मराठी बातम्या /बातम्या /explainer /कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या मार्गदर्शक सूचना

कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या मार्गदर्शक सूचना

2DG या कोरोना औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

2DG या कोरोना औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

2DG या कोरोना औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली, 01 जून : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी डॉ. रेड्डीज लॅबच्या (Dr.Reddy’s Lab) सहकार्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज म्हणजे 2DG औषध तयार केलं आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मे महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हे औषध लाँच करण्यात आलं. या औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनावर संजीवनी ठरणारं हे औषध कुणी घ्यावं, कुणी नाही, ते कसं आणि कधी घ्यावं याबाबत डीआरडीओने सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत डीआरडीओने ट्वीटही केलं आहे.

डीआरडीओने सांगितल्यानुसार, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचारास मदत करण्यासाठी 2DG च्या तातडीच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणं आणि गंभीर लक्षणं असणार्‍या रुग्णांसाठी लवकरात लवकर डॉक्टरांनी 2DG चा वापर केला पाहिजे. तसंच रुग्णांना जास्तीत जास्त 10 दिवस हे औषध देण्यात यावं, असंही म्हटलं आहे.

अनियंत्रित मधुमेह, हृदयविकाराची गंभीर समस्या, श्वसनाच्या समस्या (ARDS), लिव्हर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांवर याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे हे आजार असणाऱ्या रुग्णांना हे औषध देताना खबरदारी घ्यावी. तसंच, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना 2 डीजी देऊ नये, असंही डीआरडीओने म्हटलं आहे.

हे वाचा - Covishield दोनऐवजी एकच डोस घ्यायचा का? यावर केंद्राचं मोठं स्पष्टीकरण

हे औषध डीआरडीओच्या लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सने (INMAS) डॉ. रेड्डीज लॅब सोबत मिळून तयार केलं आहे. DCGI ने 8 मे रोजी या औषधाच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 17 मे रोजी हे औषध लाँच केलं होतं.

हे औषध रुग्णालयात दाखल रुग्णांना लवकर बरं होण्यास मदत करतं. तसंच रुग्णाचं कृत्रिम ऑक्सिजनवरील अवलंबित्व संपावं यासाठी औषध फायदेशीर असल्याचा दावा सरकारने केला आहे. क्लिनिकल ट्रायलच्या (clinical trial) निकालानुसार या औषधामुळे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण लवकर बरे झालेत. तसंच हे औषध दिल्यानंतर रुग्णांना फार काळ कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून रहावं लागलं नाही. 2DG देण्यात आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR TEST) निगेटीव्ह आली. हे औषध विषाणुची लागण झालेल्या पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणुला पसरण्यापासून ऱोखतं. तसेच रुग्णाची शक्तीदेखील वाढते, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

हे वाचा - प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर काही तासांत बाळाला MIS-C चा विळखा

या औषधाच्या पुरवठ्यासाठी डीआरडीओने रुग्णालयांना हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबशी (2DG@drreddys.com) संपर्क साधण्यास सांगितलं आहे. या औषधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन डॉ. रेड्डीज लॅब करणार आहे. हे औषध पावडरच्या रुपात लहान-लहान पाकिटात मिळत असून ते पाण्यासोबत दिलं जातं. याच्या एका पॅकेटची (Single Packet) किंमत डॉ रेड्डीज लॅबने 990 रुपये ठेवली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Medicine