मुंबई, 01 मार्च : अभिनेत्री सारा अली खान मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिचा लव्ह आज कल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या ऑफ आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा मात्र जोरदार झाली. अनेकदा तर प्रमोशन इव्हेंटमध्ये चाहत्यांकडून साराला भाभी अशी हाकही मारली गेली. दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सारानं तिच्या आई-वडीलांविषयी मोठा खुलासा केला आहे.
साराच्या आई- वडिलांना अर्थात सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला. अमृता एकटीच राहते आणि दोन्ही मुलांना एकटीनेच लहानाचं मोठं केलंय. असं असलं तरी सैफ दोन्ही मुलांच्या फार जवळ आहे. अनेकदा सारा आणि इब्राहिम सैफच्या घरी जाताना दिसतात. एका चॅट शोमध्ये साराने तिच्या आई- वडिलांचे एकमेकांसोबतचं नातं कसं आहे हे सांगितलं. सारा म्हणाली की, जेव्हा कोलंबिया युनिर्व्हसिटीत सैफ तिला सोडायला गेला होता तेव्हा तिची आई अमृता सिंगही तिथे होती. तिघांनी न्युयॉर्कमध्ये एकत्र रात्रीचं जेवण केलं.
सारा म्हणाली, ‘तो फार चांगला काळ होता. मला कॉलेजला सोडायला माझे आई-बाबा आले होते. त्या काळात मी आणि बाबा एकत्र रात्रीचं जेवण करायचो. तेव्हा आमच्या डोक्यात आलं की आईलाही बोलावून घेतलं पाहिजे. आम्ही लगेच आईला फोन लावला. तीही लगेच आली.’ सारा २०१४ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकायला गेली होती.
सारा पुढे म्हणाली की, ‘आम्ही एकमेकांसोबत फार चांगला वेळ घालवला. ते मला कॉलेजमध्ये सोडून परत भारतात आले. त्यावेळी आई माझी झोपायची खोली आवरत होती तर बाबा लँपचा बल्ब लावत होते. या फार अविस्मरणीय आठवणी आहेत ज्या नेहमीच माझ्यासोबत राहतील.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta singh, Bollywood, Saif Ali Khan, Sara ali khan