मुंबई, 26 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हजेरी लावली कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी-राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले होते साप्ताहिक कार्य. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि त्याची विजेती ठरली TEAM A. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये येणार आहेत समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस . त्यामुळे आजचा भाग खास असणार आहे. आज घरामध्ये अमृता फडणवीस यांच्या साथीने सदस्य साजरा करणार दिवाळी सण. बिग बॉस यांनी जाहीर केले, आज घरात येणार आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस. त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृताजींना काही प्रश्न देखील विचारले. यावेळी यशश्रीने अमृता फडणवीस यांना विचारले, तुमच्या कपलपैकी कोणाला वाटतं की तुम्ही बिग बॉसमध्ये असता तर जिंकला असता. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाही, त्यांना घरीच यायचंय ना शेवटी. देवेंद्रजी बिग बॉस आणि मी सगळे निर्णय घेणार’.
यशश्री अमृता फडणवीस यांना आणखी काही प्रश्न विचारले. यशश्री म्हणाली देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते. किरण माने यांनी विचारले, तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असते, पण मला तुम्हांला विचारायचे आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे ? अमृताजी म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथ राव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.
दरम्यान, अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत घरात आज काय काय घडणार आणि काय खुलासे होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.