मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी ईडी चौकशीला वेग आला आहे. आज सिद्धार्थ पिठानी आणि रितेश शहा यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. सिद्धार्थ हा सुशांतचा रुममेट त्याचप्रमाणे त्याचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर देखील होता. तर रितेश हा रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) सीए आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची काल 8 तास चौकशी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीनंतर काही महत्त्वाचे सुगावे ईडीच्या हाती लागल्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ पिठानी मुंबईबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटले आहे की, सुशांतच्या आत्महत्येदिवशी अर्थात 14 जून रोजी तो त्या घरी उपस्थित होता. अशी माहिती आहे की, पिठानी गेले वर्षभर सुशांतबरोबर राहत होता. याप्रकरणी सिद्धार्थ पिठानीची मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांकडून देखील चौकशी झाली आहे.
(हे वाचा-सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली? महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय)
रिया चक्रवर्तीने ईडीसमोर येण्यास आधी नकार दिला होता. तिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत ईडीकडे वेळ मागितली होती. मात्र ईडीने तिचे वकील सतीश मानेशिंदे यांचे अपील फेटाळत तिला मुंबई स्थित कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी ती शुक्रवारी 11 वाजून 45 मिनिटांनी ईडी कार्यालयामध्ये दाखल झाली होती.
View this post on Instagram
ईडीने रियाकडून तिच्या मालमत्तेची कागदपत्रं मागितली होती. मात्र रियाने आपली मालमत्तेची कागदपत्रं ईडीसमोर सादर केली नाहीत. तिनं आपली कागदपत्रं सीए रितेश शाहकडे असल्याचं सांगितलं मात्र रितेश शाह यांनीदेखील आपल्याकडे कागदपत्रं असल्याचं नाकारलं. त्यानंतर रियाने आपण कागदपत्रं कुठे ठेवलीत हे आठवत नसल्याचं सांगितलं. अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केल्या. यामध्ये एक रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. रियाने या दोन्ही प्रॉपर्टीसाठी कुठून पैसे दिले त्याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यावर ईडीने या प्रॉपर्टीचे कागदपत्र मागितली.
(हे वाचा-EXCLUSIVE : रियाच्या भावाच्या बँक खात्यावरून महत्त्वाची माहिती आली समोर)
रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांची देखील शुक्रवारी चौकशी झाली. याप्रकरणी रिया, शौविक, इंद्रजीत आणि श्रुती मोदी यांची पुन्हा सोमवारी चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. New18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या (Showik Chakraborty) खात्यात सुशांतच्या खात्यातून करोडो रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट होत आहे, तशा नोंदी आहेत. कोटक बँकेतून या पैशांचा व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput