मुंबई, 16 फेब्रुवारी : ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेता संदीप नाहरनं आत्महत्या केली. मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यानं आपल्या बायकोच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली. त्याची पत्नी त्याला इतका त्रास द्यायची की काम संपल्यानंतर त्याला घरी जायला देखील भीती वाटत असे, असं त्यानं लिहिलेल्या अंतिम पत्रात म्हटलं आहे. परंतु याच पत्रात त्यानं आणखी एक इच्छा व्यक्त केली आहे. पाहूया काय होती संदीपची शेवटची इच्छा.
संदीपचं पत्नी कंचन शर्मासोबत दररोज भांडण होत असे. परंतु तरी देखील त्याचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. त्यानं आपल्या सुसाईड नोट्समध्ये देखील पत्नीला कुठलीही शिक्षा करु नका अशी विनंती पोलिसांना केली आहे. “माझी पत्नी थोडी विक्षिप्त स्वभावाची आहे. कृपया माझ्या मृत्यूनंतर कोणीही तिला दोष देऊ नका. तिला मानसिक उपचाराची गरज आहे. ती काय बोलते काय करते याचं भान तिला नसतं.” अशा आशयाची विनंती संदीपनं या सुसाईड नोटमध्ये केली आहे.
अवश्य पाहा - संदीप नाहर पत्नीमुळं होता त्रस्त; अभिनेत्याला घरी परतायला वाटायची भीती
हे पाहा संदिपनं लिहिलेलं संपूर्ण पत्र
“आता जगण्याची इच्छा होत नाही आहे. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Bollywood, Crime news, Entertainment, Last wish, Star celebraties, Suicide