मुंबई, 23 मार्च : तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (CM Jaylalithaa) यांच्या जीवनावर अधारित चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात होते. अशात आता नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Thalaivi Trailer Out) आला आहे. कंगनाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनयापासून राजकीय क्षेत्रापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमधील कंगनाच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
ट्रेलरमधील दमदार डायलॉग आणि सीन काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. हा ट्रेलर कंगनाच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला असून त्यांनी रिलीजआधीच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असल्याचाही दावा केला आहे. ३ मिनीट १५ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पे दाखवण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्यात कंगनाचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. लोकांच्या होणाऱ्या विरोधात उत्तर देणाऱ्या जयललिता यांच्या डायलॉगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. जयललितांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेला कंगनानं पुरेपुर न्याय दिला आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Chief minister, Jaylalitha, Kangana ranaut, Star celebraties, Tamil nadu