मुबंई, 28 जून: ‘तारक मेहता का उलटा चश्मा, (Taarak Mehta Ka Oolta Chashmah) ही हिंदी विनोदी मालिका (Comedy Serial) घराघरात लोकप्रिय आहे. यातील पात्रांचे अगदी लहानांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण फॅन आहेत. सर्वांच्या मनावर तब्बल 14 वर्षे या मालिकेने अधिराज्य गाजवलं आहे. आजही या मालिकेचे रिपीट टेलिकास्ट पुन्हापुन्हा पाहिले जातात. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रत्येकाला त्यांच्या घरातीलच वाटतं, हेच या मालिकेचं दीर्घकाळ चालण्यामागचं यश आहे आणि ते टिकवून ठेवण्यामध्ये या मालिकेतील सर्वच कलाकारांचं मोठं योगदान म्हणावं लागेल. मात्र, अलीकडच्या काळात अनेक कलाकार ही मालिका सोडत आहेत. ते गेल्यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेवर थोडाफार परिणाम झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या शोमध्ये न दिसणार्या राज अनडकटने (Raj Anadkat) अर्थात टप्पू याने ही मालिका सोडल्याची चर्चा होती. मात्र, राज याने अखेर शोचा निरोप घेतल्याचं पुढं आलं आहे. आत्तापर्यंत जे काही अंदाज बांधले जात होते, त्यावर राजनेच अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केल्यामुळे या मालिकेतील आणखी एका चांगल्या कलाकाराला प्रेक्षक मिस करणार आहेत. हेही वाचा - ‘हा शरद पोंक्षे तुच ना?’ आदेश बांदेकरांचा सवाल; नेमकं काय आहे प्रकरण ? खरं तर, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या 14 वर्षांत या शोने यशाची नवनवी शिखरं गाठली आहेत. आत्तापर्यंत अशी अटकळ होती की टप्पू म्हणजेच राज अनडकटदेखील या शोमधून निरोप घेणार आहे, मात्र, या बातमीच्या सत्यतेबाबत काही समजत नव्हतं.
टप्पूचं पात्र बरेच दिवस शोमध्ये दिसत नसल्यामुळे शंकेला वाव होता. शोमध्ये याचं कारण टप्पू अभ्यासासाठी मुंबईबाहेर गेला असल्याचं सांगितलं जात आहे. पण, आता या शोलाच त्याने अलविदा केल्याची बातमी आली आहे. दयाबेन, मेहता साहेबांनंतर आता टप्पूदेखील शोपासून वेगळा झाला आहे. आणि तो लवकरच मोठ्या पडद्यावर मोठ्या स्टार्ससोबत दिसणार आहेत. राजने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. याबाबतची माहितीही त्याने नुकतीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. इन्स्टावर त्याने अभिनेता रणवीर सिंगसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये राज रणवीरसिंगबरोबर काम करणार असल्याचं समजतंय, मात्र, सध्या तरी त्या प्रोजेक्टबद्दल फारशी माहिती सांगू शकत नाही असं राजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो त्याच्या अनोख्या पात्रांमुळे आणि जबरदस्त कलाकारांमुळे सर्वांचा आवडता राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. यातील काही पात्रांच्या जागी नवे चेहरे दिसत आहेत, तर काही अद्याप परतलेले नाहीत. यामध्ये दयाबेन, मेहता साहेब, बावरी या पात्रांचा समावेश आहे. हे कलाकार मालिका सोडत असले तरी, चाहत्यांच्या मनांमध्ये मात्र, त्यांनी साकारलेलं पात्र, घर करून आहे.

)







