जगभरातील अनेक देशांत अद्यापही नागरिकांना कोरोना लसीचे डोस मिळालेले नाहीत. अऩेक गरीब देशांमध्ये तर नागरिकांना कोरोनाचा पहिला डोसही मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कोरोनाची लागण होणं हे जीवघेणं ठरू शकतं. मात्र सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी फ्लूची लस घेतली, तर कोरोनाचं गांभिर्य कमी होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.