मुंबई, 26 जानेवारी : गेल्या काही महिन्यात अनेक टीव्ही मालिकांनी ब्रेक घेतला आहे किंवा मालिका पूर्णपणे थांबल्या आहेत. त्याऐवजी नव्या मालिका आल्या आहेत. दरम्यान आता सर्वांना खळखळून हसवणारा 'द कपिल शर्मा शो'देखील (The Kapil Sharma Show) लवकरच बंद होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मानं होस्ट केलेला 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शो आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद होणार असल्याची चर्चा होती. अखेर हा शो कधी बंद होणार आणि का? हे या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.
डिसेंबर 2018 साली द कपिल शर्मा शो ऑन एअर झाला. यामध्ये कपिल शर्माशिवाय भारती सिंग, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि अर्चना पूरन सिंग आहेत. लॉकडाऊनच्या काळात 'द कपिल शर्मा शो' पूर्णपणे थांबवला गेला होता. या काळात जुन्या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या चार महिन्यांनंतर 1 ऑगस्ट 2020 पासून या कार्यक्रमाच्या नवीन भागांचे शुटींग सुरू करण्यात आलं होतं.
पण आता हा शो फेब्रुवारीमध्ये बंद होणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ऑफ-एअर होईल असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र टाइम्सनं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. हा शो नव्या स्वरूपात आणण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचा - 'शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे कसे सुटणार?' डिसले गुरूजी झाले भावुक
पण सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाची नव्यानं रचना करण्याचा कोणताही मानस नाही. तर सध्या कोणतेही सिनेमे रिलीज होत नाहीत. त्यामुळे स्टार प्रमोशनसाठी येत नाहीत. तसंच कोरोना महासाथीमुळे प्रेक्षकांना सेटवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसरं म्हणजे कपिलची पत्नी प्रेग्नंट आहे, ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमात ब्रेक घेणं कपिल आणि त्याच्या कुटुंबासाठीही फायद्याचं ठरेल.
हे वाचा - प्रियांका चोप्राला फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्याचं दुःख; म्हणाली...
'द कपिल शर्मा शो' ऑफ- एअर जाणार असल्याच्या बातमीमुळे चाहते निराश झालेत, पण लवकरच ते नवीन जोमाने परत येतील अशी आशा आहे. काही महिन्यांसाठी हा शो बंद केला जाईल आणि पुन्हा लाँच केला जाईल. कदाचित 'द कपिल शर्मा शो' चांगल्या कन्टेटसह तीन महिन्यांनंतर परत येईल. असं सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.