मुंबई, 21 जानेवारी: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेब सिरीज 'वेन्सडे'सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही हॉलिवूड वेब सिरीज असली तरी भारतात देखील ती चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या सीरिजचं मुख्य आकर्षण म्हणजे यातील कलाकार आणि त्यांचे दमदार अभिनय. प्रेक्षकांना या मालिकेतील स्टार कास्टही खूप आवडली. या मालिकेत वेन्सडे अॅडम्सची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेना ओर्टेगाची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग रातोरात वाढली आहे. मात्र, आता ही मालिका नेटफ्लिक्सवरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काय आहे त्यामागचं कारण जाणून घ्या.
'वेन्सडे' ही मालिका नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका ठरली आहे. 'वेन्सडे'ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण दरम्यान, ही मालिका नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. या मागणीमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे झेवियरची भूमिका साकारणारा अभिनेता पर्सी हायनेस व्हाईट. पर्सीवर त्याच्या हायस्कूलमधल्या महिलांनी खूप गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Sushant Singh Rajput B'day: 'असं वाटतं की तू...'; सुशांतच्या बहिणीची 'ही' पोस्ट तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून महिलांनी पर्सीवर हे आरोप केले आहेत. रिपोर्टनुसार, ट्विटरवर एका युजरने पर्सी तसेच त्याच्या मित्रांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, पर्सी हायनेस व्हाईट आणि त्याचे मित्र महिलांना भेटायला बोलावायचे, जेणेकरून ते त्यांच्यावर अंमली पदार्थ घेऊन लैंगिक अत्याचार करू शकतील. इतकंच नाही तर लैंगिक शोषणासोबतच महिलांनी अभिनेत्यावर गैरवर्तन केल्याचा आरोपही केला आहे.
#cancelpercy @netflix you either recast Xavier or kill him off bc ..if I see Percy in season two of Wednesday I will quite literally stop watching and cancel my subscription:)
— savefatethewinxsagacampaign (@savefatee) January 19, 2023
पर्सीच्या विरोधात अनेक ट्विट समोर आले आहेत. त्यानंतर आता महिलांचे म्हणणे आहे की पर्सी हायनेस व्हाईटला 'वेन्सडे' या गाजलेल्या मालिकेतून काढून टाकावे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्सही या महिलेला साथ देत आहेत. या मालिकेनंतर पर्सीला खूप पसंती दिली जात होती. पण त्याच्या वाईट कृत्यांबद्दल माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत.
आता या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते तपासणं महत्वाचं ठरेल. आणि पर्सीने खरंच गंभीर गुन्हा केला असेल तर त्याला या वेब सीरिजमधून काढून टाकण्यात येणार का, तो सीरिजच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार का या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Web series