मुंबई, 30 ऑक्टोबर : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांनंतर नवीन भूमिकेत झळकणार आहे. आगामी काळात तिचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोनाक्षी या चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये बिझी आहे. या चित्रपटाद्वारे बॉडी शेमिंग या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सोनाक्षी सायरा खन्ना या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर हुमा कुरेशी सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये नायिकांसर्पब्त होणाऱ्या भेदभावाविषयी मोठं विधान केलं आहे. नुकत्याच नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने बॉडी शेमिंग, सिनेसृष्टीमधील भेदभाव, ट्रोल्स अशा महत्वाच्या मुद्द्यांवरभाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगते आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगती केली आहे.मला वाटते की स्त्रियांची ही स्थिती नेहमीच राहिली आहे. माझ्या मते, आज महिला करू शकत नाहीत असे कोणतेही काम उरलेलं नाही. आता महिला चंद्रावर जात आहेत, आज एक स्त्री कॅम्पिंग करते, ती इंजिनियर बनते. आज ती तिला हवे ते करू शकते, त्यामुळे आपणही ती जुनी विचारसरणी बदलण्याची गरज आहे.’’ हेही वाचा - Bigg boss marathi 4: घराबाहेर पडताच योगेशने झिडकारले मेघाचे सगळे आरोप; म्हणाला, ‘‘मी असं काही बोललोच…’’ बॉलिवूडमधील नायिकांच्या स्थितीविषयी यावेळी बोलताना सोनाक्षी म्हणाली कि, ‘‘सध्या महिला प्रधान विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाणही वाढले आहे. प्रेक्षक सुद्धा या चित्रपटांना प्रतिसाद देत आहेत. आपल्याकडे अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामध्ये खूप आधीपासून भेदभाव केला जातो. त्यांच्या मानधनामधील फरक हे याचे सर्वात प्रमुख उदाहरण आहे.” ती पुढे म्हणाली, “त्यांच्या मानधनाच्या तुलनेमध्ये आम्हांला मिळणारे मानधन कमी असते हे सर्वश्रुत आहे. पुरुष असणं या एका गोष्टीमुळे त्यांना जास्त पैसे मिळतात. ते जे काम करतात, तेच काम आम्ही पण करतो. कधी-कधी तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतो. तरीही आम्हांला तुलनेने कमी पैसे दिले जातात. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून होत आहेत. फक्त मनोरंजन विश्वच नाही, तर बऱ्याचशा ठिकाणी हा भेदभाव प्रकर्षाने जाणवतो. पण आता परिस्थिती बदलणे गरजेचे आहे.’’ अशा भावना सोनाक्षीने व्यक्त केल्या आहेत.
याआधी सोनाक्षी ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकली होती. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांमध्ये सोनाक्षीचे बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. पण त्यातल्या फार कमी चित्रपटांना लोकांची पसंती मिळाली. ‘डबल एक्सएल’च्या निमित्ताने सोनाक्षी नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत.