मुंबई, 05 नोव्हेंबर : आज मराठी रंगभूमी दिन आहे. या दिवशी रंगभूमी गाजवलेल्या एका नटाचं नाव आवर्जून घेणं भाग आहे. हा नट म्हणजे मराठी नाटक घराघरात पोहचवलेला, मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले. गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर चालणारच, ही खात्री निर्मात्याला असतेच असते. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. येत्या ६ नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात ते १२,५०० व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठणार आहेत. हे नाटक आहे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’. एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं. रंगभूमीवरील त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रशांत दामलेंना या प्रवासात अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढ्या वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आता रंगभूमी वरील त्यांच्या १२,५०० व्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला आहे. या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं आहे कि, ’ येत्या काही दिवसांतल्या माझ्या १२,५०० व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसं वाटतंय..?’ वगैरे वगैरे. पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलंच नाही. मला नाटक करायचं आहे, लोकांना नाटक दाखवायचं आहे एवढंच मला कळत होतं.तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचं कसं होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु नाटक आजवर काही थांबलेलं नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेलं. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला!’ हेही वाचा - Aai kuthe kay karte: मालिकेत मोठा ट्विस्ट; देशमुखांच्या घरावर कोसळणार नवीन संकट पुढे त्यांनी एक खास किस्सा सांगितलं आहे. प्रशांत दामले म्हणतात कि, ’’ आणि मग तो दिवस आला..१८ जानेवारी २००१ हा दिवस मी कधीच विसरणार नाही. या एकाच दिवसात मी तीन नाटकांचे पाच प्रयोग केले. प्रयोगाआधीची ती धावपळ, सहकलाकारां सोबतची जुगलबंदी आणि प्रेक्षकांची दाद या हव्याहव्याशा गोष्टी एकाच दिवसात पाच वेळा मिळाल्यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हे विचारायलाच नको! वेगळीच धमाल होती ती! एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात जाताना त्याचे संवाद आणि विनोद आठवत जायचो! हे स्मरणशक्तीसाठी अवघड होतंच, पण शरीरासाठीही होतं. रंगमंचावरचा प्रकाश आणि रसिकांच्या टाळ्या यानेच ते पेलण्याची ऊर्जा दिली. मात्र, हा दिवस लक्षात आहे असं मी म्हणालो ते यासाठी नाही. हा एकच दिवस पुढची अडीच-तीन वर्षांची अशांतता घेऊन आला. सगळीकडे नाव होत होतं, अभिनंदनाचा वर्षांव होत होता.. पण मी अस्वस्थ होतो.
‘‘एका दिवसात इतक्या वेळा घशाला ताण दिल्याने त्याला सूज आली होती. तोंडातून शब्द फुटणं मुश्किल झालं होतं. आवाज ही कोणत्याही नटाची सर्वात जमेची बाजू असते. विनोदी अभिनेत्याला तर आवाजाचा हुकमी वापर करावा लागतो. मात्र, त्या दिवसानंतर आता परत रंगमंचावर उभं राहता येईल असं वाटेनासं झालं होतं. म्हणाल ते उपचार केले. दर वेळी एखादा उपचार सुरू केला की आशा वाटायची. नाटकाचा तो जिवंत अनुभव परत घेता येईल असं वाटायचं. आणि मग निराशाच पदरी यायची.’’
‘‘आयुर्वेदाच्या उपचारांनी हळूहळू जरा आवाज फुटू लागला. मी माझ्या आरोग्याबाबत सतर्क झालो. मला माहीत होतं, मी सगळ्यात आनंदी, चिंतामुक्त असतो ते स्टेजवर! ते परत मिळवायचं असेल तर आधी स्वत:ची काळजी घ्यावी लागणार होती. मी प्राणायाम, सूर्यनमस्कार घालणं सुरू केलं. हा खूप मोठा धडा होता. कलाकार म्हणून तुम्ही सतत लोकांना दिसावं लागतं.. तुमची विश्वासार्हता टिकवावी, वाढवावी लागते. याचं महत्त्व या काळात जाणवलं. एक विश्वविक्रम मला खूप काही शिकवून गेला.’’