Home /News /entertainment /

The Kashmir Files मध्ये चिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे नेमका आहे तरी कोण?

The Kashmir Files मध्ये चिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे नेमका आहे तरी कोण?

सध्या रिलीज झालेला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.

    मुंबई, 16 मार्च-  आतापर्यंत बॉलिवूडमध्ये (Bollywood) सत्य घटनांवर आधारित शेकडो चित्रपट तयार झाले आहेत. अशा चित्रपटांमुळे इतिहासाच्या पोटात दडलेल्या अनेक घटना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. काही चित्रपट इतके वास्तवदर्शी असतात की, ते पाहताना आपण त्यात भावनिकदृष्ट्या अडकून जातो. अशाच चित्रपटांमध्ये नुकत्याच रिलीज झालेल्या 'द काश्मीर फाइल्स'चा (The Kashmir Files) समावेश झाला आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. प्रेक्षक आपापसातच या चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत. चित्रपटाची क्रेझ पाहून अनेक राज्यांनी तो टॅक्स फ्रीदेखील (Tax Free) केला आहे. या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) झालेला हृदयद्रावक अत्याचार दाखवण्यात आला आहे. चित्रपटात एक मुलाखतदेखील (Interview) दाखवण्यात आली आहे. ही मुलाखत पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. सत्यकथा सांगणाऱ्या या चित्रपटामध्ये बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्याची मुलाखत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बिट्टा कराटे (Bitta Karate) नावाची व्यक्ती प्रचंड चर्चेत आली आहे. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात भयंकर दहशतवादी बिट्टा कराटे म्हणजेच म्हणजेच फारुख अहमद दार याचं पात्र दाखवण्यात आलं आहे. या बिट्टानं 20 नागरिकांना 1990 मध्ये ठार मारलं (Murder) होतं, त्यापैकी बहुतेकजण काश्मिरी पंडित होते. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काश्मीरमधील सर्वांत धोकादायक दहशतवादी बिट्टाची दहशत, निरपराध लोकांची हत्या आणि असंख्य वेदनादायक घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटात बिट्टाची एक मुलाखतही दाखवण्यात आली आहे. बिट्टा कराटेचा एक व्हिडिओ युट्युबवर (You Tube Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या मूळ मुलाखतीचा आहे. ज्यामध्ये त्यानं स्वतः काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. बिट्टा कराटे म्हणतो की, त्यानं सुमारे 20 लोकांची हत्या केली आणि त्यात बहुतेक काश्मिरी पंडित होते. व्हिडिओमध्ये बिट्टा जेव्हा लोकांना मारण्याबद्दल बोलतो आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचितही दुःख किंवा पश्चाताप दिसत नाही. बिट्टा कराटेनं ज्या 20 नागरिकांची हत्या केली होती. तू पहिल्यांदा कुणाची हत्या केलीस असं विचारल्यावर बिट्टानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कार्यकर्ता सतीश कुमार टिक्कू याला मारल्याचं या टीव्ही मुलाखतीत सांगितलं होतं. काश्मीर लिबरेशन फ्रंटचा एरिया (Kashmir Liberation Front) कमांडर इश्फाक माजीद वानीच्या सांगण्यावरून या सर्व हत्या केल्याचं बिट्टानं कबूल केलं होतं. 'आपल्या भावाला किंवा आईला मारण्याचाही आदेश मिळाला असता तर आपण नकार दिला नसता का?', असा प्रश्न त्या टीव्ही मुलाखतीतल्या मुलाखतकाराने विचारला होता. ‘हो मला आदेश आला की आई किंवा भावालाही ठार मारेन,’असं बिट्टा याने उत्तर दिलं होतं. त्याच व्हिडिओच्या शेवटी दिवंगत सतीश कुमारच्या वडिलांना मुलाखत घेणाऱ्याने विचारल्याचं दिसतंय की तुमच्या मुलाची हत्या करणाऱ्या बिट्टाला कोर्टाने काय शिक्षा द्यावी असं तुम्हाला वाटतं? त्यावर सतीश कुमार यांनी माझा मुलगा आता परत येणार आहे का? असा खेदजनक प्रतिप्रश्न केल्याचं दिसत आहे. पाकिस्तानातून 32 दिवसांचं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आपण दहशतवादी बनल्याचं बिट्टानं मुलाखतीत कबूल केलं होतं. केवळ 20 वर्षांचा असताना स्थानिक प्रशासनावर नाराज होऊन दहशतवादी होण्याचा त्यानं निर्णय घेतला होता. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडानंतर बिट्टा कराटेनं राजकारणात (Politics) प्रवेश केला होता. मुलाखतीत बिट्टानं हत्याकांडातील सर्व आरोपांची कबुली दिली होती. मात्र, नंतर त्यानं आपल्याच वक्तव्यांबाबत माघार घेतली होती. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (Public Safety Act) पोलिसांनी त्याला अटक केली होती. जवळपास 16 वर्षे तो तुरुंगात होता. 2006 मध्ये जम्मूच्या टाडा कोर्टातून (Jammu TADA Court) त्याची जामिनावर सुटका झाली. तपास यंत्रणांना त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करता आले नाहीत, असं म्हटलं जातं. बिट्टाला जून 1990 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. 2006 पर्यंत म्हणजे 16 वर्षे तो तुरुंगात राहिला. 2006 मध्ये त्याची जामिनावर सुटका करताना टाडा न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.डी. वाणी म्हणाले होते की, 'आरोपीवर गंभीर आरोप आहेत, ज्यासाठी मृत्युदंड (Death Penalty) किंवा जन्मठेपेची (life-imprisonment) शिक्षा होऊ शकते. न्यायालयाला याची जाणीव आहे. परंतु, न्यायालयाला वस्तुस्थिती बघावी लागते. खटला योग्य पद्धतीने मांडण्यात फिर्यादी पक्षानं फारसं स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे बिट्टाला जामीन मंजूर झाला आहे.' (हे वाचा:Kashmir Filesसिनेमातले संवाद म्यूट केल्याबद्दल पहिल्यांदाच बोलला चिन्मय मांडलेकर) तुरुंगातून सुटल्यानंतर बिट्टा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाला. बिट्टा कराटे उर्फ फारुख अहमद दार हा सध्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) अध्यक्ष आहे. आजही तो जम्मू-काश्मीरमध्येच (Jammu-Kashmir) आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करत एनआयएनं (NIA) 2019 मध्ये त्याला अटक केली होती. दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप बिट्टावर ठेवण्यात आला होता.'द काश्मीर फाइल्स' चित्रपटामुळं बिट्टा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही ते लोक बिट्टाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक दिसत आहेत.
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, New release

    पुढील बातम्या