मुंबई, 15 मार्च: The Kashmir files चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाची अंगावर काटा उभा करणारी विदारक कहाणी या चित्रपटात मांडली आहे. काँग्रेस आणि भाजपने यावरून राजकीय वातावरणही तापवलं आहे. गोव्यात एका चित्रपटगृहात मुद्दाम कमी तिकिटं विकल्याचा आरोप होत आहे, तर भिवंडीच्या काही थिएटरमध्ये दहशतवादी ‘बिट्टा’च्या तोंडचे काही संवाद म्यूट केले जात असल्याच्या बातम्या आहेत. सिनेमात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका जिवंत करणाऱ्या चिन्मय मांडलेकरने News18 lokmat शी बोलताना प्रथमच याविषयी मत व्यक्त केलं आहे. “काही ठिकाणी सिनेमातले ठराविक संवाद म्यूट करून दाखवण्यात येत आहे, असं माझ्याही कानावर आलं. हे चुकीचं आहे. बिट्टाच्या तोंडचे संवाद हा सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. सिनेमातलं ते एक कॅरेक्टर आहे आणि मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आङे. मला नाही वाटत की त्यातल्या माझ्या तोंडच्या कुठल्याही संवादाने कुणाच्या भावना दुखावल्या जातील.” चिन्मय मांडलेकरची भूमिका काश्मीर फाइल्समध्ये महत्त्वाची आहे. खूप मेहनत घेऊन त्याने बिट्टा रंगवला आहे. सिनेमाला मिळणारा रिस्पॉन्स पाहून आपण खूश आहोत, असं चिन्मय सांगतो. “आम्ही सगळ्यांनीच केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. या प्रकारे उस्फूर्त प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. सिनेमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.” कशी केली भूमिकेची तयारी? ‘The Kashmir Files’ चित्रपटाबद्दल PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले… माझ्या करिअरमध्ये बिट्टासारखी भूमिका अद्यापपर्यंत मिळाली नव्हती. त्यामुळे काश्मिरी अतिरेक्याची ही भूमिका निभावण्यासाठी मी बरीच तयारी केली. काही video पाहिले. बिट्टाचे काही जुने व्हिडीओ मला मिळाले. ते वारंवार पाहिले. याशिवाय अनेक कागदपत्र, संदर्भ चाळले. यातून मला या भूमिकेला न्याय देता आला. एकाच दिवशी आणि एकाच वेळी रणवीर आणि अल्लू आमनेसामने! वाचा काय आहे ही फाइट? पल्लवी जोशीने केली होती शिफारस बिट्टाच्या भूमिकेसाठी आपलं नाव पल्लवी जोशीने सुचवलं होतं, असं चिन्मय सांगतो. “आम्ही एका मराठी मालिकेत एकत्र काम केलं होतं. पल्लवी मला चांगली ओळखते. पण सामान्य कलाकाराप्रमाणे मीसुद्धा स्क्रीन टेस्ट, ऑडिशन अशा पायऱ्या पार करूनच या भूमिकेपर्यंत पोहोचलो.” चिन्मयला या भूमिकेसाठीचे काही डायलॉग्ज वाचायला दिले होते. ते ऐकूनच चिन्मयचं नाव बिट्टासाठी फायनल केलं गेलं. त्यानंतर बिट्टाचं कॅरेक्टर रंगवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा बरंच साहित्य उपलब्ध करून दिलं, असं चिन्मय सांगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.