अहमदाबाद, 01 जून : कोरोनातून बरं झालेल्या मुलांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) दिसून येत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात डिलीव्हरीआधी कोरोनामुक्त झालेल्या महिलेने जन्म दिलेल्या बाळामध्ये MIS-C (MIS-C in newborn baby) आढळून आला आहे.
गुजरातमध्ये एका महिलेला प्रेग्नन्सीत कोरोनाव्हायरसची लागण झाली. प्रसूतीच्या आधी ती कोरोनातून बरीसुद्धा झाली. कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेने जन्म दिलेल्या बाळाला मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमने (MIS-C in corona recovered mother's baby) आपल्या विळख्यात घेतलं आहे. जन्मानंतर 12 तासांतच या बाळाला MIS-C झाल्याचं निदान झालं, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
अहमदाबादमध्ये मेमनगरच्या एका खासगी रुग्णालयात सध्या या नवजात बाळाला आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयातील डॉ. देवांग सोलंकी यांनी सांगितलं, "अहमदाबादच्या वैष्णोदेवी सर्कलमधील रहिवाशी असलेल्या या महिलेला महिनाभरापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी या महिलेची मेडिकल हिस्ट्री तपासली होती"
हे वाचा - पालकांनो सावध राहा! लहान मुलांना कोरोनाचा डबल धोका; केंद्र सरकारने केलं Alert
इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रीक इनटेनसिव्ह केअर चॅप्टरच्या डेटानुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात 2000 पेक्षा जास्त MIS-C प्रकरणांची नोंद झाली होती.
लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलमधील अतिरिक्त अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितलं, "MIS-C हे लहान मुलांमध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मानलं जात आहे. एक ते 18 वयोगटातील मुलांवर याचा परिणाम होतो आहे. ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे, त्यांच्यावर याचा परिणाम जास्त दिसून येत नाही. पण लठ्ठ असलेल्यांना याचा धोका जास्त आहे"
MIS-C झालेल्या मुलांमध्ये ताप, लाल रॅशेस, अशक्तपणा, उलटी, पोटात वेदना, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणं दिसून येतात. "सध्या या आजाराबाबत अभ्यास सुरू आहे. MIS-C झालेल्या मुलांवर लक्ष ठेवलं जात आहे. त्यांच्यामध्ये असलेला ताप हा तीन दिवस असल्याचं तसंच डायरियामुळे त्यांना अशक्तपणा आल्याचं दिसून आलं आहे", असंही डॉ. जोशी यांनी सांगितलं.
हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता H10N3; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण
तज्ज्ञांच्या मते, कोरोनातून बरं झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी लहान मुलांमध्ये MIS-C लक्षणं दिसायला सुरुवात होते. कोरोनातून बरं झालेल्या मुलांमध्ये अँटिबॉडीज अचानक वाढतात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या किडनी, फुफ्फुस आणि यकृतावर होतो. त्यामुळे मुलांना MIS-C संसर्ग होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus