मुंबई, 1 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सतत काहीतरी नवीन भूमिका करण्यावर त्याचा भर असतो. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्याने मराठीमध्ये चरित्रपट साकारण्याची परंपरा रुजवली. बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका लीलया पेलल्या. आता पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेविषयी सुबोध खूपच उत्सुक आहे. ‘हर हर महादेव’ हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट आहे. आता या चित्रपटाबाबत सुबोधने मोठा खुलासा केला आहे. नुकतंच या चित्रपटाचा हर हर महादेव या चित्रपटाच्या संगीत लोकार्पण सोहळा पार पडला. राजश्री मराठीने या सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या सोहळ्यात सुबोधने या भूमिकेविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे याने कोणतंही मानधन घेतलेलं नाही. यावेळी त्याने मानधन न घेण्याचं कारण देखील सांगितल आहे. हेही वाचा - VIDEO : नाटक का लांबतं?… प्रिया बापटने सांगितलेलं कारण ऐकून हसून व्हाल लोटपोट सुबोध या कार्यक्रमात या भूमिकेविषयी बोलताना म्हणाला कि, ‘‘कोणत्याही देवाची इच्छा असल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असल्याशिवाय त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य कुणाला लाभत नाही.’’ पुढे त्याला या भूमिकेचं मानधन न घेण्याविषयी विचारलं तर त्याने अभिमानास्पद उत्तर दिलं आहे. तो म्हणाला कि, ‘‘छत्रपतींची भूमिका तुमच्यापर्यंत येणं, तुम्हाला ती साकारायला मिळणं हेच तुमच्यासाठी मोठं मानधन आहे. यापेक्षा अजून दुसऱ्या मानधनाची अपेक्षा करायची नाही. '’
पुढे तो म्हणाला कि, ‘‘जेव्हा मला या भूमिकेसाठी मानधनाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मी म्हटलं कि हे मानधन मला शिवरायांच्या भूमिकेसाठी मिळत आहे. त्यावर माझा अधिकार नाही. हे छत्रपती शिवरायांचे पैसे आहेत. म्हणजेच स्वराज्याचे पैसे आहेत.’’ पुढे तो म्हणाला, ‘‘मला मिळालेल्या पैशांची मी एक fd केली आहे. त्यावरून मिळालेलं व्याज मी शिवरायांनी ज्या उपेक्षित घटकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यासाठी मी हे पैसे वापरणार आहे. ’’ सुबोधच हे उत्तर ऐकताच सोहळ्यात सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अभिनेता सुबोध भावे कमालीचा व्यग्र आहे. टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंग्ज, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सध्या तो कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी हर हर महादेव सिनेमात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याचं घोषित झालं. त्यावेळी काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीकाही केली. अनेकांचं म्हणणं असंही आहे की छत्रपतींच्या भूमिकेत सुबोध योग्य वाटणार नाही.