मुंबई, 18 ऑगस्ट : अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा अनेक भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजेच स्पृहा जोशी. स्पृहा अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या निखळ हास्य आणि दमदार अभिनयामुळे ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच स्वत: केलेल्या कवितांनी ती प्रेक्षकांची मनं जिंकते. सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांची मनं जिंकत आहे. तिने स्वतःला बदलण्याचं चॅलेंज घेतलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना हि माहिती दिली आहे. स्पृहाने तिच्या वाढदिवसापर्यंत स्वतःला बदलण्याचं ठरवलं आहे. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहाला बऱ्याचदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबद्दल खुद्द स्पृहानेच फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. स्पृहाला ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमानंतर दिसण्यावरून बरंच ट्रोल केलं गेलं होतं. ‘किती जाड झालीये’ ‘ही कसली हिरोईन’, ‘किती बेढब शरीर’, ‘मराठीत काही अवेअरनेसच नाही’, इथपासून ते एका दिग्दर्शकाने तर कर्णोपकर्णी ती प्रेग्नंट असल्याचं कळल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी तिला चित्रपटात काम द्यायचं नाही असं ठरवल्याची बातमी तिच्या कानावर घातली होती. मात्र स्पृहाने या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करत कलाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण आता स्पृहाने स्वतःच वजन कमी करण्याचं ठरवलं आहे.
स्पृहा सध्या वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहे. तिने व्यायाम करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती या व्हिडिओमध्ये म्हणतेय कि, ‘माझ्या अतिशय बिझी शेड्युलमुळे माझं माझ्या शरीराकडे नेहमी दुर्लक्ष होतं. त्यामुळे मला नियमित व्यायामही करता येत नाही. पण मी आता स्वतःला चॅलेंज केलं आहे. मी माझ्या येणाऱ्या वाढदिवसांपर्यंत माझं वजन कमी करणार आहे.’ हेही वाचा - Swapnil Joshi : ‘30 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही…’ गोकुळाष्टमीनिमित्त स्वप्नील जोशीनं सांगितली ‘ती’ आठवण स्पृहाचा येत्या 13 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. तोपर्यंत 45 दिवसात वजन कमी करण्याचं चॅलेंज तिने घेतलं आहे. हे ऐकून तिचे चाहते तीच कौतुक करत आहेत. ‘तू फिटच आहे’, ‘नेहमी निरोगी राहा’, ‘तू आहेस तशीच आम्हाला आवडतेस’ अशा शब्दात स्पृहाचे चाहते तिचं मनोबल वाढवत आहेत. तसेच तुला फिट बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असाही ते म्हणत आहेत. स्पृहा सध्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिचं युट्युब चॅनेलही जोरात सुरु आहे. नुकतेच तिच्या चॅनलवर १ लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. तिचं कौतुक म्हणून युट्यूबकडून तिला ‘सिल्वर बटन’ देण्यात आलं आहे. आता स्पृहाला नवीन रूपात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.