मुंबई, 18 फेब्रुवारी: सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयक्षेत्रात सतत काहीतरी नवनवीन करण्यावर या अभिनेत्याचा भर असतो. प्रेक्षकही या अभिनेत्याच्या विविध प्रयोगांना भरभरून प्रतिसाद देतात. सुबोध भावेने आतापर्यंत बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर अशा चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच तो ‘हर हर महादेव’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुद्धा झळकला. आता चित्रपटानंतर सुबोध भावे लवकरच एका ऐतिहासिक वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. नुकताच त्याच्या भूमिकेचा पहिला लूक समोर आला आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या कमालीचा व्यग्र आहे. टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंग्ज, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सध्या तो कार्यरत आहे. आता लवकरच तो एका वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर समोर आला आहे. सुबोध भावे लवकरच ‘ताज:डिव्हायडेड बाय ब्लड’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये तो बिरबल ही भूमिका साकारणार आहे. त्याने नुकतीच याविषयी एक पोस्ट केली होती. हेही वाचा - Heeramandi First Look: सोनाक्षी सिन्हा ते मनीषा कोईराला ‘या’ अभिनेत्रींच्या सौंदर्याने सजली संजय लीला भन्साळींची ‘हीरामंडी’ सुबोध भावेनं पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या " बिरबल " ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय.’ आता सुबोधला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत. सुबोधच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘रॉयल… खूप आवडला हा लूक! भरभरून शुभेच्छा!!’, ‘बिरबलाच्या वेशभूषेत खुप सुंदर फोटो’, ‘शोभून दिसताय दादा’, ‘वाह ! एकदमच रुबाबदार’ असं म्हणत त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ची कथा मुघल काळातील सत्तानाट्यावर अवलंबलेली आहे. यामध्ये सम्राट अकबरची भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी साकारली असून अदिती राव हैदरी ‘अनारकली’ बनली आहे. ZEE5 मूळ मालिका रोनाल्ड स्केलपेलो यांनी दिग्दर्शित केली आहे. ही वेब सिरीज येत्या ३ मार्च २०२३ रोजी ZEE5 वे प्रदर्शित होणार आहे.
सुबोध भावेसोबत या सिरीजमध्ये नसीरुद्दीन शाह आणि अदिती राव हैदरी यांच्याशिवाय धर्मेंद्रने सलीम चिश्तीची भूमिका केली आहे, आशिम गुलाटीने प्रिन्स सलीमची भूमिका केली आहे, ताहा शाह बदुशाने प्रिन्स मुरादची भूमिका केली आहे आणि शुभम कुमार मेहरा यांनी प्रिन्स डनियालची भूमिका केली आहे. मिर्झा हकीमच्या भूमिकेत राहुल बोस, जोधाबाईच्या भूमिकेत संध्या मृदुल, राणी रुकैया बेगमच्या भूमिकेत जरीना वहाब, अबू फजलच्या भूमिकेत पंकज सारस्वत आणि बख्तुन्निसा यांच्या भूमिकेत शिवानी टंकसाले आहे. आता ही सिरीज पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.