मुंबई, 26 जुलै: रवी जाधव निर्मित प्रताप फड दिग्दर्शित आणि महाराष्ट्राची लाडकी क्रश हृता दुर्गुळे हिच्या अभिनयाने संपन्न अनन्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रुईया महाविद्यालयाची एकांकीका नंतर त्याचं नाटक झालं आणि त्यानंतर अनन्याचा प्रवास रुपेरी पडद्यावर अवतरला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनन्याला प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळत आहे. अनन्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल यात काही शंका नाही. दरम्यान सिनेसृष्टीसह प्रेक्षकही सिनेमाचं कौतुक करत आहेत. अनेक जण सिनेमाबद्दलची मत सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच एका कलाकारानं अनन्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तो कलाकार आहे वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन निखिल राणे. निखिलच्या व्हिसलिंग स्किल्स आपण अनेकवेळा पाहिल्या आहेत. अनन्या सिनेमासाठी निखिलनं त्याच्या अंदाजात खास शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्या सिनेमातील ‘न कळता’ हे गाणं प्रेक्षकांना फार आवडलं आहे. सिनेमाची सुरूवातच या सुंदर गाण्यानं झाली आहे. या गाण्याचं म्युझिक निखिलनं त्याच्या स्टाइलमध्ये शिट्टी वाजवून सादर केलं आहे. निखिलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे निखिलनं कलाकारांना आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हेही वाचा - ‘मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे’; वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची दोस्तासाठी खास पोस्ट निखिलनं म्हटलं आहे, ‘अनन्या सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अनन्या सिनेमा पाहण्यासाठी मीसुद्धा जाणार तुम्हीही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये सिनेमा नक्की पाहा’, असं आवाहन देखील निखिलनं केलं आहे.
निखिलविषयी सांगायचं झालं तर आपल्याकडे शिट्टी वाजवणं चांगलं समजलं जात नाही. निखिलच्या बाबतीत शिट्टी वाजवणं हेच त्याचं करिअर झालं आहे. निखिलनं शिट्टी वाजवून अनेक गाणी गाऊ शकतो. त्यानं वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. निखिलला लहानपणापासून उत्तम शिट्टी वाजवता येते. 2015मध्ये जपानमध्ये झालेल्या वर्ल्ड व्हिसलिंग कनवेन्शनमध्ये निखिल सहभागी झाला होता. सुरुवातीला त्याच्या या गोष्टीसाठी विरोध झाला पण निखिलनं हार मानली नाही. त्यानं जपानच्या वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियनशीपमध्ये ‘हम्मा हम्मा’ हे प्रसिद्ध गाणं वाजवलं. ‘हिकी फुकी’ कॅटेगरी म्हणजेच वाद्य वाजवून शिट्टी वाजवावी लागते. या कॅटेगरीमध्ये निखिलनं भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. त्यानंतर 2018मध्ये देखील निखिलनं भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. निखिलची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे.