मुंबई, 20 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती. या शोचा 14वा सीझन सुरू आहे. मागच्या काही महिन्यांपासून केबीसी 14 च्या मंचावर अनेक स्पर्धक येऊन गेले. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रंगलेल्या प्रश्न उत्तरांनी खेळाची रंगत चांगलीच वाढवली होती. केबीसी 14चा पहिला करोडपती देखील समोर आला आहे. कोल्हापूरच्या कविता चावला या केबीसी 14च्या पहिल्या करोपती ठरल्या आहेत. 45 वर्षांच्या कविता यांनी प्रश्नांची धमाकेदार उत्तर देत बिग बींसह सगळ्यांना इम्प्रेस केलं. कविता एक गृहीणी असून 1 करोड पर्यंतच्या प्रश्नापर्यंत त्यांनी मजल मारली आणि केबीसी 14 च्या पहिल्या करोडपती होण्याचा मान मिळवला. केबीसी 14 च्या या आठवड्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात कविता चावला या हॉट सीटवर बसल्या आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी कविता यांना तुम्ही 1 करोड रुपये जिंकले आहे असं सांगतात. त्यानंतर बिग बी कविता यांना 7.5 करोडचा प्रश्न विचारताना दिसत आहेत. ‘शेवटचा प्रश्न शेवटचा टप्पा. 1 करोड जिंकल्यानंतर कविता चावला 7.5 करोड रुपयांचं शेवटचा टप्पा जिंकू शकतील का?’, असं कॅप्शन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Kaun Banega Crorepati : केबीसी’च्या सेटवर आले जुळे भाऊ; ओळख पटण्यासाठी बिग बींनी लढवली अनोखी शक्कल; पाहा व्हिडीओ
कोण आहेत कविता चावला? कविता चावला या कोल्हापूरच्या असून त्यांचं वय 45 वर्ष आहे. त्या एक गृहीणी असून त्यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालं आहे. त्यांच्या शिक्षणाविषयी त्या म्हणतात, ‘लोकांना वाटू शकतं की मी कमी शिकली आहे त्या काळात इतकं शिक्षण फार मोठं होतं. कॉलेज झाल्यानंतरही मी शिकणं सोडलेलं नाही’. कविता यांच्या नवऱ्याचं कोल्हापूरात कपड्याचं दुकान आहे. त्यांना एक मुलगा असून त्यांचं नुकतंच BCA पूर्ण झालं आहे. केबीसीच्या मंचावर त्यांचाही मुलगा त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी झाला होता. कविता चावला साल 2000 पासून केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 12 व्या सीझनमध्ये देखील त्यांनी प्रयत्न केले होते. त्या फास्टेस्ट फिंगर राउंडपर्यंत पोहोचल्या होत्या. पण हॉटसीटवर बसण्याची त्यांची संधी हुकली. याविषयी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘फास्टेस्ट फिंगरपर्यंत पोहोचूनही मी हॉट सीटवर जाऊ शकले नाही त्यावेळी मला फार वाईट वाटलं होतं. मला आठवतंय मी तिथेच रडायला लागले होते. तेव्हा बिग बी अमिताभ बच्चन माझ्याजवळ येऊन त्यांनी मला डिमोटिवेट न होण्याचा सल्ला दिला होता’.