इरफानच्या कबरीवर कुटूंबीय लावणार ‘रातरानी’चं झाडं, हे आहे खास कारण!

इरफानच्या कबरीवर कुटूंबीय लावणार ‘रातरानी’चं झाडं, हे आहे खास कारण!

इरफानला उत्तमोत्तम अत्तराचं वेड होतं. सुंगंधी फुलं त्याला खूप आवडत असे. ‘रातरानी’ची सुगंधी फुलं त्याला सर्वात जास्त आवडत होती.

  • Share this:

मुंबई 01 मे : चतुरस्त्र अभिनेता इरफान खानच्या मृत्यूने सगळी चित्रपट सृष्टी आणि चाहते हळहळले आहेत. त्याच्या अकाली एक्झीटने सगळ्यांनाच धक्का बसला.  इरफान खाननं 29 एप्रिलला मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबईमध्ये त्याच्यावर मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच इरफानच्या फॅमिलीकडून एक पत्र जारी करण्यात आलं जे त्याची पत्नी सुतापानं लिहिलं आहे. त्यात त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली. इरफानच्या कबरीवर ‘रातरानी’चं झाड लावण्यात येणार आहे.

इरफान मागच्या दोन वर्षांपासून इरफान न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरशी लढत होता. मागच्याच वर्षी यावर उपचार घेऊन तो भारतात परतला आणि अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शूटिंग सुद्धा पूर्ण केलं. पण त्यानंतर त्याची तब्बेत पुन्हा बिघडली आणि 29 एप्रिलला त्याचं निधन झालं.

इरफानला उत्तमोत्तम अत्तराचं वेड होतं. सुंगंधी फुलं त्याला खूप आवडत असे. ‘रातरानी’ची सुगंधी फुलं त्याला सर्वात जास्त आवडत होती. त्याची ती आवड लक्षात घेऊन त्याला कायमच सुगंध मिळत राहावा यासाठी हे झाड लावण्यात येणार असल्याचं सुतापानं म्हटलं आहे.

‘रातरानी’चं झाडं मोठं व्हायला वेळ लागेल. मात्र ते जेव्हा मोठं होईल तेव्हा सुगंधी फुल त्याच्या कबरीवर पडतील आणि त्याचा सुगंध त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल असं सुतापानं म्हटलं आहे.

सुतापा यांच्या पत्राचा मराठी अनुवाद

कुटुंबीयांकडून पत्र मी कसं लिहू जेव्हा संपूर्ण जगच याकडे एक वैयक्तिक नुकसान म्हणून पाहत आहे. मी स्वत:ला एकटं कसं समजू जेव्हा लाखो जण याक्षणी आसवं गाळत आहेत. मी सगळ्यांना एवढंच सांगू शकते की हे नुकसान नसून हा लाभ आहे.त्याने आपल्याला शिकवलेल्या गोष्टींची ही एक साठवण आहे आणि आता वेळ आलेय त्या गोष्टी करण्याची. तरीही काही गोष्टी सांगू इच्छिते ज्या लोकांना माहिती नाहीत. ते आपल्यासाठी खरं तर अविश्वसनीय असेल पण मी इरफानच्याच शब्दांत मांडते.

'मी काही गमावलं नाही तर...' इरफानच्या निधनानंतर पत्नीची इमोशनल पोस्ट व्हायरल

‘हे जादूई आहे’ तो असणं किंवा नसणं, कारण इरफानने कधीच एकदर्शी वास्तवावर विश्वास ठेवला नाही. मला एकच खंत आहे, की त्याने मला आयुष्यभरासाठी बिघडवलं आहे.त्याची परिपूर्णतेची ओढ अशी होती की मला आता सामान्य गोष्टी आवडूच शकत नाहीत.कर्कश्श गोंगाटात आणि गदारोळात सुद्धा त्याला एक ताल सापडायचा. त्यामुळे त्याच तालावर मला गायला आणि नाचायला त्याने शिकवलं. त्यामुळे गंमतीची गोष्ट अशी की आमचं आयुष्य अभिनयाच्या कार्यशाळेसारखं सुरु होतं, आणि अशात जेव्हा ‘आगंतुक पाहुणे’ आले तेव्हा त्या कर्कश्श गोंगाटात सुसवांद साधणं मी शिकायला लागले. डॉक्टरांचे रिपोर्ट्स आले की मी त्यातले सगळे बारकावे समजून घेत म्हणजे त्याचा सादरीकरणावर परिणाम होणार नाही.

इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

आम्ही काही विलक्षण लोकांना भेटलो ज्यांची यादी मोठी आहे, सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही. पण काहींची नावं घ्यायलाच हवीत.आमचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निलेश रोहतोगी ( मॅक्स हॉस्पिटल साकेत) ज्यांनी सुरुवातीला आम्हाला मदत केली. डॉ. डॅन क्रेल (युके), डॉ. शिद्रावी (युके), माझ्या अंध:कारातील एकमेव ज्योत असलेल्या डॉ. शेवंती लिमये ( कोकिलाबेन हॉस्पिटल).

हा प्रवास किती अद्भूत, सुंदर, वेदनादायी आणि थरारक होता हे शब्दांत मांडणं खरंतर अवघड आहे.या अडीच वर्षांच्या काळात सुरुवात, मध्य आणि शेवट सगळंच आहे. ज्यात इरफान एखाद्या ऑर्केस्ट्रा कंडक्टरसारखा होता. आमच्या 35 वर्षांच्या सहप्रवासापेक्षा वेगळा. आमचं लग्न फक्त एक लग्न नव्हतं ते एक युनियन होतं.

अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे

आमचं कुटुंब एका नौकेतून जात होतं, ज्यात माझी मुलं बाबिल आणि अयानसुद्धा होती. इरफान आम्हाला मार्ग दाखवायचा, ‘इथे नाही, तिथे वळा’, पण आयुष्य हा काही सिनेमा नाही आणि त्यात कोणतेच रिटेक नाहीत , त्यामुळे या वादळातून ही नौका सुरक्षितपणे जावी यासाठी मला वाटायचं माझ्या मुलांनी पित्याचं ऐकावं आणि या वादळात खंबीरपणे राहावं.

मी माझ्या मुलांना विचारलं की, त्यांच्या पित्याने त्यांना जे शिकवलंय ते ते शब्दांत मांडू शकतील का?

बाबिल - ‘या अनिश्चिततेच्या नृत्यात समर्पण करायला शिकलो आणि या विश्वावर विश्वास ठेवायला शिकलो.’

अयान- ‘मनावर ताबा ठेवायला शिकलो आणि मनाने तुमचा ताबा घेऊ नये हेही शिकलो.’

या प्रवासाअखेर जिथे तुम्ही त्याला ठेवलंत तिथे आम्ही त्याचं आवडतं रातराणीचं झाड लावू. ..अश्रूंना आवरणं अर्थातच कठिण झालंय.त्या काही काळाने त्या रातराणीचा सुगंध हळूहळू पसरेल आणि पुन्हा त्या सर्वांच्या अंतरात्म्याला स्पर्श करेल ज्यांना मी चाहते नाही तर कुटुंब असंच म्हणेन.

First published: May 1, 2020, 6:03 PM IST
Tags: Irfan Khan

ताज्या बातम्या