मुंबई, 19 जुलै : 1989 साली प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित रोमँटिक चित्रपट ‘चांदनी’ बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला होता. या चित्रपटात दाखवण्यात आलेला लव्ह ट्रँगल आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी चांदनीची प्रमुख भूमिका साकारली होती. तर, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनीही मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या चित्रपटापूर्वी ऋषी कपूर यांचे सलग 10 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. पण, चांदनी हा चित्रपट त्यांच्या करिअरला नवसंजीवनी देणारा ठरला. ऐंशीच्या दशकात यश चोप्रा प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांच्या नावामध्येच चित्रपट हिट करण्याची ताकद होती. ‘सिलसिला’ सारख्या चित्रपटाच्या अफाट यशानंतर त्यांना वेगळी ओळख मिळाली. पण, एक वेळ अशी आली की अचानक त्याचे बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप होऊ लागले. 80 च्या दशकाच्या अखेरीस प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या करिअरचा आलेख घसरत चालला होता. ते अत्यंत वाईट टप्प्यातून जात होते. त्यांनी आपला स्टुडिओ विकून टी-सीरिजसोबत शॉर्ट फिल्म बनवण्याचा विचारही केला होता. त्यांचं प्रॉडक्शन हाउस ‘यशराज फिल्म्स’ बंद झाल्याचीही चर्चा रंगली होती. कारण, त्यांनी तयार केलेले ‘वक्त’, ‘मशाल’, ‘फासले’ आणि ‘विजय’ असे अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले होते. मात्र, 1989 मध्ये रिलीज झालेल्या चांदनी या चित्रपटानं त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांची गणना प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांमध्ये होऊ लागली. हेही वाचा - 1990 ते1999; कोण होता बॉलिवूडचा किंग? ‘हा’ अभिनेता घ्यायचा सर्वाधिक मानधन या चित्रपटात मुख्य नायक म्हणून दिसलेल्या ऋषी कपूर यांचीही अवस्था यश चोप्रांसारखीच होती. ऋषी यांनी खुदगर्ज वगळता सलग 10 फ्लॉप चित्रपट दिले होते. या दोघांसाठी चांदनी चित्रपट अतिशय महत्त्वाचा ठरला. या चित्रपटानंतर दोघांनाही नवी दिशा मिळाली. ‘चांदनी’ चित्रपटात दाखवण्यात आलेला लव्ह ट्रँगल प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. मुख्य कलाकार ऋषी कपूर, श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांना या चित्रपटाचा खूप फायदा झाला. चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी लोकांना अक्षरश: वेड लावलं होतं.
ऋषी कपूर यांनी 1979 मध्ये ‘सरगम’ आणि 1980 मध्ये ‘कर्ज’ या चित्रपटांमधून आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिलं होतं. प्रेम रोग, कुली, तवायफ आणि सागर सारख्या चित्रपटांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. पण, ‘खुदगर्ज’ चित्रपटानंतर त्यांचे सलग 10 चित्रपट फ्लॉप झाले. त्यांची चित्रपट कारकीर्द संपल्यात जमा होती. मात्र, चांदनी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या यशानं सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर 27 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आजच्या हिशोबानं हे कलेक्शन 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.