पाटणा, 28 जुलै : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Demise) आत्महत्या प्रकरणाला मंगळवारी अचानक कलाटणी मिळाली. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये या प्रकरणी पोलिसांत दाखल केल्यानंतर आता पाटण्याचे पोलीस मुंबईत येऊन थडकले आहेत. या प्रकरणी सुशांतचे वडील कृष्णा सिंह ( KK Singh) यांनी पाटणा पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्तक्षेपानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पाटणा पोलिसांनी देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी काही संभाव्य अटकेसाठी पाटण्याहून 4 पोलिसांची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतला आत्महत्या करण्यात काही फिल्मी लोकांचा हात होता, असं लिहिलं आहे. तक्रारीत कुणा एका व्यक्तीविरोधात आरोप नाही. पण सुशांतच्या गर्लफ्रेंडवर वेगळा आरोप करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये काढले असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणी CBI चौकशी व्हावी अशी मागणी बिहारमध्ये जोर धरत आहे. याप्रकरणी लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती देखील मिळत आहे. पासवान यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत असल्याचे आश्वासन पासवान यांना दिले. या प्रकरणाचा तपास योग्य मार्गे सुरू असून कुणालाही यामध्ये सूट मिळणार नाही, असं आश्वासन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
बिहारचे भाजपचे माजी आमदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरसिया यांनी मंगळवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली. त्यांनी गृह राज्यमंत्री यांना एक पत्र सादर केले, ज्यात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. न्यूज 18 शी बोलताना रामेश्वर चौरसिया यांनी अशी माहिती दिली की त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे सीबीआय चौकशीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलण्याची मागणी केली.