मुंबई, 14 सप्टेंबर : कोणतीही महत्त्वाची घडामोड घडली की त्यावर सेलिब्रिटीही (Celebrity) व्यक्त होत असतात. त्या घटनेबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडतात. पण बॉलिवूडमधील तीन खान (Bollywood khan) मात्र कोणत्याही मुद्द्यावर बोलताना दिसत नाहीत. कायम ते मौन बाळगतात. असं का? यामागील नेमकं कारण अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सांगितलं आहे. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर भारतीय मुस्लिमांनी केलेल्या काही वक्तव्यांवर नसिरुद्दीन शाह यांनी अलिकडेच एक टिप्पणी केली होती. ती खूप व्हायरल झाली होती. मुस्लिम असल्यामुळे आपल्याला कधीच बॉलिवूडमध्ये (Bollywood) भेदभावाची वागणूक मिळाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आता त्यांनी सरकारच्या प्रपोगंडा फिल्म्सबद्दल (Propoganda Films) भाष्य केलं आहे. ‘ एनडीटीव्ही ’ला दिलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन म्हणाले, ‘सध्या प्रपोगंडा फिल्म्सचा काळ आहे. सरकार, तसंच सरकारचे समर्थक आणि लोकप्रिय नेत्यांवर आधारलेले, त्यांच्या कार्याचा उदोउदो करणारे सिनेमे बनवण्याचा काळ आहे. अशा सिनेमांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. आर्थिक मदतही केली जाते. अशा फिल्म्स तयार केल्या, तर त्या करणाऱ्यांना क्लीन चिट दिली जाण्याचं वचनही दिलं जातं. ज्या तऱ्हेचे बिग बजेट सिनेमे येत आहेत, ते पाहून हे लक्षात येतं,’ हे वाचा - Good News! अखेर जेठालालला मिळाली नवी ‘दया’; पाहा कोण आहे ती अभिनेत्री बॉलिवूडमध्ये मोठे निर्माते आणि अभिनेत्यांना सरकारचं कौतुक करणारे सिनेमे बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्या बदल्यात त्यांना क्लीन चिट देण्याचं वचन दिलं जात की नाही, याबद्दल आत्ता आपल्या हाती पुरावा नसल्याचं त्यांनी सांगितलं; मात्र ज्या प्रकारचे सिनेमे सध्या तयार होत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे कळत असल्याचं शाह म्हणाले. मोठ्या व्यक्ती त्यांच्या कट्टरतावादाच्या (Extremism) अजेंड्याला लपवू शकत नाहीत, असंही शाह यांनी म्हटलं आहे. ‘चित्रपटसृष्टीत कलाकारांना एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्यासाठी भाग पाडलं जातं. आमीर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या बॉलिवूडच्या तीन खानांनी मात्र आजपर्यंत कोणत्याच विषयात आपलं मत व्यक्त केलेलं नाही. ते काही बोलले, तर त्यांना किती त्रास दिला जाईल, याची त्यांना कल्पना आहे. तो त्रास केवळ आर्थिक स्वरूपाचा नसेल, तसंच केवळ काही एंडॉर्समेंट गमावण्यापुरता मर्यादित नसेल. त्यांच्या साऱ्या एस्टॅब्लिशमेंटलाच त्रास दिला जाईल. म्हणूनच ते बोलत नाहीत. कारण बरंच काही गमावण्याची भीती त्यांना आहे. जो कोणी बोलण्याची हिंमत करतो, त्याला त्रास दिला जातो. हे फक्त मी किंवा जावेदसाहेबच (अख्तर) नव्हे, तर राइट विंग मानसिकतेच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकालाच हे सहन करावं लागतं. हे दोन्ही बाजूंनी वाढत आहे.’, असं ते म्हणाले. हे वाचा - पुण्याच्या दीप्ती तुपेनं जिंकलं अमिताभ यांचं मन; मात्र या प्रश्नावर करावं लागलं गेली पाच दशकं भारतीय सिनेमासृष्टीत कार्यरत असलेल्या नसिरुद्दीन शाह यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘मिर्च मसाला’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘जुनून’, ‘मंडी’, ‘अर्ध सत्य’, ‘जाने भी दो’ असे काही उत्तम सिनेमे त्यांनी केले आहेत. ‘वेन्स्डे’ सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.