मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी वेगाने सूत्र हलवण्यात येत आहेत. पाटणा पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागे दोरे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी पाटणा पोलीस सुशांतचा रुम पार्टनर आणि त्याचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई पोलिसांनी पिठानीची 2 वेळा चौकशी केली आहे. सुशांतच्या मृत्यूवेळी सिद्धार्थ त्याच घरात उपस्थित होता. त्याचप्रमाणे दिवेश सावंत, जो सुशांतच्या स्टाफ पैकी एक होता त्याची चौकशी देखील पाटणा पोलिसांकडून तेली जाण्याची शक्यता आहे. दिवेशला कामावर रिया चक्रवर्तीने ठेवले होते.
सुशांत सिंह राजपूत या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो या निर्णयापर्यंत का पोहोचला आणि त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास वांद्रे आणि पाटणा पोलिसांकडून केला जात आहे. सिद्धार्थ सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित असल्याने त्याची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.
(हे वाचा-रियाला नकोय बिहारमध्ये चौकशी, सुप्रीम कोर्टात म्हणाली मुंबईचे पोलीसच निष्पक्ष)
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतच्या बँक डिटेल्सच्या आधारावर पाटणा पोलीस 50 हून अधिक प्रश्न तयार करत असल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहेत. या प्रश्नांची उत्तरं रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला द्यावी लागणार आहेत.
(हे वाचा-अंकिता लोखंडेने बिहार पोलिसांना दिला मोठा पुरावा; सुशांतने दिले होते संकेत)
दरम्यान सुशांतच्या वडिलांनी लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगत रियाने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडेच केस ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. बिहार सरकारने मात्र रियाच्या या याचिकेला विरोध करण्यासाठी मुकुल रोहतगींसारखे तगडे वकील सुप्रीम कोर्टात उभे केले आहेत. मुंबई पोलीसच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास करू शकतात, असं म्हणत रिया चक्रवर्तीने बिहारमध्ये केस जायला विरोध केला आहे. रियाने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये परस्पर वळवल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput