मुंबई, 4 जानेवारी- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तुनिषा शर्मा 'अलीबाबा:दास्तान-ए-काबुल' या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकत होती. मात्र अचानक अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच फाशी घेत आत्महत्या केली होती. त्यांनंतर अभिनेत्रीच्या आईने आपल्या मुलीची फसवणूक करुन तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिजान खानवर केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात तुनिषा शर्मा आणि शिजान खानच्या कुटुंबाकडून दररोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर समोर येत आई वनिता शर्माने शिजान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. शिजानने आपल्या मुलीला फसवलं तसेच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा रोप त्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिजान खानला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान आता शिजान खानच्या अभिनेत्री बहिणी फलक नाज आणि शफक नाज यांनी पुढे येत आपल्या वकील आणि आईसोबत एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी तुनिषा शर्माच्या आईकडून शिजानवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी तुनिषा शर्माच्या आई आणि मानलेल्या मामावर गंभीर आरोप केले आहेत.
(हे वाचा:तुनिषा प्रकरणाला नवं वळण; बॉयफ्रेंड शिझानच्या कुटुंबियांनी दोघांच्या ब्रेकअपबाबत केला मोठा खुलासा )
शिजान खानच्या बहिणींनी या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करत सांगितलं की, शिजान किंवा त्यांच्या कुटुंबाने तुनिषा शर्मावर हिजाब घालण्याची सक्ती कधीच केलेली नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुनिषा आणि शिजान त्यावेळी आपल्या सीनसाठी तयार झाले होते आणि त्याच गेटअपमधील तो फोटो होता. त्या फोटोमध्ये दिसणारा हिजाब कोणत्याही खाजगी कारणासाठी नव्हे तर मालिकेसाठी परिधान करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मानलेला मामाच अभिनेत्रीचा सावत्र पिता?-
तसेच शिजान खानच्या बहिणींनी आपल्या पत्रकार परिषदेत तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा आणि मानलेला मामा संजीव कौशल यांच्यावर आरोप करत त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, शिजान खानच्या बहिणींनी तुनिषा शर्माचा मामा म्हणून स्वतःची ओळख करुन देणारा संजीव कौशलच तिचा सावत्र पिता असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे.
संजीव कौशल यांचं प्रत्युत्तर-
या आरोपानंतर संजीव कौशल यांनी म्हटलं आहे, आम्ही गेल्या 10-12 वर्षांपासून तुनिषा शर्माच्या कुटुंबाला ओळखतो. ती मला माझ्या मुलीसारखी होती. आमचं रक्ताचं नातं नव्हतं मात्र आमचं नातं फारच सुंदर होतं. मी माझी मुलगी ऋतिकाप्रमाणेच तुनिषाला प्रेम करत होतो. आम्ही या दोघींचा वाढदिवस करत होतो. काही नाती ही काचेसारखी आरपार असतात'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actors