मुंबई, 08 जुलै: अभिनेत्री राधा सागर कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत ‘अभिलाषा’ ही भूमिका साकारत आहे. अभिलाषा या मालिकेची खलनायिका असून ती अभिमन्यूची बॉस आहे. अभिनेत्री राधा सागरने ही भूमिका उत्तम वठवली आहे. त्यासाठी तिला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाच्या अपडेट देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या ‘अभिलाषा’ या भुमिकेबाबत सोशल मीडियाद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राधा सागरने ‘अभिलाषा ही वेगळ्या धाटणीची भूमिका साकारायला मिळाली याबाबत समाधानी आहे’, तसेच ‘मालिकेत सध्या चाललेल्या ड्रामाला तुम्ही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहात आणि माझे कौतुक करत आहात त्याबद्दल आभार’ अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या मालिकेत अभिलाषाची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल तिने निर्माती मनवा नाईक, लेखिका मधुगंधा ताई, ज्योती ताई, दिग्दर्शक रुपेश सर यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढे तिने लिहिलंय की, ‘मला हे पात्र करायला मिळालंय या साठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे…. त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करतीये आणि करत राहीन…. तूर्तास एवढेच… माझ्यावर आणि अभिलाषावर असेच प्रेम करत रहा…. “कलर्स मराठी” चे मनापासून धन्यवाद मानले आहेत. हेही वाचा - Ashadhi Wari: ‘मला तुझ्याकडून काहीच नको…’ अभिनेता भरत जाधवची पंढरपूरच्या विठुरायाला अनोखी साद
तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील ‘आम्ही तुझ्यामुळे ही मालिका बघतो’, ‘तू खूपच छान काम करतेस’, ‘आम्हाला अभिलाषा बघायला आवडते’ अशा प्रकारे तिचे कौतुक केले आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अभिनेत्री राधा सागरने आता आभाराची पोस्ट लिहिली आहे तेव्हा तिचा या मालिकेतील प्रवास लवकरच संपणार अशी शक्यता असू शकते. त्यामुळे आता मालिकेत नवीन काय घडणार, लतिका अभिलाषाला धडा शिकवणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अभिनेत्री राधा सागरने नुकताच प्रचंड गाजलेला चित्रपट ‘चंद्रमुखी’ मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. चंद्राच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती. तसेच ती भिरकीट या चित्रपटातही दिसली होती.