मुंबई 9 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या आहेत. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉटदेखील केलं गेलं आहे. अशात आता व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) असल्यानं कार्तिकविषयीच्या बातम्यांकडं त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता कार्तिकनं 7 फेब्रुवारी म्हणजेच रोज डेदिवशी आपल्या इन्स्टाग्रावरून शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटीशी मुलशी कार्तिकला गुलाबाचं फुल देत आहे. कार्तिकच्या या खास व्हिडीओला भरपूर लाईक आणि कमेंट मिळताना दिसत आहेत. काहींनी कमेंट करत कार्तिकला रोज डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत कार्तिकनं लिहिलं, की असा रोज डे दररोज येवो. मिळालेल्या माहितीनुसार, हा एक जुना व्हिडीओ आहे, जो कार्तिकनं शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी कार्तिकला गुलाबाचं फुल देताना दिसत आहे. हे पाहून कार्तिक लाजतो आणि आपल्या गुडघ्यांवर बसून या चिमुकलीकडून फुल घेतो.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या कार्तिककडे काही सिनेमे आहेत. लॉकडाऊनपूर्वी कार्तिक आपल्या ‘भुल भुलैया 2’ सिनेमाचं कियारा अडवाणीसोबत लखनऊमध्ये चित्रीकरण करत होता. यानंतर अशी बातमी समोर आली, की या सिनेमाचं चित्रीकरण सप्टेंबरमध्ये सुरू होईल. मात्र, आता पुन्हा चित्रीकरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कार्तिकनं नोव्हेंबर महिन्यात आपल्या धमाका या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत कार्तिकनं म्हटलं होतं, की आज माझा वाढदिवस आहे, धमाका व्हायलाच पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कार्तिक जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांच्यासोबत दोस्ताना 2 या सिनेमातही झळकणार आहे.