मुंबई, 05 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. या चित्रपटातील वरुणची शैली त्याच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. नुकताच वरूण सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचला होता. तिथे मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना वरुणला रडू कोसळलं. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२२’ या कार्यक्रमामध्ये वरुणने हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुणने आपल्या आगामी चित्रपटाबाबत तसेच चित्रपटसृष्टीमधील घडामोडींबाबत भाष्य केलं. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यामध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला. कार्यक्रमात वरुणला ‘कोरोना काळातील असा एक अनुभव ज्यामुळे तुमच्यात बदल झाले’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेता चांगलाच भावुक झाला.यावेळी तो म्हणाला कि, ‘‘मी आजपर्यंत ही गोष्ट कोणासोबत शेअर केली नाही. अशी एक व्यक्ती होती जी माझ्यासोबत 26 वर्ष होती आणि अचानक मला सोडून गेली…’’ हेही वाचा - Prashant Damle: अन् तो दिवस पुढची अडीच तीन वर्ष अशांतता घेऊन आला; प्रशांत दामलेंनी सांगितली ती कटू आठवण पुढे तो म्हणाला, ‘‘मनोज त्याचं नाव होतं. त्याचं निधन माझ्या डोळ्यासमोर झालं. करोना झाल्यानंतर तो त्यामधून बरा झाला. पण त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मनोजचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर मी खूप अस्वस्थ झालो होतो. आता तू यामधून बाहेर ये असा सल्ला मला प्रत्येकाने दिला. यामधून कसं बाहेर पडणार याचाच मी विचार करायचो. तो माझ्याबरोबर जवळपास २६ वर्षं होता. मी आज जो काही आहे तो त्याच्यामुळे आहे. आज देखील त्याची आठवण आल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येतं….’’ अशा भावना व्यक्त करत वरुण भर कार्यक्रमामध्येच रडू लागला.
‘भेडिया’ चित्रपटाबद्दल सांगायचं तर यामध्ये वरूण धवनच्या आत लांडग्याचा आत्मा आल्याचं पाहायला मिळत आहे. वरुणचे डोळे आणि ज्वाला रात्रीच्या अंधारात जंगलात पौराणिक लांडग्याची झलक दाखवतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा उत्तम वापर करून सस्पेन्स आणि थ्रिलर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकताच ‘भेडिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा ‘भेडिया’ सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. भेडिया सिनेमाची कथा कॉमेडी हॉरर भोवती फिरतानी दिसणार आहे. सिनेमात वरुण भास्कर चोप्राच्या भूमिकेत दिसणार आहे तर, क्रिती सेनॉन डॉक्टर अनिका कोठारीच्या भूमिकेत आहे. वरुण धवन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिनेश विजन निर्मित या चित्रपटात वरुण एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत क्रिती पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी दोघेही ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र दिसले होते. 25 नोव्हेंबरला ‘भेडिया’ 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात रिलीज होणार आहे.