मुंबई, 5 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने फारच कमी वेळेत सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना अभिनेत्याने स्वतःच्या जोरावर आपलं भक्कम स्थान निर्माण केलं होतं. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक गळफास घेत आत्महत्या केल्याने देश हादरुन गेलं होतं. अभिनेत्याने आपल्या वांद्रयातील राहत्या घरी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. सुशांतच्या निधनानंतर हे अपार्टमेंट बंद होतं. परंतु आता या अपार्टमेंटमध्ये नवीन भाडेकरु येणार असल्याचं समोर आलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईमधील वांद्रा याठिकाणी वास्तव्यास होता. वांद्रयात सुशांत सिंह राजपूतचा एक लग्झरी अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सुशांत आपली गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि घरातील हेल्पर नीरज आणि केशवसोबत राहात होता. याच अपार्टमेंटमध्ये सुशांत सिंह राजपूतने गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनानंतर त्याचं हे अपार्टमेंट रिकामं होतं. यामध्ये इतर कोणीही वास्तव्यास आलेलं नव्हतं. सुशांतने अखेरचा श्वास घेतलेल्या या अपार्टमेंटमध्ये आता एक भाडेकरु येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. (हे वाचा: Tunisha Sharma Birthday: तुनिषाचा मामाच तिचा सावत्र पिता? संजीव कौशलने सांगितलं सत्य **)** सुशांत सिंहने हे अपार्टमेंट एकूण तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर खरेदी केलं होतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळजवळ अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या निधनानंतर या अपार्टमेंटची सतत तपासणी केली जात होती. त्यांनंतर आता हे अपार्टमेंट भाड्याने देण्यात येणार आहे.सुशांतच्या या लग्झरी अपार्टमेंटची सतत चर्चा होत असते. सुशांतच्या या घरात आता कोणती नवी व्यक्ती राहायला येणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर आजही त्याचे चाहते रमलेले असतात. बऱ्याचवेळा त्यांना या अपार्टमेंटबाबत जाणून घ्यायचं असतं. कारण यामध्येच अभिनेता सुशांतने आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवले होते. सुशांतच्या या लग्झरी अपार्टमेंटचा मालक एक एनआरआय व्यक्ती आहे. तो सध्या विदेशातच वास्तव्यास आहे. मुंबईतील रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट यांनी सांगितले की, फ्लॅटच्या मालकाने काही महिन्यांपूर्वी त्याच्याशी संपर्क साधला होता. एका पार्टीसोबत बोलणी सुरु असून लवकरच व्यवहार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नवीन भाडेकरुला या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी दरमहा सुमारे 5 लाख रुपये भाडं द्यावं लागणार आहे. इतकंच नव्हे तर फ्लॅट मालकाला 30 लाख रुपयांची सुरक्षा ठेवही भरावी लागणार आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या फ्लॅटबाबत बोलताना रियाल इस्टेट ब्रोकर रफिक सांगितलं की, सुशांतच्या निधनानंतर हा फ्लॅट रिकामाच आहे. जेव्हा-जेव्हा एखादी पार्टी हा फ्लॅट बघण्यासाठी येत असे आणि त्यांना समजत असे की,याच फ्लॅटमध्ये सुशांत राजपूतचा मृत्यू झाला होता. तेव्हा ते लोक घाबरुन परत येत नसत. परंतु आता लवकरच या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरु आलेला पाहायला मिळणार आहे.