**मुंबई, 16 ऑक्टोबर :**झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अश्विनीची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. तुमच्या आमच्यातली सामान्य गृहिणी आपल्या कुटुंबाला कशी आधार देते हे बघायला प्रेक्षकांना आवडतं. ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत नेहमी ट्विस्ट येत असतात. त्यामुळे मालिका रंजक बनते. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सध्या मालिकेत श्रेयसचा बिझनेस चालू आहे. अश्विनीनेच त्याला बिझनेससाठी पाठींबा दिला. त्यामुळे वडिलांचा विरोध झुगारून नोकरी सोडून त्याने बिझनेस सुरु केला. अश्विनीने त्याला भक्कम साथ दिली. पण आता मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे. श्रेयसच्या बिझनेसवर मोठं संकट येणार आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार श्रेयसचा बिझनेस कोसळला आहे. त्याचा दोष तो अश्विनीला देत आहे. श्रेयस ‘तुझ्यामुळे माझी आयुष्यभराची सगळी कमाई गेली अश्विनी’ असं म्हणतो. तर त्यावर अश्विनी आता पुन्हा घरासाठी आत्मविश्वासाने उभी राहणार आहे. हेही वाचा - Abhijeet khandakekar:‘अशा दिग्गजाबरोबर चित्रीकरण करताना’; विक्रम गोखलेंबाबत काय म्हणाला अभिजीत खांडकेकर? अश्विनी आता घराला वाचवण्यासाठी पार्लरचा बिझनेस सुरु करणार आहे. श्रेयाचा बिझनेस कोसळतो त्याचा दोष तो अश्विनीला देत आहे. घरातही कोणाचा आता तिच्यावर विश्वास राहिलेला नाही. पण आता येणाऱ्या काळात अश्विनीमुळेच घराला आधार निर्माण होणार आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहत घराला वाचवणार आहे.
अश्विनी आणि श्रेयसमध्ये काही काळापासून नाराजी होती. अश्विनी जरी त्याला सतत पाठींबा देत असली तरी श्रेयस मात्र नेहमी तिला कमी लेखतो. तिला वाईट बोलतो. हे अश्विनीला सुद्धा आवडत नाही. ती वेळोवेळी त्याला सुनावत असते, त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करते.
अश्विनी आणि श्रेयस यांना कुटुंबासाठी नवं घर घ्यायचं आहे. राहणीमान उंचवायचं आहे. श्रेयस अनेकांना घरासाठी कर्ज मिळवून देणाऱ्या कंपनीत नोकरी करायचा पण तेच काम स्वतंत्रपणे करण्याचं ठरवून त्याने बिझनेस सुरू केला आहे. अश्विनीनेच त्याच्या ऑफिससाठी एक जागाही शोधून काढली. आता अश्विनी घर कसं सावरणार, खचलेल्या श्रेयसला या सगळ्यातून ती कसं बाहेर काढणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेत आगामी भागात पाहायला मिळतील. त्यामुळे येणाऱ्या काळात मालिका पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.