मुंबई 16 जुलै: उर्मिला कोठारे ही अभिनेत्री सध्या तिच्या नव्या सिनेमासाठी सज्ज होताना दिसत आहे. जिजाच्या म्हणजे तिच्या मुलीच्या जन्मनानंतर उर्मिलाने काम केलेला पहिला सिनेमा ‘एकदा काय झालं’ येत्या ऑगस्ट महिन्यात भेटीला येत आहे. या सिनेमाच्या टिझर लाँचच्या वेळी उर्मिला एका मुलाखतीत बोलताना दिसली. सुखी संसाराचं एक गुपित सुद्धा तिने यात शेअर केलं. उर्मिलाच्या आजोबांनी तिला एक रहस्य सांगितलं जे त्यांच्या संसारात त्यांना खूप उपयोगी पडलं. उर्मिलाने आजी आजोबांची खास आठवण एका मुलाखतीत शेअर केली आहे. उर्मिलाने कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, “माझ्या आजी आजोबांमध्ये कायम वाद व्हायचे जसे प्रत्येक जोडप्यांमध्ये होतात. माझी आजी कधी चिडायची भुणभुण करायची. मी एकदा माझ्या आजोबांना विचारलं की तुम्ही आजीसोबत एवढे वर्ष नेटाने संसार कसा केलात? त्यावर त्यांनी मला एक सल्ला दिला. ते म्हणाले की जेव्हा केव्हा आमचं भांडण होतं मी चप्पल घालून थोडावेळ बाहेर जातो. शांत ठिकाणी बसतो आणि याचा विचार करतो की माझ्या आयुष्यात तिने मला किती साथ दिली. तिने माझ्यासाठी काय काय केलं याचा विचार केला की त्या गोष्टी प्रत्येक चुकीला कमी ठरवतात. याचा विचार केल्यावर आलेला राग आणि भांडण मी केव्हाच विसरून गेलेलो असायचो.” उर्मिलाला मिळालेला हा सल्ला तिने सगळ्यांसोबत शेअर केला आहे. हे ही वाचा- Kajal Kate: परीच्या वयाची असल्यापासून शेफालीला करायचं होतं लग्न, काजलच्या आयुष्यातला खरा हिरो कोण आहे? उर्मिलाचं पर्सनल आयुष्य मागच्या काळात बरंच चर्चेत आलं होतं. तिचा नवरा आणि तिच्यात संबंध बरे नाहीत आणि लवकरच ते वेगळे होणार अशा बातम्या जोर धरत होत्या. उर्मिलाने आदिनाथच्या सिनेमाचं प्रमोशनसुद्धा केलं नव्हतं असं तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होतं. पण आदिनाथने यावर पडदा टाकत त्यांच्यातील गोष्टी आलबेल असल्याचं स्पष्ट केलं.
उर्मिलाचा हा नवा सिनेमा लहान मुलांसाठी एकदम खास असणार आहे. प्रत्येक लहान मुलाला गोष्ट सांगितलेली आवडते तशीच गोष्ट सांगणाऱ्या एका माणसाची गोष्ट या सिनेमात बघायला मिळणार आहे. नुकताच ‘एकदा काय झालं’ सिनेमाचा टिझर आणि म्युजिक लाँच सोहळा पार पडला. या सिनेमात उर्मिलासह सुमित राघवन, पुष्कर श्रोत्री, मोहन आगाशे, सुहास जोशी, आणि बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे दिसणार आहेत. तर याच दिग्दर्शन लेखन आणि संगीत सलील कुलकर्णी यांनी केलं आहे.